Sunday, January 25, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १९ डिसेंबर २०२५ - शिल्पांचा‘सूत्रधार’

संपादकीय : १९ डिसेंबर २०२५ – शिल्पांचा‘सूत्रधार’

मराठी मातीतील शिल्पकार राम सुतार यांनी अखेरचा श्वास घेतला. ते खर्‍या अर्थाने शिल्पकलेतील किमयागार होते. त्यांचा परिसस्पर्श होताच दगडही त्यांच्याशी बोलू लागत. त्यांच्या मनातील व्यक्तिमत्वाचा आकार धारण करत. त्यांनी साकारलेली शिल्पे फक्त अचलमूर्ती नसत. ती शिल्पे त्या व्यक्तीमत्वाचे रूप प्रेक्षकांसमोर साकार करतात. त्या व्यक्तिमत्वांची थोरवी, महानतेकडे झालेला त्यांचा प्रवास, त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि गाजवलेल्या शौर्याची कथा सांगतात. जणू काही सुतार त्या दगडात प्राण फुंकत. प्रभू श्रीराम, स्टॅचू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अंदमानमधील स्वातंत्र्यवीर सावरकर, गोविंद वल्लभ पंत, महाराजा रणजित सिंग ही त्यापैकी काही उदाहरणे. त्यांच्यातील या अद्वितीय क्षमतेचे त्यांनीच एका मुलाखतीत बोलताना चपखल शब्दात वर्णन केले होते.

- Advertisement -

ते म्हणाले होते, ‘मी सुतार, म्हणजेच सूत्रधार. ज्याच्या हाती सगळी सूत्रे असतात. तो वारसा मला माझ्या पूर्वसूरींकडून मिळाला. त्यांच्याकडूनच आपुसकच ती कला माझ्या अंगात मुरली. मी ती अधिक बाणवली’. कोणतेही शिल्प साकारताना त्या व्यक्तिमत्वाशी एकरूप व्हावे लागते. त्यांचा सर्वांगाने अभ्यास करावा लागतो. त्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये प्रेक्षकांना जाणवायला हवीत. दगड कठीण असला तरी ध्यास मोठा हवा असे ते म्हणत. हाच वारसा त्यांचे चिरंजीव वास्तुविशारद आणि शिल्पकार अनिल सुतार समर्थपणे सांभाळत आहेत. राम सुतार महात्मा गांधीजींसोबत स्वदेशी चळवळीत सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांनी साकारलेले महात्मा गांधी ही त्यांची सर्वात आवडती निर्मिती होती. त्यांनी साकारलेला पहिला पुतळा गांधीजींचाच होता. त्यांनी नुकतीच वयाची शंभरी ओलांडली होती. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी सुमारे आठ हजारांपेक्षा जास्त शिल्पे साकारली आहेत.

YouTube video player

भव्यदिव्य आणि प्रचंड आकारांची शिल्पे साकारणे ही त्यांची ओळख आणि वैशिष्ट्य होते. त्यांचा अधिकाधिक कार्यकाळ दिल्लीत गेलेला असला तरी ते मूळचे उत्तर महाराष्ट्राचे. धुळ्यातील गोंदूर हे त्यांचे जन्मगाव. भवानी माता छत्रपती शिवाजी राजांना भवानी तलवार भेट देत असल्याचे कोरीव काम शाळेच्या पाटीवर केले होते, तेव्हा ते केवळ सातवीत होते. ते त्यांचे पहिले शिल्प. त्याला एका प्रदर्शनात तेव्हा पदक देखील मिळाले होते. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे यालाच म्हणत असावेत. ते भित्तिशिल्पे देखील साकारत.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पिढ्यांची कारकीर्द एकत्रित मांडणारे मोठे भित्तिशिल्प दिल्लीत त्यांच्याच संकल्पेनेतून आकाराला आलेले आहे. त्यांचे शिल्पकलेचे शिक्षण मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आटर्समध्ये झाले. तेव्हापासून सुरू झालेला प्रवास वयाची शंभरी गाठली तरी सुरूच होता. ‘राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘राम सुतार फाइन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या त्यांच्या कंपन्या, भव्यदिव्य शिल्पे बनवणार्‍या जागतिक कंपन्यांपैकी एक मानल्या जातात. जगातील सर्वात मोठे शिल्प बनवण्याचे स्वप्न त्यांनी खूप लहानपणापासून पाहिले होते. स्टॅचू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शिल्पाने त्यांची स्वप्नपूर्ती झाली. त्यावेळी ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या कलेची दखल जागतिक स्तरावर देखील घेतली गेली.

पद्मभूषणसारख्या अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा त्यापैकी एक पुरस्कार. शिल्पकलेचे मूळ भारतात आहे असे ते मानत. भारताचा तो वारसा अद्वितीय आहे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या कामाने देशाचे नाव जगात गाजवले. जगभरात त्यांनी बनवलेली सुमारे दोनशेपेक्षा जास्त शिल्पे बसवली गेली आहेत. युवा शिल्पकारांशी ते शय होईल तेव्हा संवाद साधत. त्यांना मार्गदर्शनदेखील करत. शिल्पे साकारण्यासाठी त्या कलेची आवड असणे ही पहिली अट आहे असे ते म्हणत. जगण्यासाठी पैसे लागतातच; पण त्यासाठीच फक्त शिल्पकला आत्मसात करू नका असा उपदेश राम सुतार नेहमी करत असत. असा हा शिल्पकार, महाराष्ट्र सरकारच्या भाषेत ‘स्टॅच्युमॅन’ समाजातून दूर प्रवासाला गेला आहे. आपल्याकडे अलीकडच्या काळात एकूणच समाजात म्हणा, वा शासनाच्या पातळीवर विविध कलांकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. करिअर म्हणून अशा कलांना प्रोत्साहन देताना राम सुतारांसारख्या अद्वितीय शिल्पकारांचे जीवन नव्या पिढीसमोर ठेवले तर अशा महान व्यक्तित्वांच्या जाण्यातून जी मोठी पोकळी निर्माण होते, ती भरून काढण्याची आशा ठेवता येईल.

ताज्या बातम्या

नाशिककरांच्या प्रतिसादाने ‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ हाऊसफुल्ल!

0
​नाशिक | प्रतिनिधी Nashik ​दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’मध्ये प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी सुटीचा मुहूर्त साधत नाशिककरांनी ब्रम्हेचा इस्टेट येथे गर्दी केली. उद्या...