Monday, March 30, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २३ मार्च २०२६ - चकाकी मागचा भूलभुलैया!

संपादकीय : २३ मार्च २०२६ – चकाकी मागचा भूलभुलैया!

जगातील एक मौल्यवान धातू म्हणून ज्याबद्दल प्रचंड आकर्षण होते, त्या सोन्याच्या भावात होणारे अतिशय वेगवान चढउतार पाहून जनसामान्यांसह एक गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहणार्‍या वर्गालाही भीती वाटू लागली असल्यास नवल नाही. ३० जानेवारी रोजी एक लाख ८८ हजार रुपये प्रतितोळा असा दर असलेल्या सोन्याची घसरण २१ मार्च रोजी, म्हणजे अवघ्या पन्नास दिवसात एक लाख ४९ हजार रुपयांपर्यंत झाली आहे. गुंतवणुकीच्या अधिकवजा परताव्याच्या भाषेत बोलायचे झाले तर दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत २१ टक्क्यांपेक्षा जास्त उणे परतावा यात मिळाला आहे. आणि साधारण तेवढाच अधिक परतावा या धातूमध्ये विक्रमी किमतीआधी दहा दिवसांच्या भावाचा विचार करता मिळाला होता.

- Advertisement -

२० जानेवारी रोजी सोन्याचे भाव एक लाख ४९ हजार रुपये होते. हे जीवघेणे हिंदोळे पाहून सर्वसामान्य लोक सध्या तरी त्याच्या व्यवहारापासून दूर राहण्याचा विचार करत असावेत. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक साधनात एवढी मोठी उलथापालथ अलीकडच्या काळात पाहायला मिळाली नसावी. हा सोन्याचा दाह पाहून कठीण समयी आपल्या निधीला संरक्षण देणारा पर्याय म्हणून सोन्याची शिफारस करणारे गुंतवणूक सल्लागारही आता यापुढे जपून पावले टाकण्याचे सुचवत आहेत. कारण, त्यांच्याही आडाख्यांना सोन्याचे अत्यंत गतीने बदलणारे भाव रोजच्या रोज सुरुंग लावत आहेत. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी सोने सुमारे एक लाख ५७ हजारांपर्यंत उतरले होते. त्या दिवशी गुंतवणूक बाजारातील भलेभले सल्लागार ही अलीकडच्या काळातील नीचांकी पातळी असून, नजीकच्या भविष्यात यापेक्षा जास्त सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही, अशा एक्सपर्ट कॉमेंट्स करत होते.

जागतिक बाजारपेठेत काहीही होवो, भारतात मात्र गुढीपाडव्याला सोन्याचे दर वाढण्याचीच परंपरा असल्याच्या इतिहासाचाही दाखला देत होते. परंतु, या सर्व अभ्यासकांचे अंदाज फोल ठरवत सोन्याने गुढीला दरवर्षीची सलामी काही दिली नाही. गुढीपाडव्यानंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच असून, ते आणखी उतरेल की त्याच्या भावात पुन्हा वाढ होईल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, गुंतवणूक शास्त्रातील पारंपरिक गणितेही सोन्याच्या भावाच्या बाबतीत सध्या कुचकामी ठरत आहेत. जागतिक पातळीवर अशांतता, युद्धसदृश स्थिती निर्माण झाली की सोने झपाट्याने वधारते, असे एक समीकरण रूढ झाले आहे; किंबहुना सोन्याच्या दराची वर्तणूकही साधारणपणे तशीच राहिली आहे.

मात्र, सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात घमासान युद्ध पेटले असूनही सोने उलटी चाल खेळते आहे. हे सारे अनालकनीय आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर बहुधा प्रथमच जगात एवढे मोठे अस्थैर्य आणि भविष्याबद्दलची अस्थिरता दाटून आलेली असतानाही सोने मजबूत होण्याऐवजी कमकुवत होते आहे, यामागचा अर्थ कोणालाही कळेनासा झाला आहे. काही जाणकारांच्या मते, सोन्याचा भाव थेट ८० हजारांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पावणेदोन लाखांच्या आसपास भाव गेलेला असताना भविष्यात हाच वेग कायम राहण्याच्या आशेने मोठी खरेदी करून ठेवलेल्या मोठ्या गुंतवणुकदारांचे काय होईल, असा प्रश्न पडतो. ही झाली केवळ गुंतवणूक म्हणून या मौल्यवान धातूकडे पाहणार्‍या मंडळींची गोष्ट. भारतीय समाजात सोन्याला गुंतवणुकीपेक्षाही वेगळे महत्त्व आहे. सण उत्सवातील उत्तम मुहूर्तांना सोन्याची खरेदी करण्यामागे केवळ सुरक्षित गुंतवणूक यापेक्षा धार्मिक महत्त्व असते.

आपल्या देशातील विवाह समारंभांमध्ये सोन्याचे असलेले महत्त्व तर वेगळे सांगायलाच नको. ती एक या समारंभातील अत्यावश्यक बाब आहे. प्रत्येक परिवार आपल्या परीने मुला-मुलीला सोने घालत असतो. मात्र, वधू-वरांना पूर्वी केल्या जाणार्‍या दागिन्यांचे वजन आता कमालीचे घटले आहे. त्यातही आता २२ कॅरटला नऊ कॅरटचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे मर्यादित उत्पन्न असलेल्या वर्गाला एक व्यवहार्य पर्याय मिळाला आहे. युद्धामुळे वाढणार्‍या महागाईच्या संकटाला तोंड देतादेता नाकीनऊ आलेल्या मध्यमवर्गाला विवाह समारंभ पारंपरिकरित्या पार पाडणे हीदेखील एक मोठी कठीण गोष्ट झाली आहे. सोन्याच्या चकाकीमागचा भूलभुलैया त्याला अधिकच गोंधळात पाडत आहे हे मात्र नक्की.

ताज्या बातम्या

Nashik NMC News : अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ; विरोधकांकडून महापौरांचा ‘राजदंड’ पळवण्याचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या (Municipal Corporation) अंदाजपत्रकीय महासभेत आज (सोमवारी) विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार...