राहाता |प्रतिनिधी| Rahata
पैशांची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय राहाता तालुक्यात आला आहे. घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी एका 23 वर्षीय तरुण विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रिया शुभम ढगे असे या दुर्दैवी मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्याविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिंसांनी दिलेल्या माहितीनुसार मे 2024 पासून ते 3 मे 2026 पर्यंत सासरच्या मंडळींकडून प्रियाचा सतत छळ सुरू होता. घराचे बांधकाम करायचे आहे, तुझ्या बापाकडून 4 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत सासरच्यांनी प्रियाला वेळोवेळी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि इतकेच नव्हे तर तिला अनेकदा उपाशीपोटी ठेवून तिचा छळ केला. सासरच्या या अमानुष त्रासाला कंटाळून अखेर प्रियाने एकरुखे (ता. राहाता) येथील वडीलांच्या राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. फिर्यादी अनिल बाळासाहेब बोर्डे (रा. एकरुखे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी आरोपीं शुभम राजेंद्र ढगे (पती), राजेंद्र आबासाहेब ढगे (सासरे), ्प्रतिभा राजेंद्र ढगे (सासू) सर्व रा. कोर्हाळे, ता. राहाता यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 115(1), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत करत आहेत. ऐन तारुण्यात एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिल्याने संपूर्ण राहाता तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
एका तरुण मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या आरोपींना सोडले जाणार नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
– नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक राहाता.





