नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लश्कर-ए-तोयबा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शब्बीर अहमद लोन असे त्याचे नाव आहे. मेट्रो पोस्टर प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आलेल्या मॉड्यूलचा तो सूत्रधार होता. दहशतवादी शब्बीर अहमद लोन बांगलादेशात बसून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘एसआय’च्या (ISI) इशाऱ्यावर लष्करचे एक नवीन मॉड्यूल तयार करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला दिल्लीच्या सीमेवर पकडले. तपास केल्यानंतर असे समोर आले आहे की, तो सीमे पलिकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार भारतविरोधी कारवाया करण्याच्या मिशनवर होता. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात त्याचे आणखी किती साथीदार लपले आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.
Vijay Wadettiwar: अशोक खरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या…; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
या दहशतवादी गटाने राजधानी दिल्लीपासून कोलकातापर्यंत अनेक ठिकाणी बुरहान वानी आणि पाकिस्तानचा उल्लेख असलेले भारतविरोधी पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्सवर, ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी बुरहान वानीचे उदात्तीकरण करणारी चित्रे आणि “भारत, नरसंहार थांबवा आणि काश्मीरला मुक्त करा” यांसारख्या घोषणाही होत्या.
शब्बीर अहमद लोन हे नाव सुरक्षा यंत्रणांसाठी नवीन नाही. २००७ मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला एके-४७ आणि ग्रेनेडसारख्या जड शस्रांस्त्रांसग अटक केली होती. त्यावेळीही त्याचे संबंध थेट हाफिज सईदशी जोडलेले होते. तो २०१८ पर्यंत दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला आणि बांगलादेशला आपले नवीन ठिकाण बनवून भारताच्या विरोधात मॉड्युल हाताळू लागला होता. याव्यतिरिक्त, आधार कार्डसारखी बनावट कागदपत्रे मिळवून त्यांना भारतात लपवून ठेवण्यात आले होते. एनक्रिप्टेड ॲप्सद्वारे संवाद साधला जात होता. दिल्ली आणि इतर शहरांमध्ये टेहळणीही करण्यात आली होती.
दरम्यान, शब्बीर अहमद लोनची लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील भागांना लक्ष्य करण्याची योजना होती. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, शब्बीर अहमद लोन हा बांगलादेशात राहणारा एक अनुभवी आणि प्रशिक्षित दहशतवादी असून, त्याने आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या मदतीने भारतात एक दहशतवादी नेटवर्क स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली पोलिसांच्या कारवाईने या मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि एक संभाव्य मोठा हल्ला टाळला.





