Saturday, May 9, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १६ फेब्रुवारी २०२६ - जाती कुळ माझे गेले हारपोनि

संपादकीय : १६ फेब्रुवारी २०२६ – जाती कुळ माझे गेले हारपोनि

जातमुक्त समाज घडवण्यासाठी एका गावाने पुढाकार घेतला आहे. तसा ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर केला आहे. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने हा चमत्कार घडवून दाखवला आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी कोणाच्याही जातीचा उल्लेख होणार नाही. सार्वजनिक पातळीवर जातीय तेढ निर्माण होणार याची दक्षता सर्वांनी घ्यायची. तसा मजकूर गावातील कोणीही समाजमाध्यमांवर टाकायचा नाही. जाणीवपूर्वक कोणी असे वर्तन केले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. संविधानातील समता आणि बंधुता या तत्त्वांचे पालन सर्वांनी करायचे,’ अशा आशयाचा तो ठराव आहे. गावकर्‍यांनी या प्रयत्नांना साथ दिली आहे.

- Advertisement -

ठराव अंमलबजावणीचे परिणाम अनुभवास येण्यासाठी काही काळ जावा लागेल. तथापि, असा ठराव मंजूर करण्याचे धाडस आणि एकोपा सौंदाळे ग्रामस्थांनी दाखवला, तो कौतुकास्पद मानावा लागेल. जातीमुक्ततेच्या वाटेवरचे ते पहिले पाऊल ठरू शकेल. त्यांनी संतांचे विचार अंगीकारण्याचे ठरवले आहे. संत आणि समाजसुधारकांनी जातिमुक्ततेसाठी त्यांचे आयुष्य वेचले. त्यावर कठोर प्रहार केले. समस्येची जाणीव असल्याशिवाय तिच्यावर उपाय कसे शोधले जाऊ शकतील? जातीपातींच्या भेदाभेदांमुळे समाज विघटित होण्याचा धोका वाढत आहे. माणसे माणसांशी माणसासम वागणे विसरतात. आंतरजातीय विवाह अजूनही व्यापक पातळीवर समाजमान्य नाहीत. ही विषवल्ली इतकी खोलवर रुजली आहे की, जातिबाह्य विवाह केला म्हणून माणसे त्यांच्या पोटच्या गोळ्याच्या जीव घ्यायला मागे पुढे पाहात नाहीत.

समाजमन अस्वस्थ करणार्‍या अशा घटना अधूनमधून प्रसिद्ध होतात. समाजमाध्यमांवर प्रकाशित होणारा मजकूर या मुद्यावर अनेकदा विखारी सिद्ध होतो. समाजमाध्यमांचा वापर त्याच भाषेत सांगायचे झाले तर, ‘नरेटिव्ह’ ठसवण्यासाठी केला जातो. जातींशिवाय राजकारणाचे पान हलू शकत नाही हे वास्तव आहे. जातीपाती नको असे सगळेच नेते म्हणतात; पण निवडणुकीच्या पडद्याआड जातीचीच गणिते मांडली जातात. दुर्दैवाने कोणताही पक्ष याला अपवाद नाही. परिणामी, जाती अधिकाधिक घट्ट होत जातात. हे समाजविघातक आहे याची जाणीव कदाचित सौंदाळावासीयांना झाली असू शकेल. त्यामुळेच त्यांनी निदान गावपातळीवर जातिमुक्त समाज घडवण्यासाठी पुढाकार घेतला असावा. सामाजिक रूढींमध्ये बदल घडावा अशी सामान्य माणसांची इच्छा असते. पण तो बदल स्वतःपासून सुरू करायचे धाडस सगळीच माणसे दाखवू शकत नाहीत. एकटादुकटा माणूस काय करू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडत असावा. पण तसे प्रयत्न करणार्‍यांच्या मागे मात्र सामान्य माणसे त्यांचे पाठबळ उभे करू शकतात. तसा अनुभव महाराष्ट्रातील अनेक गावे घेतात.

राज्यातील अनेक ग्रामपंचायती अनिष्ट रूढी आणि परंपरा नष्ट करण्यासाठी आणि चांगले पायंडे पाडण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. अनेक गावांनी विधवा प्रथा संपुष्टात आणली आहे. काही गावे डीजे वाजवण्यावर बंदी घालतात. काही गावांमध्ये मुलगा-मुलगी लिंगगुणोत्तर समसमान होताना आढळते. ते जागरूकता निर्माण झाल्यामुळेच. अशा बदलांची सुरुवात एका गावाने केलेली आढळते. अनेक गावे त्यापासून प्रेरणा घेतात आणि परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होतात. सामूहिक निर्णय जनमानसावर प्रभाव टाकतो. बदल स्वीकारण्याचा नैतिक दबाव निर्माण करू शकतो. लोक एकत्र आले तर बदलाची प्रक्रिया वेगवान बनते. ती प्रक्रिया थोडीशी सोपी होऊ शकते. लोकसहभाग शाश्वत विकासाचा मार्ग मानला जातो. सौंदाळे गावाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे.

कागदावरचा बदल प्रत्यक्षात उतरवणे वाटते तितके सोपे नाही. कारण वर्षानुवर्षे जाती ठाण मांडून आहेत. त्यांची हकालपट्टी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. त्या बदलाची भविष्यकालीन उपयुक्तता लोकांना पटवून द्यावी लागेल. त्यांच्या शंकांचे निरसन करावे लागेल. थोडक्यात, फळाची तातडीने अपेक्षा न करता काम करत राहावे लागेल. ज्यांच्या प्रयत्नांनी या बदलाचे बीज रोवले गेले, त्यांना हतोत्साहित होऊन चालणार नाही. यशाची फूटपट्टी लगेच लावणे निराशा निर्माण करणारे ठरू शकेल याची जाणीव ग्रामस्थांना असेलच. सामूहिक प्रयत्नातून गाव जातिमुक्त करण्याचे त्यांचे प्रयत्न निश्चित प्रेरणादायी ठरतील.

ताज्या बातम्या

अ‍ॅसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

0
येवला | प्रतिनिधी Yeola तालुक्यातील देवळाणे येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांचेवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत....