Wednesday, May 6, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १६ जून २०२५ - या वेडाचाराचे काय करायचे?

संपादकीय : १६ जून २०२५ – या वेडाचाराचे काय करायचे?

समर्थ रामदासस्वामींनी मूर्खांची लक्षणे सांगितली, शाहीर अनंत फंदी यांनी सामाजिक जीवनात कसे वागावे आणि मुख्यत्वे कसे वागू नये हे सांगणारा फटका लिहिला. पण रीलसाठी माकडचेष्टा करणार्‍यांनी ते मनावर घ्यायचे नाहीच ठरवले तर त्याला कोण काय करू शकेल? झोपलेल्यांना झोपेतून जागे करणे शक्य असते. तथापि झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे महाकठीण काम. रीलसाठी वाट्टेल ते करणार्‍यांचे तसे झाले आहे. या वेडेपणात अनेकांचा जीव गेला, अनेकांच्या वाट्याला कायमचे अपंगत्व आले पण बहुसंख्य माणसे सुधारण्याची चिन्हे अजिबात नाहीत. फाशी जाणे अभिमानास्पद आहे का? अती गंभीर गुन्हा करणार्‍या दोषीला न्यायालय फाशीची टोकाची शिक्षा सुनावते.

पण एका महाभागाने त्याचा देखील रील बनवायचा प्रयत्न केला. ते नाटक करता करता त्याच्या गळ्याला खरोखरच फास बसला. त्याची प्रकृती गंभीर आहे. डोंगराच्या टोकावर उभे राहून रील बनवणार्‍या तरुणीचा खाली कोसळून मृत्यू झाला. एकजण धावत्या रेल्वेगाडीखाली झोपला. असे जीवघेणे वेडाचार माणसे का करतात? प्रसंगी मृत्यू येऊ शकेल ही भावना देखील त्याला आवर का घालू शकत नाही? अशा घटनांनी अस्वस्थ व्हावे असा एकही दिवस उगवेनासा झाला आहे.

- Advertisement -

समाजमाध्यमांवर मिळणार्‍या प्रसिद्धीचा हा सगळा खेळ आहे. एरवी कर्तृत्वान व्यक्तींनाच प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्राप्त होत असे. त्यांच्यावर प्रसिद्धीचा झोत पडत असे. प्रतिष्ठा प्राप्तीसाठी कर्तृत्व अपरिहार्य होते. समाजमाध्यमांनी प्रसिद्धी स्वस्त व सोपी केली. कोणीही उठावे, काहीही करावे आणि ते समाजमाध्यमांवर टाकावे इतके ते सहज शक्य झाले आहे. जितका जास्त वेडाचार तितकी जास्त प्रसिद्धी. त्यांच्यासारखे वेडे मग यांची दखल घेतात. त्यांच्या मुलाखती घेतात. त्यांना त्यातून किती पैसे मिळतात यावर भर दिला जातो. तेही आकडे सांगतात. त्याची खात्री करून घेण्याची गरज कोणालाच वाटत नाही. परिणामी हजारो रिकामटेकड्यांना रील बनवणे हा अर्थप्राप्तीचा एका सोपा मार्ग वाटायला लागतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाला तसेही वैचारिक अधिष्ठान नसतेच. आडातच नसते मग पोहर्‍यात कसे येणार? त्यामुळे अशा बहुसंख्य मुलाखती हा नवा वेडाचार ठरतो.

अर्थात त्याचा दोष एकट्या रिल्सटारचा पण नसतो. लाखोंच्या संख्येत त्यांना बघणारे प्रेक्षक देखील तितकेच दोषी मानले जायला हवेत. त्यांच्यासाठी भलेही ती काही सेकंदांची करमणूक असते पण त्यामुळे रिल्सटार सोकावतात. मग तसे करून बघणार्‍यांची संख्या वाढत जाते. जीवघेण्या धाडसाचे नवनवे मार्ग शोधले जातात. वास्तविक समाजमाध्यमांवर देखील विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीला वाहिलेली अनेक खाती असतात. अत्यंत वैचारिक आणि सखोल माहिती देणारे प्रभावक देखील आहेत. पण त्यांना मिळणारी पसंती आणि रीलस्टारना मिळणारी पसंती यात शब्दशः जमीन आकाशाचे अंतर आढळते. हा दोष प्रेक्षकांचा देखील आहे. बरे, दिवसभर प्रचंड कष्ट उपसल्यावर क्षणभराच्या विरंगुळ्याचा मोह होणे स्वाभाविक. पण त्यासाठी जीवघेण्या स्टंटला अतिरिक्त पसंतीही जीवघेणीच की. मानसोपचार तज्ज्ञांना देखील आव्हान वाटावे असा हा सगळा गुंता आहे.

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...