Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २४ जानेवारी २०२५ - वाचन संस्कृतीला बळ मिळावे…

संपादकीय : २४ जानेवारी २०२५ – वाचन संस्कृतीला बळ मिळावे…

वाचन संस्कृतीचा र्‍हास होत असल्याचे आणि युवा पिढीची वाचनाची सवय कमी होत चालल्याचा सूर नेहमीच ऐकू येतो. त्याबाबत वादविवादही झडतात. ज्येष्ठ नागरिक जाहीरपणे तशी तक्रार करतात. ओस पडत चाललेल्या वाचनालयांचा दाखला या दाव्याच्या पुष्ट्यर्थ पुढे केला जातो. तथापि समाजातील अनेक समूह समस्येवर चर्चा करण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

वाचन संस्कृती रुजवण्याचे आव्हान पेलण्याचा प्रयत्न आपल्या परीने करतात. सध्या मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र सामूहिक हळदी-कुंकवाचे जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. पारंपरिक कार्यक्रमातून वाचन संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न उमरगातील महिला समूहाने केला. ‘वाण’ म्हणून त्यांनी महिलांना पुस्तकांचे वाटप केले. एवढेच नव्हे तर विधवा महिलांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. तेथील एका सार्वजनिक वाचनालयात हा कार्यक्रम झाला. सहभागी महिलांना अन्य पुस्तके हाताळायची संधी मिळू शकली. दुसरा प्रयत्न बीड शहरात सुरू आहे. तेथील एक व्यक्ती मोफत फिरते वाचनालय चालवतात. त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या वाचनालयात तीन हजार पुस्तकांचा संग्रह आहे. या वाचनालयाची बीड परिसरात चाळीस छोटी केंद्रे आहेत. ते निवृत्त सेवक आहेत.

- Advertisement -

पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच वाचन पंधरवडा साजरा केला. शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राबवला जात असलेला ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचा तो भाग आहे. व्यापक प्रशासकीय यंत्रणेमुळे शासनाचा हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे शक्य होते. त्याचे महत्त्व आहेच, पण वाचन संस्कृतीच्या समस्येची लोकांना जाणीव होणे आणि ती सोडवण्यासाठी त्यांनी पुढे येऊन स्वयंस्फूर्त सक्रिय सहभाग घेणे जास्त महत्त्वाचे ठरेल. अन्यथा अशा कोणत्याही सामाजिक समस्येकडे पाहण्याचे दोन प्रकारचे ठळक सामाजिक दृष्टिकोन आढळतात. समस्या शासनाने सोडवावी हा एक आणि आम्ही काय करू शकतो? हा दुसरा दृष्टिकोन! तथापि जागरुक लोकसमूह अशा गृहीतकांना फाटा देण्याचा प्रयत्न करतात. इतरांसाठी ते मार्गदर्शक ठरू शकतात.

उदा. बीडच्या उपक्रमात परिसरातील असंख्य लोक जोडले जात आहेत. पुस्तके भेट देणे, वेळ देणे किंवा सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हे लोकांनी आपल्या परीने शोधलेले मार्ग आहेत. मुलांना, युवा पिढीला प्रत्यक्ष पुस्तकांपर्यंत पोहोचवण्याचे असे अनेक उपाय लोक शोधू शकतील. प्रत्यक्ष वाचन ही पुस्तके हाताळण्याची पुढची पायरी ठरू शकेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...