चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात आणलेल्या ‘डीपसीक’ने या क्षेत्रात उडवलेली खळबळ तात्पुरती शमली असली तरी या वादळाने अनेक देशांमधील संशोधकांची झोप उडवली हे मात्र नक्की. या क्षेत्रात सखोल संशोधन सुरु असल्याचे भारताला देखील जाहीर करावे लागले. तंत्रज्ञान क्षेत्रात जेव्हा नवे काही उदयाला येते तेव्हा तंत्रज्ञान मानवावर मात करू शकेल, नोकर्यांवर गदा आणेल अशी भीती व्यक्त होते. हे मुद्दे जागतिक व्यासपीठांवर नियमित चर्चेचा विषय आहेत.
तज्ञांचेही या मुद्यांवर एकमत आढळत नाही. त्यात लोकांचे याविषयीचे अज्ञान या भीतीची तीव्रता अजूनच वाढवते. तथापि ज्येष्ठ आणि प्रभावशाली उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मात्र युवा पिढीला एक मोलाचा सल्ला दिला आहे. माणूस कृत्रिम बुद्धीने नव्हे तर स्वतःच्या बुद्धीनेच प्रगती करू शकतो असे बजावले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक साधनांचा ज्ञान मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने वापर करणे जरूर शिका पण ‘क्रिटिकल थिंकिंग’ सोडून देऊ नका असे आवाहन त्यांनी युवा पिढीला केले आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सोप्या भाषेत सुयोग्य निर्णय घेणे. ती पद्धती कशी असते? माणूस माहिती गोळा करतो. त्याच्या आधारे ज्ञान प्राप्त करतो. अनुभवसमृद्ध होतो.
याच्या आधारे परिस्थितीचे आकलन आणि विश्लेषण करून निर्णय घेतो. ते मानवी मेंदूचे अद्वितीय वैशिष्ट्य मानले जाते. कर्ट गोडेल हे प्रसिद्ध तर्कशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्वज्ञ देखील होते. मानवी मेंदू हा संगणक नाही. तो त्यापेक्षा अधिक जटिल आहे असे ते म्हणत. साधनांचा वापर करणे गैर नाही. तथापि युवा पिढीतील अनेक जण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाऊ शकतील का? कोणत्याही मुद्यावर विचार करणे, आव्हानांवर प्रयत्नांनी मात करणे विसरतील का? यातायात करण्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेकडून विनासायास समस्या सोडवून घेण्याची सवय लागू शकेल का? अशी भीती संशोधकही सातत्याने व्यक्त करतात. ती खरी ठरण्याचा धोकाही त्यांना जाणवतो. त्या धोक्याचे मूळ एका सामाजिक सवयीत दडलेले असू शकेल.
लोक मोबाईल-त्यावरील समाजमाध्यमे यांच्या आहारी जात आहेत. किंबहुना गेले आहेत. परिणामी माणसाची एकाग्रता, ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, विचार करणे, तर्कसंगतता अशा अद्वितीय क्षमता क्षीण होत आहेत याकडे संशोधक सातत्याने लक्ष वेधून घेतात. याचा क्रिटिकल थिंकिंग वर परिणाम होणे अपरिहार्यच नाही का? कृत्रिम साधनांमुळे माणूसच बिनकामाचा ठरणे म्हणजे सामाजिकतेचा तोल ढासळणे होय. तेव्हा, माणूस तंत्रज्ञानात प्रगती करतच राहील. पण मानवी मेंदूच्या जटिलतेचा-क्षमतांचा विसर त्याला पडू नये आणि तंत्रज्ञानाचा भस्मासुर होऊ शकेल याचा विसर पडू नये इतकेच.