Wednesday, January 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २१ जून २०२५ - ग्रामराज्याचा आदर्श

संपादकीय : २१ जून २०२५ – ग्रामराज्याचा आदर्श

लोकसहभाग हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले जाते. लोकसहभाग बदलांची पाऊलवाट प्रशस्त करतो. नव्हे तो ग्रामसुधारणेचा मूलमंत्र मानला जातो. त्याचे गमक संत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ग्रामगीतेतून सांगितले आहे. ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र । संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥ त्यांचा हा उपदेश एका गावाने अंमलात आणला आहे. लोकसहभागातून गावाचे चित्र पालटले आहे.

गावात हुंडाबंदी आहे. स्मशानभूमी उद्यानासारखी फुलवली आहे. मृत व्यक्तीची राख विसर्जन नदीत किंवा तलावात केले जात नाही. त्यांच्या शेतीत त्या व्यक्तीच्या नावे एक झाड लावले जाते. तिथे ती राख टाकली जाते. कुटुंबातील सदस्य झाड जगवतात. गावाने अजून एक कालसुसंगत आणि प्रागतिक निर्णय घेतला आहे. गावात एकूण 120 कुटुंबे राहतात. गावकर्‍यांनी मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत 12 कुटुंबात तो अंमलात देखील आला आहे. हे आटपाट नगरातील गावाचे वर्णन अजिबात नाही.

- Advertisement -

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी गावात हे सगळे चमत्कार अनुभवायला मिळतात. माध्यमात त्याची कथा प्रसिद्ध झाली आहे. अवयवदानाच्या निश्चयाचे फळ व्यापक आहे. कारण देशात दरवर्षी सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू अवयव वेळेवर न मिळाल्याने होतो. गरजू आणि दाते यांचे प्रमाण व्यस्तच आढळते. म्हणजे दात्यांच्या कैकपटीने गरजूंची संख्या आहे. एक व्यक्ती त्याचे किमान आठ अवयव दान करू शकते. म्हणजेच आठ गरजूंच्या आयुष्यात आनंदाची पहाट फुलवू शकते. अवयवदानाच्या प्रतीक्षेत व्यक्ती आणि तिचे कुटुंब असते. अकार्यक्षम अवयवासहित जगणे त्यांच्यासाठी वेदनादायी असते.

YouTube video player

आनंदवाडी गावाचा सामूहिक निर्णय सामाजिकदृष्ट्या किती महत्वाचा आहे हे यावरून लक्षात येऊ शकेल. गावाच्या ग्रामपंचायतीत शंभर टक्के महिलाराज आहे. बदलाचे वारे वाहण्याचे ते देखील एक कारण मानले जाऊ शकेल. ममत्व, आपुलकी आणि एकमेकांविषयी जिव्हाळा ही महिलांची अंगभूत गुणवैशिष्ट्ये. त्याचा परीघ महिला घर ते समाज असा सहज विस्तारू शकतात. गावाच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहू शकतात म्हणूनच गावात हुंडाबंदी शक्य झाली असावी. अवयवदानाचा अवघड निर्णय गाव घेऊ शकले.

अवयवदानाविषयी समाजात गैरसमज आढळतात. शवाची चिरफाड केली जाते आणि विद्रुपता येते हा त्यापैकीच एक. शिवाय याच्याशी परंपराही जोडल्या गेल्या आहेत. ते गैरसमज दूर करणे सोपे नसतेच. महिलांनी गावाच्या मदतीने ते आव्हान यशस्वीपणे पेलले आणि त्याची सुरवातही केली. तात्पर्य, ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा ॥ असे संत तुकडोजी महाराज म्हणतात तेच खरे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...