Friday, May 1, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २१ जुलै २०२५ - कार्यकर्ता पाहावे बनून..

संपादकीय : २१ जुलै २०२५ – कार्यकर्ता पाहावे बनून..

लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून.. अशी मराठी म्हण आहे. तथापि नव्या काळात तिला ‘राजकीय कार्यकर्ता पाहावे होऊन’ असे शेपूट जोडले तर ती म्हण अधिक अर्थवाही बनू शकेल. म्हण आजही वापरात असली तरी दोन्ही गोष्टी माणसांना फारशा अवघड वाटेना झाल्या आहेत. कारण माणसे कर्ज काढून घर बांधतात आणि लग्नही करतात. पण कार्यकर्त्यांची गोष्टच वेगळी. कार्यकर्ता होणे मात्र नेत्यांनी अंमळ अवघडच बनवले आहे.

आयाराम गयाराम हाच एकमेव पक्ष बनत चालल्याचा या काळात राजकारणाचे वारे कसे बदलेल याचा अंदाज भले भले ज्योतिषी आणि राजकीय तज्ज्ञ देखील मांडेनासे झाले आहेत. नेते त्यांच्या सोयीचेच राजकारण करतात. खरे तर सोयीपेक्षा स्वार्थी हाच शब्द चपखल वाटू शकेल. सत्तेच्या सारीपाटाचे गणित जुळवणे हाच त्यांच्या राजकारणाचा एकमेव पाया असतो. त्यामुळे कोणाचेही पाय धरण्यापासून पक्षप्रवेशापर्यंत बेडूक उड्या मारण्याची त्यांची तयारी असते. ती असेना का जाईना. पण त्यामुळे कार्यकर्त्यांची पंचाईत होते. ते पुरते भांबावतात. वेड्यात निघतात म्हणा ना. तसेही आजकाल कार्यकर्त्यांना कोण विचारते म्हणा. ते फक्त तोंडी लावणेच.

- Advertisement -

नेते पक्ष प्रवेश करतात. कार्यकर्ते त्यांच्याही नकळत दलबदल करतात. रात्री झोपताना ते एका पक्षात असतात तर त्यांची सकाळ मात्र दुसर्‍या पक्षात उजाडलेली असते. कारण त्यांच्या नेत्याने एका रात्रीत पक्ष बदललेला असतो. त्यामुळे कालपर्यंत निष्ठा किंवा पक्षविचार म्हणून ज्यांना खच्चून शिव्या घातल्या, त्यांचीच वाहवा करण्याची वेळ त्यांचेच नेते त्यांच्यावर आणतात. पूर्वी पक्षांना कार्यकर्त्यांची गरज होती. ‘कॅडर बेस….’ असा अभिमानाने उल्लेख केला जायचा. आता बेस असला आणि नसला तरी सत्ताप्राप्ती संभव झाली आहे. पण सगळेच कार्यकर्ते मेल्या मनाचे आणि निबर कातडीचे नसतात. ते स्वतःला पक्षाचे निष्ठावान मानतात.

मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको हे जणू त्यांच्याच घरचे काम मानतात. पक्षाच्या कार्यक्रमात पु.ल. देशपांडे यांच्या कथेतील ‘नारायण’ सारखे पडेल ते काम करतात. पण त्यांचे नेते मात्र प्रसंगी दुसर्‍याच पक्षाशी म्होतूर लावून मोकळे होतात. एका पक्षाचे सदस्यत्व, दुसर्‍याच पक्षात काम आणि निवृत्ती तिसर्‍याच पक्षातून हा प्रवास नेत्यांसाठी सोयीचा असला तरी अशा कार्यकर्त्यांसाठी मात्र अवघड बनतो. सतरंज्या उचलल्या, खुर्च्या टाकल्या, झेंडे नाचवले, बेंबीच्या देठापासून घोषणा दिल्या, मोर्चे काढले, घरदार सोडून पक्षाचे काम केले, प्रसंगी खिशाला खार लावला तो कशासाठी असा प्रश्न त्यांना पडतो. त्याचे उत्तर ना त्यांच्या पक्षाकडे असते ना त्यांच्या नेत्यांकडे.

ताज्या बातम्या

मिसिंग

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे...

0
पुणे | Puneमुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री...