Wednesday, December 4, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २० ऑगस्ट २०२४ - हाच लोकोत्सवाचा पाया

संपादकीय : २० ऑगस्ट २०२४ – हाच लोकोत्सवाचा पाया

श्रावण महिना अर्धा सरतो तोच वातावरणात ढोल-ताशांच्या सरावाचे आवाज घुमू लागतात. नियोजित ठिकाणी गणेशमूर्तींची दुकाने सजतात. शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याची प्रशिक्षणे भरू लागतात. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याची चर्चा जोर धरू लागते. त्याबरोबरीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ हेतूवरदेखील चर्चा रंगण्याची गरज आहे. सार्वजनिक सण हे सांस्कृतिक वारशाचे वाहक मानले जातात.

सण साजरे करण्याच्या परंपरा, त्याच्याशी जोडले गेलेले आहार आणि आरोग्याचे भान, वातावरण व सणांचे नियोजन आणि समाज संघटन हा वारसा यानिमित्त डोळसपणे पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा प्रशस्त आणि सर्वसंमत मार्ग म्हणून सणांकडे पाहिले जाते. कोणत्याही सार्वजनिक उत्सवांचे इव्हेन्ट बनण्याच्या काळात असे उद्देश हरवू नये अशीच जाणत्यांची अपेक्षा असेल. स्वातंत्र्यलढ्यासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला काही दशके उलटली असली तरी कालौघात उद्देशाचे संदर्भ बदलले इतकेच.

- Advertisement -

पण समाजसंघटन, सामाजिक भान जागृती आणि समाज एकसंघ ठेवण्याचे उद्दिष्ट आजही कायम आहे. जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूण हत्या, निरक्षरता, समाज माध्यमांचा विळखा, आत्ममग्न होत चाललेली माणसे, प्रदूषण, प्लास्टिकचा भस्मासूर, नदी प्रदूषण अशा अनेक समस्यांवर समाज जागृतीची आवश्यकता आहे. त्यासाठी उपक्रम, कार्यक्रम, भाषणे, व्याख्याने, चर्चासत्रे, वादविवाद, देखावे असे अनेक मार्ग सामाजिक संस्थांना अवलंबावे लागतात. लोकांनी एकत्र येणे किंवा त्यांना आणणे ही त्यासाठीची पहिली पायरी आहे. गणेशोत्सव ती संधी विनासायास उपलब्ध करून देतो.

लोकांना घराबाहेर काढून एकत्र आणण्यासाठी कोणतेही वेगळे कष्ट याकाळात कोणालाही घ्यावे लागत नाहीत. हा उत्सवच लोकांना उत्साहाने भारून टाकतो. त्याचा उपयोग सामाजिक भान वाढवण्यासाठी सहज करून घेतला जाऊ शकेल. तथापि ती संधी साधण्याऐवजी अतिउत्साहाच्या नादात सण साजरे करण्याचे विद्रुपीकरण होत तर नाही ना यावर विचार होऊ शकेल का? अनेकदा तसे घडते असा लोकांचा अनुभव आहे.

तसे असेल तर मागे वळून पाहिले जाऊ शकेल का? अनेक प्रतिष्ठित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक जागरुकतेला प्राधान्य देतात. पण त्यांची संख्या वाढायला हवी. यासाठी ती मंडळे पुढाकार घेऊ शकतील. लोकांच्या उत्साहाला दिशा देऊ शकतील. सामाजिक पातळीवर अपवादात्मक तसे बदल हळूहळू होताना आढळतात. त्याची व्यापकता वाढणे ही काळाची गरज आहे. लोकशिक्षण, सामाजिक ऐक्य, साकारात्मक ऊर्जेची निर्मिती आणि विधायक दृष्टिकोनाची रुजवण हाच कोणत्याही लोकोत्सवाचा पाया असायला हवा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या