Thursday, April 23, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २३ एप्रिल २०२६ - ‘पहलगाम’ वर्षपूर्तीनंतर..

संपादकीय : २३ एप्रिल २०२६ – ‘पहलगाम’ वर्षपूर्तीनंतर..

गर फिरदौस बर रुएं जमीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त.. अर्थात, पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे असे ज्या भूप्रदेशाचे वर्णन करण्यात आले आहे, त्या काश्मीरमधील अलौकिक सौंदर्याचा आस्वाद भारतीयच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना कोणत्याही भीतीविना कधी घेता येईल, हा प्रश्न पहलगामच्या बैंसरन खोर्‍यात २६ पर्यटकांना निर्दयपणे गोळ्या घालण्याच्या घटनेची परवा वर्षपूर्ती होऊनही कायम आहे. २२ एप्रिल २०२५ चा तो दिवस केवळ पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पापांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर काश्मीर खोर्‍याच्या उपजीविकेचे साधन असलेल्या पर्यटन व्यवसायासाठीही काळा दिवस ठरला.

- Advertisement -

कारण त्या भयानक घटनेनंतर गेल्या वर्षभरात या भागातील पर्यटन सुमारे सत्तर टक्क्यांनी घटले आहे. केवळ पहलगामच नव्हे, तर संपूर्ण काश्मीर खोर्‍यात फिरण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांना तेथील स्थानिक नागरिक विविध सेवा पुरवतात. यातूनच त्यांची रोजीरोटी चालते. तसेच पर्यटकांचे सौंदर्य दर्शन सुकर होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांनी या बैंसरन खोर्‍यासह अन्य स्थळांकडेही पाठ फिरवल्याच्या बातम्या आल्या आहेत. पाकिस्तान सीमेकडून पोलिसांच्या गणवेशात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी बैंसरन खोर्‍यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणार्‍या कुटुंबांना धर्म विचारून निर्ममपणे गोळ्या घातल्यानंतर संपूर्ण भारतवर्षात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादाचा जनक असलेल्या पाकिस्तानसह लष्कर-ए-तोयबाची द रेजिस्टंट फ्रंट ही संघटना; एवढेच नव्हे तर पर्यटकांना सेवा पुरवणारे स्थानिक नागरिकही त्यावेळी झालेल्या टीकेच्या जबर मार्‍यात सापडले होते.

हे सेवा पुरवठादार भारतीय पर्यटकांच्या जीवावर जगतात; मात्र त्यांची सहानुभूती पाकसमर्थित दहशतवाद्यांना असते; नव्हे ते दहशतवाद्यांना टिप्सही देतात अशा स्वरुपाचे आक्षेप त्यावेळी घेण्यात आले होते. या शक्तींचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी काश्मीरवर, पर्यायाने तेथील पर्यटनावरच बहिष्कार घालावा, असे आवाहन त्यावेळी करण्यात येत होते. भारतात अन्यत्रही उत्तम निसर्ग आहे, काश्मीरसारखीच सौंदर्यस्थळेही आहेत, मग त्या काश्मीरमध्येच काय ठेवले आहे, असा एकूण त्या समाज माध्यमी चर्चेचा अतिरेकी सूर होता. मात्र, यातून काश्मीरमध्ये आणखी अस्थिरतेला आधार मिळेल व अप्रत्यक्षरीत्या शत्रू राष्ट्राचे मनसुबे सफल होऊन दहशतवादाचाच एकप्रकारे विजय झाल्यासारखे होईल, असा सबुरीचा इशारा मध्यममार्गी मंडळींनी वेगवेगळ्या सोशल व्यासपीठांवर दिला होता; मात्र त्यांची संभावना कथित राष्ट्रभक्तांनी कोणत्या शब्दात केली असेल ते वेगळे सांगायला नको. त्याला अधिकृतपणा प्राप्त झाला असता तर जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिष्ठाही कदाचित कमी झाली असती. त्यामुळे सरकारच्या पातळीवर या बोलभांड लोकांना प्रतिसाद मिळणे शक्यच नव्हते.

उलट सरकारने पहलगाम घटनेनंतर काश्मीर खोर्‍यात पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याआधी ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘ऑपरेशन महादेव’ या अतिव्यापक लष्करी मोहिमांच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ-दहा अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या हवाई तळांनाही तडाखा दिला. भारतात दहशतवादी कृत्ये करण्यापलीकडे ताकद आणि हिमत नसलेल्या पाकिस्तानने अधिक हाल होण्याच्या आधीच पांढरे निशाण फडकवले. भारतीय लष्कराने आपले उद्दिष्ट साध्य केलेले असल्याने भारताने त्याला लागलीच प्रतिसाद देत विनाकारण आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घेतली.

पाकिस्तानचे रिमोट कंट्रोल ट्रम्प साहेब यांनी त्यांच्या उटपटांग स्वभावानुसार, पाकिस्तानने भारताचे विमान पाडले, तसेच मीच युद्ध थांबवले असली हास्यास्पद विधाने केली; परंतु भारताने त्यांना फारसे महत्त्व दिले नाही. त्याकाळात गेलेल्या अब्रूचे पुन:संपादन करण्याच्याच हेतूने बहुधा पाकिस्तान सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थीची लुडबूड करत असावा. त्याला त्याच्या या मोहिमेत कितपत यश मिळेल हे आज सांगता येत नसले तरी आपल्याच अंतर्गत समस्यांनी गांजलेल्या या देशाने संपूर्ण जगाला वेठीस धरणारा संघर्ष संपवण्यासाठी योगदान देण्यात आपली उरलीसुरली शक्ती खर्ची घालावी, हाच एक मोठा विरोधाभास आहे.

असो. पहलगाम घटनेला वर्ष उलटून जाऊनही ती घटना मुळात का घडली, यावर पूर्ण प्रकाश अद्याप पडलेला नाही. भारतीय सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचे ते अपयश होते का, या आक्षेपांचे निराकरणही होऊ शकलेले नाही. ते आतापर्यंत सर्व पुराव्यांनिशी झाले असते तर कदाचित काश्मीर खोर्‍यात जाऊ इच्छिणार्‍या पर्यटकांमध्ये जो संभ्रम आहे, तो दूर होऊन आज हळूहळू का होईना पर्यटनाचे प्रमाण वृद्धिंगत होण्यास सुरुवात झाली असती.

ताज्या बातम्या

Kopargaon : पश्चिमेचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याबाबत चालढकल थांबवा

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे....