मुंबई | Mumbai
देशातील पाच पैकी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळविले आहे. तर केरळमध्ये काँग्रेस आणि तामिळनाडूत अभिनेता विजय थालापतीच्या टीव्हीके (TVK) पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. पाचपैकी पश्चिम बंगाल (West Bengal) आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षांचे सरकार होते. मात्र, त्यांचा या दोन्ही राज्यांत पराभव झाला आहे. त्यामुळे हा पराभव विरोधकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. दरम्यान या निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, “भाजप (BJP) केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करत आहे. भाजप ३६५ दिवस केवळ निवडणुका कशा जिंकायच्या याच सराव करत असतो. देशाचे गृहमंत्री २०-२० दिवस बंगालमध्ये राहतात. येथे सत्तेचा आणि पैशाचा वारेमाप वापर केला जातो. खऱ्या अर्थाने याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येणार नाही. विरोधी पक्षाने निवडणुकाच लढवू नयेत, अशी भाजपची धारणा आहे. ज्या प्रकारे पाकिस्तान आणि रशियामध्ये निवडणुका होतात, जिथे निकालाची घोषणा एक दिवस आधीच झालेली असते, तशाच प्रकारच्या निवडणुका आता भारतात होऊ लागल्या आहेत” असा निशाणा राऊत यांनी भाजपवर साधला.
पुढे ते म्हणाले की, “पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील पराभव हा देशासाठी लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशांमध्ये कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही, ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर यापुढे विरोधी पक्षाने निवडणुका लढायला नको. राज्या-राज्यात लाखो मतदार कापले जातात आणि मतदारांची संख्या कमी करून विजय मिळवला जातो. त्या पापात आणि गुन्ह्यात निवडणूक आयोग सहभागी असतो आणि त्यातून विजय मिळाल्यानंतर विजयोत्सव साजरे करतात आणि ते लोकशाहीचा छातीवर नाचतात”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
दिवा विझताना जास्त फडफडतो
दरम्यान, भाजपच्या हिंदुत्वाचा दाखला देत राऊत यांनी भविष्यातील बदलाचे संकेत देतांना भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, “भाजप हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतो, तर त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर दिवा विझताना वात मोठी होते, त्यामुळे तो अधिक फडफडतो, तशीच स्थिती आता भाजपची झाली आहे. इंदिरा गांधींचाही एकेकाळी सर्व राज्यांत प्रभाव होता, पण त्यांचाही पराभव झाला. सत्तेचा माज उतरल्याशिवाय राहत नाही” असा जोरदार निशाणा संजय राऊत यांनी साधला.





