Wednesday, May 13, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १३ एप्रिल २०२६ - फिरुनी नवी जन्मेन मी!

संपादकीय : १३ एप्रिल २०२६ – फिरुनी नवी जन्मेन मी!

वसुंधरा ज्या ऋतूत प्रसन्न, उत्साहाने परिपूर्ण आणि अगदी दृष्ट लागेल अशा सौंदर्यात न्हालेली असते, त्याच पद्धतीने अत्यंत उत्फुल्ल जीवन जगलेल्या स्वरस्वामिनी आशाताई भोसले यांनी त्यांचे स्वर्गीय सूर चिरकालासाठी मागे ठेवत वसंत ऋतू अगदी बहरात येऊन शेवटाकडे निघालेला असतानाच या जगाचा निरोप घ्यावा, ही निसर्गाने त्यांना दिलेली रसपूर्ण मानवंदना म्हणावी लागेल.

खरे तर जीवन जगतो तो सर्वसामान्य माणूस. आशाताई जीवन जगल्या असेम्हणता येणार नाही, त्या जीवनात संपूर्णपणे रमल्या, असेच म्हटले पाहिजे. केवळ कलावंत आणि गायन क्षेत्रातील मंडळींसाठीच त्यांचे जीवन आदर्श नव्हते तर विधात्याच्या कृपेने आपल्याला मिळालेल्या आयुष्यात वाट्यास आलेली भूमिका समरसून निभावत भरभरून त्याचा आनंद कसा घ्यावा, याचा वस्तुपाठ त्यांनी सर्वांसाठीच उभा केला. त्यांच्या परिवारिक जीवनात आलेल्या अडचणी व संकंटाबद्दल जास्त चर्चा लोकांनीच केल्या; मात्र स्वत: आशाताई हे रडगाणे कधीच गायल्या नाहीत. संपूर्ण जीवनच वसंत ऋतू मानत,
आला, वसंत ऋतू आला
रसरंगाची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण,
चैतन्याच्या गुंफित माला

रसिकराज पातला
या त्यांनी गायलेल्या गाण्याप्रमाणेच त्यांचा जीवनप्रवास राहिला. चाकोरीपेक्षा थोडे जरी वेगळे अनुभव जगताना आले तर बहुतेक लोक पुढचा काळ केवळ कंठतात; परंतु त्याचा बाऊ न करता आशाताईंनी मंगेशकर घराण्याला दैवी देणगी म्हणून मिळालेल्या कंठातून कोट्यवधी रसिकांना आठनऊ दशके तृप्तीत सचैल न्हाऊ घातले.

- Advertisement -

श्री मंगेशीदेवीची जन्मजात कृपा लाभलेल्या मंगेशकर घराण्यात भारतरत्न गानकोकिळा लतादीदी या सर्वात ज्येष्ठ सदस्य. एरवी, एवढ्या महान आणि कर्तृत्ववान व्यक्तीच्या छायेखाली अन्य सदस्य खुरटून जातात; पण हा परिवारच असामान्य असल्याने मीनाताई, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही सर्वच भावंडे गायन-संगीत क्षेत्रात स्वत:च्या खास वैशिष्ट्यांसह प्रसिद्ध होऊन एकेक विशाल वृक्ष झाली. त्यांच्या सावलीत लोकांना जो गारवा मिळाला, तो प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अलौकिक ठेवा म्हणावा लागेल. खरेतर, एकाच क्षेत्रातील दोन महान व्यक्तित्वांची तुलना करण्याची नसती उठाठेव आपण करू नये; परंतु संगीत क्षेत्रातील समीक्षकांनाच लतादीदी व आशाताई यांच्या गायनातील वेगवेगळा बाज टिपण्याचा मोह झाला आणि दोघींची बलस्थानेही त्यांनी मांडून ठेवली.

या निरीक्षणानुसार, लतादीदी स्वरांच्या माधुर्याच्या बाबतीत आशाताईंना सरस होत्या; मात्र आशाताईंनी जेवढी वैविध्यपूर्ण गाणी म्हटली, तेवढे प्रयोग लतादीदींनी केले नाहीत. कदाचित, त्यांनी स्वत:च ती सीमारेषा आखून घेतली असावी. वास्तवात, उभय भगिनींचा चित्रपट संगीत क्षेत्रात उदयास येण्याचा आणि नंतरच्या काळात त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा कालखंड जवळपास एकच; पण तरीही एकीने दुसरीला झाकाळून टाकले असे झाले नाही. कारण एकच, दोघीही तितक्याच श्रेष्ठ होत्या. लतादीदींबद्दल संपूर्ण आदर ठेवूनही म्हणावेसे वाटते, की अमूक एका संगीतकाराकडे यापुढे कधी गाणार नाही, अशी त्यांच्यासारखी प्रतिज्ञा आशाताईंनी केल्याचे वा मनात कोणाबद्दल किल्मिष ठेवल्याचे ऐकिवात नाही. दोघींमध्ये सुप्त स्पर्धा होती, असे बोलले जायचे; परंतु त्यांच्यावरील स्व. दीनानाथजी व स्व. माईंचे संस्कार असे, की त्यांच्यातील जिवाभावाच्या नात्यामुळे या चर्चेला कोणीही सिद्ध करू शकले नाही.

पुन्हा, ओ. पी. नय्यर यांच्याशी वाद झाल्यानंतर लतादीदींनी त्यांच्याबरोबर चित्रसंगीत बंद केल्याने नय्यर साहेबांना आशादीदींकडूनच गाणी गाऊन घ्यावीशी वाटली. ही होती मक्तेदारी! आणि ती या बहिणींनी केवळ देवदत्त गळ्याच्या आधारावर नव्हे तर कळायला लागल्यापासून अतोनात मेहनत, संघर्ष करून; तसेच अफाट कौटुंबिक परवड सहन करत स्थापित केली होती. आशाताईंचा एक वेगळा गुण म्हणजे, स्वत:च्या स्थानाला धक्का लागू नये म्हणून त्यांनी कोणा कलाकाराची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला नाही. या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांचे वागणे शेवटपर्यंत अगदी दिलखुलास आणि मोकळे राहिले. केसात माळलेली टवटवीत फुले, आनंदी-हसरा चेहरा आणि महादीर्घ संगीत कारकीर्दीचा कोणताही अहंकार न जोपासता नवख्या कलाकारांबरोबरही गाण्याची तयारी! त्यांच्या हजारो सदाबहार गाण्यांप्रमाणेच सदैव फुललेले हे व्यक्तिमत्व होते. या पृथ्वीतलावरील त्यांची सात वर्षे उणे शतकाची जीवनयात्रा रविवारी थांबली. त्यांच्याच एका गाण्यातील,
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी,
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

हे सूर आसमंतात सदैव गुंजत राहतील..

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दोन महिन्यांपूर्वीच विधानपरिषद मतदारांची माहिती निवडणूक आयोगाला सादर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यात पुन्हा एखादा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाआधी विधानपरिषदेच्या...