राज्यातील सर्व पुलांचे पुन्हा एकदा संरचनात्मक लेखापरीक्षण (ऑडिट) होणार आहे. म्हणजे याच्या आधीही ते अनेकदा घोषणांमध्ये झालेच आहे. फक्त प्रत्यक्ष झाल्याचे निदान जनतेला तरी माहीत नाही. कारण अशा प्रकारच्या ऑडिटचे कोणतेही निष्कर्ष शासनाने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळेच बहुधा यावेळी तसा आदेश कागदावर काढला गेला आहे. तसा तो 2016 मध्येही काढला होता. मुंबई -गोवा महामार्गावरील पूल कोसळल्याने सावित्री नदीत चाळीस जणांना जलसमाधी मिळाली होती. तेव्हाही हेच आदेश काढले गेले होते. दरवेळी दुर्घटना घडली की त्याच त्याच आदेशाच्या झेरॉक्स काढल्या जातात का? गच्चीवरील रेस्टॉरंट मध्ये आग लागली, रुग्णालयात आग लागली, पूल कोसळले की करा ऑडिट.
आताही कुंडमळा दुर्घटना याला कारण ठरली. पण असे कोणत्याही प्रकारचे ऑडिट होत नाही. त्याबद्दल दोषींवर कारवाई केली जात नाही. अर्थात कारवाई करण्यासाठी दोषी शोधावे लागतात. तसे ते शोधण्यासाठीची यंत्रणा नसावी. अन्यथा दोषींच्या मुसक्या नक्की आवळल्या गेल्या असत्या. दुर्घटनेचे वातावरण शांत झाले की त्या आदेशाची आठवण ज्यांना यायला हवी त्यांनाही येत नाही आणि त्याचा त्यांना कधीही जाब विचारला जात नाही. 2016 मध्येच असे ऑडिट झाले असते तर कदाचित कुंडमळा दुर्घटना टळू शकली असती. शासनाच्या नाकर्तेपणाचे असे कितीतरी दाखले दिले जाऊ शकतील. त्याचे सोयरसुतक कोणालाही नसते.
लोकांच्या वाट्याला मात्र किडामुंगीसारखे मरण येतच असते. ‘शेळी जाते जीवानिशी…’ अशीच प्रत्येकवेळी लोकांची अवस्था होते. एकदाचे काय ते ऑडिट करून लोकांना आश्वस्त का केले जात नाही? ते करण्यापेक्षा सोपस्कार पार पाडण्यातच रस का असावा? दुर्घटना घडली की, मातब्बर भेटी देतात. दुःख व्यक्त करतात. पीडितांना सरकार आर्थिक मदत करते आणि पुढची दुर्घटना घडेपर्यंत शासनाचे कर्तव्य संपते. ‘परदुःखें शीतलता’ यालाच म्हणत असावेत. याचा दोष कारभार्यांना तरी कसा द्यावा? आघाड्यांचे राजकारण सांभाळणे सोपे नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.
गूढ भेटीगाठी घ्यावा लागतात. माध्यमांना कोणतेही शेंडा-बुडुख नसलेल्या प्रतिक्रिया द्याव्या लागतात. दिवसाचे चोवीसच तास असतात. या सगळ्या धबडग्यातून जनतेसाठी त्यांनी तरी वेळ कुठून काढावा? त्यात लोकांचा बेजबाबदारपणा भर घालतो. आपण कुठे जात आहोत? तिथली परिस्थिती काय आहे? धोका आहे का? असे प्रश्न लोकांनाही पडत नाहीत. गृहीत धरण्याची वृत्ती प्रसंगी त्यांचाही घात करते. मिळून सगळ्यांची बेफिकीरी मरण मात्र स्वस्त करते. हेच खरे दुःख आहे.




