Thursday, June 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "माझ्या विरोधात आंदोलन केलं तर बॉम्ब टाकेन"; संजय राऊतांचं संजय...

Sanjay Raut: “माझ्या विरोधात आंदोलन केलं तर बॉम्ब टाकेन”; संजय राऊतांचं संजय पाटलांविरोधात पोलीस आयुक्तांना खळबळजनक पत्र

मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करुन बाहेर पडलेले आणि शिंदे सेनेत दाखल झालेले मुंबई इशान्यचे खासदार संजय दिना पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकमेकांसमोर उभे ठाकल्या आहे. खासदार संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या विरोधात एक लेटर बॉम्ब टाकला आहे. त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिले आहे.

संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत, त्यांनी “मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे” असे धक्कादायक विधान केल्याचा दावा राऊत यांनी पत्रात केला आहे. या आत्मकबुलीनंतर “संजय पाटलांनी मारलेले ते ५ लोक कोण आणि त्यांना कधी व का ठार केले?” असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि ‘युएपीए’ (UAPA) अंतर्गत अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

संजय पाटलांची धमकी
मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, फुटलेले खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीरतेविरुद्ध महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप असून मतदार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, ईशान्य मुंबईतील खासदार संजय पाटील यांनी या आंदोलनकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. “माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन,” असे प्रक्षोभक वक्तव्य पाटील यांनी केल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

आता आंदोलन केल्यास घरात घुसून बॉम्ब टाकेन
एका लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले आहेत की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळाले आहेत? याची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची मदत घेऊन त्यांच्या घराची झडती घेण्यात यावी आणि देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांच्यावर ‘युएपीए’ अंतर्गत कारवाई व्हावी, अशी आक्रमक मागणी राऊत यांनी केली आहे.

संपादकीय : २५ जून २०२६ – सिंचन विकासाची रखडपट्टी

संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेले पत्र
प्रिय श्री. देवेन भारतीजी,

जय महाराष्ट्र!

एका गंभीर बाबीकडे मी आपले लक्ष वेधत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचा संताप असून मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणे, लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील ‘फुटीर’ खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. श्री. पाटील म्हणतात. “माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलला पाठवीन.

धमकी देताना ते पुढे म्हणतात.

“मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे. (ठार केलेले हे ५ लोक कोण व संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्याविरोधात तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा.)”माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन.

“मा. भारतीजी, खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA खाली अटक होणे गरजेचे आहे.

त्यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. खा. पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो.

कळावे,
संजय राऊत

ताज्या बातम्या

Nashik Police News : पोलीस आयुक्तालयाला मिळाले तीन सहायक आयुक्त; तीन...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गेल्या अनेक महिन्यांपासून खोळंबलेल्या सहायक पोलिस आयुक्त, उपअधीक्षक पदांच्या बदल्यांना मंगळवारी (दि. २३) मुहूर्त लागला. त्यानुसार, नाशिक आयुक्तालयास (Nashik Police...