Thursday, June 25, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २४ जून २०२६ - उभय बाजूंना धोक्याची घंटा

संपादकीय : २४ जून २०२६ – उभय बाजूंना धोक्याची घंटा

राज्यातील स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या १७ जागांसाठी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत हेवेदावे, छुपी रणनीती आणि पक्षांतर्गत बंडाळीचे वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे. महायुतीने १७ पैकी १६ जागांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत आपला वरचष्मा कायम राखला असला, तरी नाशिकच्या धक्कादायक निकालाने या सुवर्ण यशाला काहीसे गालबोट लावले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचा अपेक्षेप्रमाणे धुव्वा उडाला असून, विरोधी पक्षांची मोठ्या प्रमाणात मते फुटल्याने त्यांच्या नैतिकतेवर आणि एकजुटीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा निकाल महायुतीला सत्तेचा माज न बाळगण्याचा इशारा देणारा तर महाविकास आघाडीला आत्मपरीक्षणाची तीव्र गरज अधोरेखित करणारा ठरला आहे.

- Advertisement -

या निवडणुकीचा सर्वात मोठा आणि गाजलेला अंक नाशिकमध्ये पहायला मिळाला. महायुतीच्या जागावाटपात नाशिकची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली होती आणि तिथून नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार होते. मात्र, भाजपचे नेते गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले. वरिष्ठ नेत्यांच्या डझनभर फेर्‍यांनंतर आणि पाच दिवसांच्या मुक्कामानंतर गोकुळ गितेंनी केवळ ‘प्रचार थांबविल्याचे’ जाहीर केले; पण अर्ज मागे घेतला नाही. यानंतर झालेला छुपा प्रचार आणि पडद्यामागील रणनीती दराडेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली. गोकुळ गितेंनी ३५७ मते मिळवून विजयाचा कोटा सहज पार केला, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. दराडे यांच्यासह त्यांच्या चिरंजीवांनी आणि आमदार बंधूंनी ‘केसाने गळा कापला’ आणि ‘११० टक्के विश्वासघात झाला’ ही दिलेली त्यांच्या खास शैलीतील प्रतिक्रिया महायुतीमधील अंतर्गत कुरघोडीवर थेट बोट ठेवणारी आहे.

भाजपची १८८, शिवसेनेची १७१ व राष्ट्रवादीची १०७ मते असतानाही दराडेंचा झालेला पराभव हा स्पष्टपणे महायुतीतील या घटकांच्या स्थानिक मतदारांनी केलेल्या क्रॉस व्होटिंगचा परिणाम आहे. नाशिकमधील हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा असून, यामुळे भाजप आणि शिंदे गटातील तणाव वाढणार हे उघड आहे. विजयानंतर गोकुळ गितेंनी महाविकास आघाडी आणि इस्लाम पार्टीचे मानलेले आभार बरेच काही सांगून जाते. गितेंनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या पक्षाच्या मुख्य नेत्यांनी त्यांच्यासाठी एका मंत्र्यासह विशेष विमान धाडत मुंबईत बोलावून आपल्या पक्षाचे सहयोगी सदस्य बनविल्याने हल्लीच्या राजकारणाची आणखी वेगळी तर्‍हा पहायला मिळाली आहे. मात्र, या राजकीय तडजोडीमुळेही निष्ठावंतांच्या मनात निर्माण झालेली दरी सहजासहजी भरून निघणेे अवघड आहे.

दुसरीकडे, नागपूरच्या निकालाने काँग्रेस व महाविकास आघाडीतील अंतर्गत गटबाजीचे धिंडवडे निघाले आहेत. भाजपच्या राजीव पोतदार यांनी काँग्रेसच्या अतुल लोंढे यांचा ६८२ मतांनी पराभव केला. धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसची स्वतःची १७० आणि आघाडीची २११ मते असतानाही लोंढे यांना अवघी १३० मते मिळाली. काँग्रेसच्याच किमान ४० नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपला मतदान केले. लोंढेंनी भाजपवर प्रत्येकी दहा लाख रुपये देऊन १०० मतदारांचे ‘क्रॉस व्होटिंग’ करून घेतल्याचा गंभीर आरोप केला असला, तरी यामुळे त्यांच्या पराभवाची नामुष्की लपत नाही. निवडणूक बिनविरोध न होऊ देणे आणि स्वतःची १३० मते न विकली जाणे याला लोंढे ‘नैतिक विजय’ म्हणत असले तरी राजकारणात संख्याबळाला महत्त्व असते, नैतिकतेच्या गप्पांना नाही. एकूण १७ जागांपैकी सहा जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ११ जागांवर झालेल्या मतदानाअंती भाजपने आपल्या ११ पैकी ११ जागा जिंकून ‘स्ट्राइक रेट’ शंभर टक्के राखला आहे. शिवसेनेने तीन आणि राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या.

ठाणे, यवतमाळ, रायगड, सोलापूर, जळगाव, अमरावती या सर्वच गडांवर महायुतीने झेंडा फडकवला. अमरावतीत तर काँग्रेस उमेदवाराला शून्य मते मिळाली, हा महाविकास आघाडीसाठी मोठा नामुष्कीचा कप्पा आहे. या निकालांचा सारांश काढायचा झाल्यास, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही निवडणूक दोन्ही आघाड्यांना आरसा दाखविणारी ठरली आहे. महायुतीने १६ जागा जिंकून विजयोत्सव साजरा केला तरी नाशिकमधील दगाफटका त्यांच्यासाठी धोयाची घंटा आहे. महायुतीमधील घटकांमध्ये वरवर दिसणारी एकजूट खालच्या पातळीवर किती भुसभुशीत आहे, हे नाशिकने दाखवून दिले. तर महाविकास आघाडीसाठी हा निकाल म्हणजे मरगळलेल्या नेतृत्वाला आणि मतदारांवर पकड गमावलेल्या संघटनेला बसलेला तीव्र झटका आहे. लोकशाहीत मतदारांचा कल आणि अंतर्गत निष्ठा किती चंचल असू शकतात, याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे

ताज्या बातम्या

संजय

Sanjay Raut: “माझ्या विरोधात आंदोलन केलं तर बॉम्ब टाकेन”; संजय राऊतांचं...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करुन बाहेर पडलेले आणि शिंदे सेनेत दाखल झालेले मुंबई इशान्यचे खासदार संजय दिना पाटील आणि खासदार संजय राऊत...