Monday, October 14, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ११ सप्टेंबर २०२४ - उद्देश साध्य होऊ शकेल 

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२४ – उद्देश साध्य होऊ शकेल 

कोणत्याही सार्वजनिक उत्सवांचा लोकसंघटन हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. ज्याला सार्वजनिक गणेशोत्सव अपवाद नाही. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप त्याच उद्देशाने दिले. काळाच्या ओघात त्याचे स्वरूप विस्तारत गेले. वर्षागणिक सार्वजनिक मंडळांची संख्या वाढत जाते. ठिकठिकाणी गणेशाची स्थापना होताना आढळते. तथापि त्याचबरोबरीने ‘एक गाव एक गणपती’ ही कल्पनाही जोर धरत आहे.

यावर्षी नाशिक जिल्ह्यात सुमारे आठशे गावांमध्ये गावाचा मिळून एकाच गणपतीची स्थापना झाल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. राज्यातील अनेक गावांनी त्याच संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले आहे. या संकल्पनेचे अनेक फायदे त्या गावांना होऊ शकतील. या उत्सवानिमित्त सकाळ-संध्याकाळ बाप्पांची आरती तर केली जातेच पण अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. सगळे गावकरी त्यासाठी एकाच ठिकाणी जमू शकतील.

- Advertisement -

भेटीगाठी होऊ शकतील. सामाजिक समस्यांवर चर्चा होऊ शकेल. एकच मंडळ असल्याने जनजागृती करणे कदाचित थोडे सहज होऊ शकेल. सार्वजनिक उत्सव कोणताही असो, अलीकडच्या काळात स्पर्धा अटळ मानली जात असावी का? निकोप स्पर्धा माणसाला मूल्ये प्रदान करते. तथापि ती तशी नसेल तर? एका गल्लीत जितकी मंडळे तितके डीजे वाजू शकतील. तितके मंडप बांधले जाऊ शकतील. मिरवणुकीचा वेळ वाढू शकेल. त्यामुळे वाहतुकीला अडचण होऊ शकेल. याचा ताण सामान्य नागरिकांनाच जास्त सहन करावा लागू शकतो. स्पर्धेमुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतात. उत्सवाला गालबोट लागण्याचा धोकाही वाढतो. कायदा आणि सुव्यवस्थेवरचा ताण वाढू शकेल. एक गाव एक गणपती संकल्पनेमुळे या समस्या निर्माण होणार नाहीत. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता कमीच होऊ शकेल. कदाचित म्हणूनच या संकल्पनेला पोलिसांचाही प्रतिसाद मिळतो. तेही जनतेला तसे आवाहन दरवर्षी करतात.

समाजधुरिण, राजकीय नेतेमंडळींनीदेखील संकल्पनेला बळ देणे जाणत्यांना अपेक्षित आहे. जागरुकता निर्माण करण्यासाठी, कालबाह्य रुढी आणि परंपरांवर चर्चा घडवून आणण्यासाठी, सामाजिक समस्यांवर उपाययोजना शोधण्याची प्रेरणा मिळण्यासाठी अशा सणांसारखे दुसरे निमित्त कुठले असू शकेल? एरवी माणसे स्वमग्न होत चालली आहेत. अशा सणांच्या निमित्ताने ते त्यांच्या वैयक्तिक परिघाबाहेर पडतात. सामाजिक जाणिवा रुजवण्यासाठी इतकी यथार्थ संधी दुसरी कुठली असू शकेल? तो उद्देश अनेकार्थांनी साध्य करू शकणार्‍या संकल्पनांना बळ द्यावे हीच गणेशाचरणी प्रार्थना.

- Advertisment -

ताज्या बातम्या