Friday, June 19, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १४ नोव्हेंबर २०२५ - मागणं लई नाही!

संपादकीय : १४ नोव्हेंबर २०२५ – मागणं लई नाही!

एका अविवाहित युवकाने शरद पवार यांना लिहिलेल्या पत्राने गंभीर सामाजिक समस्येकडे समाजाचे लक्ष वेधले गेले आहे. प्रयत्न करूनही विवाह होत नाही, तो जमवून देण्याचे साकडे त्याने शरद पवारांना पत्राद्वारे घातले आहे. त्याचे ते पत्र माध्यमात प्रसिद्ध झाले असून चर्चेचा विषय ठरले आहे. प्रसंगी आपण पत्नीच्या घरी राहायलादेखील तयार आहोत, तिच्या घरी चांगले काम करून उत्तम संसार करण्याची हमी देण्यासदेखील तयार आहोत, असे त्याने सांगितल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. अनेक युवकांनी याआधीही असा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

एका युवकाने आमदारांना साकडे घातल्याची ध्वनिफित फिरली होती. लग्न जमत नसलेल्या युवकांनी नवरदेवाच्या वेषात तीन-चार वर्षांपूर्वी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तोदेखील गाजला होता. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांचे विवाह न जमणे ही खोलवर मुरत जाणारी समस्या बनत आहे. या समस्येत जाणत्यांनी लक्ष घातले नाही तर एकप्रकारच्या सामाजिक अस्वास्थ्याला आणि असमतोलाला समाजाला सामोरे जावे लागण्याचा धोका नाकारला जाऊ शकेल का? कोणी वेगळ्या वाटेने त्याकडे लक्ष वेधले तर त्या त्यावेळी तात्पुरती चर्चा होते. पण त्यावर घुसळण, चिंतन आणि मंथन घडल्याचे आढळत नाही. या बदलाची अनेक कारणे सांगितली जातात. मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी प्रमाण असे कारण लगेच पुढे केले जाताना आढळते. त्यात तथ्य असू शकेल. तथापि या समस्येचा चौफेर विचार करण्याची गरज आहे.

परस्परांकडून वाढत्या आणि जाणत्यांच्या मते काहीशा अवास्तव अपेक्षा हा चिंतनाचा मुद्दा ठरावा. दिसण्याची, पगाराची, राहणीमानाची तुलना सर्रास केली जाताना आढळते. शहरी आणि ग्रामीण भागाप्रमाणे अपेक्षा बदलतात इतकाच काय तो फरक. उदाहरणार्थ, मुलगा शेतकरी नको, पण त्याच्याकडे शेती पाहिजे आणि मुलगी शेतात काम करणार नाही या दुटप्पी अपेक्षेचा मुले आणि त्यांच्या पालकांनी कसा सामना करावा? उच्च शिक्षण आणि मग नोकरी यामुळे मुलांचे स्थैर्य आणि स्थिरता प्राप्त होण्याचे वय वाढत जाते. पण तरीही विवाहाच्या वयात गाडी-बंगला-चांगली बचत आणि शिल्लक मुले तरी कुठून आणू शकतील? अनेक

मुलांच्या अपेक्षांमध्येही असाच गोंधळ आढळतो. मुलगी शिकलेली पण नोकरी न करणारी हवी असते. पुरुषी समाज परंपरेप्रमाणे अप्रत्यक्षपणे तिने डोके चालवू नये, असेही त्यांना म्हणायचे असू शकेल. हे कसे शय होऊ शकेल? ही वानगीदाखलची कारणे असू शकतील. पण खोलवर विचार केला तर अत्यंत क्षुल्लक कारणांवरूनदेखील ठरलेले विवाह मोडतात किंवा विवाहपश्चात काहीच दिवसात काडीमोड घेण्याची भाषा एकमेकांना ऐकवली जाते. शहरी भागातील युवक अनेक महिला करत असलेल्या कायद्याच्या गैरवापराकडे अंगुलीनिर्देश करतात. याच कारणामुळे काही युवकांनी केलेल्या आत्महत्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशा विविध कारणांचा उहापोह यानिमित्ताने व्हायला हवा. कारण कारणे कितीही आणि कोणतीही असली तरी वय उलटून गेले तरी विवाह न होणे हे नैराश्याचे एक प्रमुख कारणदेखील मानले जाते. त्याकडे मानसोपचारतज्ज्ञ समाजाचे लक्ष वेधायचा प्रयत्न करत आहेत.

कोणी कानोसा घेतला तर घरोघरी वयाची किमान तिशी उलटलेली परंतु विवाह न जमलेली मुले आणि मुली आढळतील. असे का घडत आहे यावर मुला-मुलींच्या पालकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. विवाह संस्था एकप्रकारे कुटुंब संस्था आणि समाजाचा पाया आहे. तीच कोसळली तरी कुटुंब संस्था पर्यायाने सामाजिक घडीदेखील कोसळेल. असे झाले तर त्याचे भीषण परिणाम समाजालाच भोगावे लागतील. तसे होणे कोणालाही परवडणारे नाही. यावर तडजोड हा एक उपाय मानसतज्ज्ञ सुचवतात. संबंधित सर्वच घटकांनी तडजोडीची तयारी दाखवली तरी या समस्येचा ताण थोडातरी हलका होण्याच्या शयतेकडे जाणत्यांचे लक्ष वेधतात. शरद पवार यांना लिहिलेले पत्र असे अनेकार्थांनी गंभीर मानले जायला हवे. शरद पवार जाणते नेते आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्याभोवती विचारवंतांचे वर्तुळ असते. या समस्येवर जाणत्यांना एकत्र आणण्याची आणि समग्र विचारांची सुरुवात करण्याचे त्यांनी निमित्त ठरावे आणि परिस्थितीतून मार्ग काढण्याची प्रेरणा ठरावे अशीच विवाहेच्छुक तरुण-तरुणींची अपेक्षा असेल.

ताज्या बातम्या

Crime News : बनावट सह्या करून 88 लाखांचे कर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भागीदारी संस्थेच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून एका व्यावसायिकाला भागीदार दाखवत त्याच्या नावाचा वापर करून 88 लाख रूपयांचे वाहन कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार...