Friday, November 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजHSC Exam : इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या वेळेत फेरबदल

HSC Exam : इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या वेळेत फेरबदल

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या वेळेत महत्त्वाचा बदल केला आहे. हा पेपर १७ फेब्रुवारी २०२७ रोजीच घेतला जाणार असून परीक्षेची तारीख कायम ठेवण्यात आली आहे, मात्र परीक्षेचे सत्र बदलण्यात आले असून आता हा पेपर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडेल. राज्य मंडळाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, केवळ परीक्षेच्या वेळेत आणि सत्रात दुरुस्ती करण्यात आली असून परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल झालेला नाही.

मूळ वेळापत्रकानुसार अर्थशास्त्राचा हा पेपर १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. परंतु, सुधारित वेळापत्रकानुसार आता हा पेपर सकाळच्या सत्राऐवजी दुसऱ्या सत्रात म्हणजेच दुपारी निश्चित करण्यात आला आहे. हा वेळेतील बदल कला, विज्ञान आणि वाणिज्य अशा तिन्ही शाखांमधील अर्थशास्त्र विषय घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. इयत्ता बारावीच्या इतर कोणत्याही विषयाच्या अथवा इयत्ता दहावीच्या (SSC) सर्व लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या सर्व परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतल्या जाणार आहेत. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ नोव्हेंबर २०२६ पासून परीक्षांचे दिनांकनिहाय वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामध्ये बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या सत्रात ही दुरुस्ती करण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, संकेतस्थळावर दिलेले वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाकडून पाठवले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपरची तारीख, सत्र आणि वेळ यांची खात्री आपल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या छापील वेळापत्रकातूनच करावी. इतर कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळांवरील, विविध संस्थांनी छापलेली वेळापत्रके किंवा व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरणाऱ्या वेळापत्रकांच्या प्रतींवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंडळाने केले आहे.

यासंदर्भात राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी माहिती दिली की, विभागीय मंडळांनी स्थानिक स्तरावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना या फेरबदलाची माहिती द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृतपणे प्रसिद्ध झाले असून इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ पासून आणि इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या

मालमत्ता व्यवहारात पारदर्शकतेसाठी सरकारचा मोठा निर्णय; दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती...

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai मालमत्ता दस्त नोंदणी करताना दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिलेल्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला कळविण्याची प्रक्रिया अधिक सक्षम...