इराण-इस्त्राईल युद्धाची घोषणा करून संपूर्ण जगाला एका अनिश्चिततेच्या अवस्थेत ढकलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता एकाकी पडल्याचे दिसत आहे. या युद्धात इराणचा चुटकीसरशी नायनाट करू अशी दर्पोक्ती सुरुवातीला करणारे ट्रम्प इराणची प्रतिकारशक्ती पाहून आता हे युद्ध आम्ही दोन-चार दिवसांत संपवू, अशी भाषा करू लागले आहेत. अठरा दिवसांनंतरदेखील हे युद्ध संपण्याची शक्यता दिसत तर नाहीच उलट इराणचा प्रतिकार वाढला असून त्यांनी होर्मुज खाडीतील जलव्यापारावर नियंत्रण मिळविल्याने ट्रम्प यांचीच नाही तर संपूर्ण जगाचीच कोंडी झाली आहे.
इराणच्या सर्वोच्च नेत्यासह प्रमुख सहकार्यांना हल्ल्यात ठार करून व अनेक शहरे बेचिराख करूनही इराण मागे हटायला तयार तर नाहीच उलट त्यांनी अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करीत युद्धाची व्याप्ती वाढविली आहे. आता या युद्धात इतर देशांना सहभागी होण्याचे आवाहन करून अमेरिकेने जणू एक पाऊल मागे घेतल्याचे दिसते आहे. इराणने या युद्धात वेगळी खेळी करत होर्मुज सामुद्रधुनी बंद करून जगाची आर्थिक नाकेबंदी केली आहे. त्यामुळे या युद्धापासून स्वतःला दूर ठेवणारे अनेक देश अप्रत्यक्षपणे या युद्धात ओढले गेले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारी अत्यंत मोक्याची सागरी जलवाहिनी आहे.
जगातील सुमारे २० टक्के खनिज तेल या अरूंद मार्गातून वाहून नेले जाते. हा मार्ग मध्यपूर्वेतील खनिज तेल उत्पादक देशांना जगाशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. जागतिक सागरी तेलाची वाहतूक मोठ्या प्रमाणात याच मार्गातून होते. हा मार्ग इराणने बंद केल्यामुळे त्याचे परिणाम जागतिक तेलाच्या किमतीवर पडू लागले आहेत. गॅस व पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा थांबल्याने अनेक देशांत आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने निर्माण झालेल्या कोंडीत अनेक देश नाहक भरडले जात आहेत. भारताचाच विचार केला तर गॅसअभावी अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडे हॉटेल बंद पडल्याने खायलादेखील काही नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजं नेण्यास इराणने बंदी केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, जपान, ब्रिटन, दक्षिण कोरियासह मित्र देशांना होर्मुज सामुद्रधुनीत तेल टँकर्सच्या सुरक्षेसाठी संयुक्त नौदल गस्त घालण्याचा प्रस्ताव देतानाच नाटो देशांनी सहकार्य न केल्यास त्यांची सुरक्षा तसेच परस्पर संबंधांवर परिणाम होण्याचा इशारादेखील दिला. ट्रम्प यांच्या या धमकीवजा आवाहनाचा परिणाम मित्र राष्ट्रांवर झालेला सध्यातरी दिसत नाही. ऑस्ट्रेलिया आणि जपानने ट्रम्प यांचा संयुक्त गस्तीचा प्रस्ताव साफ धुडकावला तर इंग्लंड, जर्मनीसह युरोपातील मित्रांनीही तुमच्या लढाईत आमचे काय काम असा हेका धरल्याने ट्रम्प भडकले आहेत. चीनने होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी मदत केली नाही तर शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी बैठक पुढे ढकलली जाऊ शकते, असा सूचक इशारादेखील त्यांनी दिला. एकंदरीत इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद करून ट्रम्प यांचे नाक दाबले आहे. त्याचा व्हायचा तो परिणाम सध्या तरी दिसत असून मित्र राष्ट्रांसमोर मदतीची याचना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
ट्रम्प यांची सततच्या युद्धाची खुमखुमी ही आता त्यांच्या मित्र देशांनाही त्रासदायक वाटू लागली आहे. दस्तुरखुद्द अमेरिकेतही या युद्धाच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागले असल्याने ट्रम्प यांची दुहेरी कोंडी चालली आहे. एकीकडे ट्रम्प मित्र राष्ट्रांपुढे याचना करीत असताना इराण मात्र चीन, भारतासारख्या काही देशांना जहाज वाहतुकीस परवानगी देत आहे. युद्धात अतोनात हानी होत असतानाही शरणागती झिडकारून इराण राजनैतिक समझोते करून ट्रम्प व नेत्यानाहू या संबंधांना जशास तसे उत्तर देताना दिसत असल्याने युद्ध लांबण्याची भीती वाढली आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध आपण सोडवले अशा गमजा मारणारे ट्रम्प इराण-इस्त्राईल युद्धात मात्र तोंडघशी पडताना दिसत आहेत. ज्यांच्यासाठी हे सारे केले ते इस्रायलचे सर्वेसर्वा बिन्यामीन नेत्यानाहूदेखील ऐकायला तयार नाही अन् मित्र देशांनीही पाठ फिरविलेली, अशा अवघड परिस्थितीत ट्रम्प फसले आहेत. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशा अवघडलेल्या स्थितीत सन्मानजनक तोडगा निघणे सध्या अशक्य वाटत असल्याने युद्धाची अखेर भयावहतेकडे वाटचाल करू लागणे हे मानवजातीच्या दृष्टीने चिंताजनक आहे.





