Sunday, June 21, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १७ नोव्हेंबर २०२५ - ‘माणसापरीस मेंढरं बरी…’

संपादकीय : १७ नोव्हेंबर २०२५ – ‘माणसापरीस मेंढरं बरी…’

काल-परवा नाशिकमधील महात्मानगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनखात्याने पिंजर्‍यात जेरबंद केला. त्यादरम्यान सुजाण म्हणवल्या जाणार्‍या माणसांची गर्दी पाहून आणि प्रसिद्धीचा त्यांचा हव्यास पाहून बिबट्यासुद्धा कदाचित हसला असेल. शहरी भागात बिबट्या शिरल्याचे वृत्त पसरले की, बघ्यांच्या अंगात जणू नवा उत्साह संचारतो. हौशे-नवशे आणि गवशे लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतात. बिबट्या पकडण्याचे काम वनविभागाने आपल्यावरच सोपवले आहे, असाच त्यांचा आवेश असतो. तथापि ‘बिबट्या पकडणे हे येर्‍या-गबाळ्यांचे काम नोहे! तेथे पाहिजे जातीचे’ हेच खरे असते.

- Advertisement -

बिबट्याला पकडणे हे वनविभागाच्या सेवकांचे काम आहे. मुळात कोणताही वन्यप्राणी पकडणे हे एक मोठे आव्हान असते. अतिउत्साही लोकांच्या गर्दीमुळे ते अधिक आव्हानात्मक बनते. गोंधळलेल्या किंवा आक्रमक झालेल्या प्राण्याला कसे हाताळायचे? कसे पकडायचे? याचे किमान ज्ञान वनसेवकांना असते, असे गृहीत आहे. तथापि अनावश्यक गर्दी करून त्यांचे ते काम आपण आणखी अवघड करीत आहोत याचेही गर्दी करणार्‍या बघ्यांना नसते. बिबट्याच्या घटनांमध्ये तसे ते नेहमीच सुटते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. ‘माणसापरीस मेंढरं बरी…’ या ओळी येथे चपखलपणे लागू होतात. बिबट्या हा वन्यजीव आहे. प्रसंगी तो हिंसक बनू शकतो. बिबट्या प्रदर्शनातील वस्तू नव्हे, याचाही विसर उत्साही लोकांना पडतो.

प्राणितज्ज्ञांच्या मते माणसे बिबट्याला जितकी घाबरतात; तितकाच बिबट्यादेखील माणसांना घाबरतो. पळून जायचा प्रयत्न तो करतो, पण माणसांच्या गर्दीने तो गोंधळतो. त्याला रस्ता सापडत नाही. तो सैरावैरा धावत सुटतो. माणसांवर हल्लादेखील करू शकतो. महात्मानगरला हेच घडले. समजा, बिबट्या बिथरला, आक्रमक झाला, त्याने हल्ला केला आणि त्यात बघे जखमी झाले तर त्याचा दोष नेमका कोणाचा? माणसांच्या बेपर्वाई वृत्तीचा भार मात्र बिबट्याला वाहावा लागतो. गर्दी त्याला ‘नरभक्षक’ ठरवून मोकळी होते. बिबट्याला ‘डार्ट’ मारून बेशुद्ध करतात. गर्दी आणि बिथरलेला बिबट्या यामुळे ‘डार्ट’ मारण्यासाठी नेम धरणेदेखील अशय होते. सैरावैरा पळणार्‍या किंवा अडचणीच्या जागी लपून बसणार्‍या बिबट्याला ‘डार्ट’ मारणे लोकांना सोपे वाटते का? ‘डार्ट’ मारल्यानंतरही त्या प्राण्याला बेशुद्ध होण्यास काही कालावधी जाऊ शकतो, हे किती लोकांना माहीत असेल? अनेकदा ‘डार्ट’ मारणार्‍या सेवकांना धक्काबुक्की सहन करावी लागते.

बिबट्या शहरी भागात शिरला की, बहुधा असेच घडते. सामान्य माणसांची बेफिकिरी एकवेळ समजण्यासारखी असू शकेल, पण समाजात शहाण्या मानल्या जाणार्‍यांना, समाजाचे प्रतिनिधी म्हणवून घेणार्‍यांनासुद्धा ते कळू नये का? त्यांनीही सामान्यांसारखीच घटनास्थळी धाव घ्यावी का? पोलिसांनी अशावेळी नेमके काय करावे? सामान्य माणसांना ते एखादी काठी मारू शकतात, पण शहाण्या-सुरत्यांना कसे आवरायचे? प्रभावशाली व्यक्तींनी गर्दी पांगवणे, लोकांना समजावून परिसर मोकळा करणे अपेक्षित असते, पण तेच गर्दीचा भाग होऊन आणि बिबट्याला ‘जनसंपर्काचे माध्यम’ बनवू लागले तर? बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढत आहे. त्याने माणसांना मारल्याच्या घटना वाढत आहेत. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. ती समस्या सोडवण्यासाठी जाणत्यांच्या साहाय्याने उपाययोजना करणे हे प्रभावशाली व्यक्तीचे काम आहे.

२०२१ साली राज्य सरकारने राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यता दिली आहे. त्या आराखड्यात मानव-वन्यजीव संघर्षावर उपाययोजना आणि बचावकार्य याचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्याच्या अंमलबजावणीविषयी मात्र तज्ज्ञांत साशंकता आढळते. त्यातील तथ्य शोधून आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याऐवजी बिबट्या पकडण्याच्या मोहिमेला हजेरी लावून प्रभावशाली मानली जाणारी माणसे नेमके काय साध्य करतात? बिबट्या मानवी वस्तीत शिरला तर गर्दी करु नये. संबंधितांना त्यांचे काम शांतपणे आणि थंड डोयाने करू द्यावे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याला त्यांचे प्राधान्य असते. त्यात अतिउत्साह दाखवून अडथळे आणू नयेत, एवढा समंजसपणा लोकांकडून अपेक्षित असतो. योग्य वयात लोकशिक्षण देणे किती गरजेचे आहे हेच या घटनेवरून लक्षात येते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जूनअखेर नगर, नाशिकमध्ये मान्सून बरसण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मंगळवार 23 जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता असून या ठिकाणी सध्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. वेंगुर्ला, देवगड हर्णाई...