भगवान शंकराचे मंदिर उभारून सर्वपक्षीय बड्या नेत्यांना आपले चरणामृत प्राशन करायला लावत विकृतीत आकंठ बुडालेला कथित अंकज्योतिषी अशोक खरात याच्या बदनाम साम्राज्याच्या उभारणीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावणार्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा जनमनातील संतप्त भावनांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. मात्र, हा निर्णय सांगताना त्यांनी केलेली सारवासारव पाहता याला नाराजीनामाच म्हणावे लागेल.
बाबाबुवांच्या कधीही भजनी न लागलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक असे दिवंगत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधात असतानाही आणि आता सत्तेत असतानाही या बाईंकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद कायम राहिले होतेे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याची, त्यांना कठीणप्रसंगी न्याय मिळवून देण्याची कोणती कुवत रूपालीताईंकडे होती म्हणून त्यांना हे पद आंदण दिल्यासारखे मिळालेे, असा प्रश्न या क्षेत्रात तळमळीने काम करणार्या कार्यकर्त्यांना पूर्वीपासूनच पडला होतो. खरातला बुधवारी मध्यरात्री त्याच्या बंगल्यातून उचलल्याला दोन दिवस उलटून जाऊनही चाकणकर यांनी राजीनामा दिला नव्हता.
उलटपक्षी आपले पद शाबूत ठेवण्याची त्या धडपड करत होत्या. अन्य एखादी महिला असती तर कधीच तिच्या पदावर गंडांतर आले असते; मात्र एवढे मोठे प्रकरण उघडकीस येऊनही चाकणकर त्या खुर्चीवर मांड ठोकून बसल्या होत्या. त्यांचा एकूण आविर्भाव पाहता त्यांना कोणीही धक्का लावू शकत नसल्याचा आत्मविश्वास त्यांच्यात दिसत होता. काही वर्षांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या मागेपुढे फिरणारी पुणे जिल्ह्यातील एक कार्यकर्ती अशी ओळख असलेल्या चाकणकर बाईंचा प्रदेश पातळीवरील महिला नेत्या बनेपर्यंतचा प्रवास विस्मयजनक राहिला आहे आणि खरातच्या अगदी घरातली व्यक्ती असल्याचे कित्येक पुरावे मिळत असतानाही सत्ताधारी पक्षातील एकाचेही तोंड त्यांच्याविरोधात उघडत नव्हते हे आणखी आश्चर्यकारक होते.
स्वत: त्यांनाही कदाचित त्यांची क्षमता ठाऊक असावी, म्हणूनच खरातभोवती आरत्या ओवाळताना त्या एका कार्यक्रमात म्हणाल्या की, मला जे काही मिळाले आहे ते यांना अर्पण! बाई पतिमहोदयांच्या जोडीने खरातचे पाय धुतात, साडीच्या पदराने अगदी कोरडेठाक करून देतात, रिमझिम पावसात त्याच्यावर छत्री धरतात आणि या प्रकरणात नाव आल्यानंतर म्हणतात, अनेक प्रतिष्ठित लोकांप्रमाणे मीही मंदिर ट्रस्टशी जोडले गेले, पोलीस नि:पक्षपातीपणे चौकशी करतील, माझा न्यायसंस्थेवर विश्वास आहे! या वागण्याला मायमराठीत अनेक विशेषणे आहेत; परंतु आयाबहिणींचा मानसन्मान करण्याचे श्री शिवछत्रपतींचे आपल्यावर संस्कार असल्याने व स्त्रीदाक्षिण्याची आपली संस्कृती असल्याने ते वापरता येत नाहीत.
चाकणकरांना मात्र पन्नास-साठ महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले असताना त्याचा वेळीच साधा निषेध करावासा वाटत नाही. महाराष्ट्राच्या चारशे वर्षांच्या अर्वाचीन इतिहासात एखाद्या पदावर इतकी अपात्र व्यक्ती बसलेली नसेल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन त्यांना आज, २१ मार्चला पाच वर्षे व पाच महिने झाले आहेत. मात्र, या एवढ्या दीर्घ काळात त्यांनी पाच महिलांना तरी न्याय मिळवून दिला असेल की नाही शंका आहे. या आयोगावर सदस्यपदावरील नियुक्ती साधारण तीन वर्षे असते; परंतु चाकणकर सुमारे साडेपाच वर्षे अध्यक्ष राहिल्या, एवढे महान त्यांचे कार्य आहे! तसेही १९९३ मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाचे अध्यक्षपद म्हणजे राजकीय क्षेत्रातील महिलेची सोय लावण्याचीच आणखी एक जागा झाल्याचे आतापर्यंतच्या नामावलीवर नजर टाकता लक्षात येते.
चाकणकर यांच्या आधी अध्यक्ष असलेल्या मूळ नाशिककर विजया रहाटकर यांची कारकीर्द चांगल्या अर्थाने काहीशी लक्षात राहण्यासारखी ठरली आहे. पण त्यांची पार्श्वभूमीही राजकीयच. आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष ज्येष्ठ सनदी अधिकारी व एक संवेदनशील साहित्यिक नीला सत्यनारायण. नंतरच्या काळातही प्रशासकीय, सामाजिक क्षेत्रातील महिलांकडे हे पद दिले असते तर आयोगाचाही आब राहिला असता. देर आये दुरुस्त आए या म्हणीप्रमाणे उशिरा का होईना फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घेतल्याने आयोगाची उरलीसुरली इभ्रत राखली गेली आहे. आता या पदावर योग्य निवड होईल हीच अपेक्षा.




