Thursday, April 30, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २४ मार्च २०२६ - समर्पित नेतृत्वाचा अनोखा विक्रम

संपादकीय : २४ मार्च २०२६ – समर्पित नेतृत्वाचा अनोखा विक्रम

सलग आठ हजार नऊशे एकतीस दिवस सरकार प्रमुखपदी राहण्याच्या कालखंडाचा विक्रम एवढ्या एकाच गोष्टीतून देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचे योग्य मापन होऊ शकणार नाही. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या तीन आणि त्या पाठोपाठ देशाच्या पंतप्रधानपदाच्याही तितक्याच कारकीर्द यातूनही मोदी संपूर्णपणे उमजतील असे म्हणता येणार नाही. त्यांच्या एकूणच समर्पित जीवनाचा आढावा घेण्यासाठी या विक्रमाचे निमित्त झाले आहे असे मात्र नक्की म्हणता येईल.

- Advertisement -

भारतासारख्या अतिविशाल देशाचा कारभार सर्वाधिक काळ हाकण्याच्या बाबतीत आता केवळ पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूच मोदी यांच्या पुढे आहेत. खुद्द मोदी नेहरूंवर कारण अकारण टीका करण्याची संधी सोडत नसले तरी अगदी टोकाच्या विचारसरणीच्या या दोन नेत्यांची तुलना या निमित्ताने होत आहे हादेखील एक वेगळा योगायोग म्हणावा लागेल. खरे तर मोदी यांची तुलना त्यांच्याच भारतीय जनता पक्षाचे प्रथम पंतप्रधान राहिलेले अटलबिहारी वाजपेयी आणि विशिष्ट वर्गात मर्यादित असलेल्या या पक्षाला जनसामान्यांचा पक्ष म्हणून उभा करण्यात सर्वात महत्त्वाचे योगदान देणारे लालकृष्ण अडवाणी यांच्याशीही केली जात असते.

वाजपेयींचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ मोदींशी तुलना करता खूपच कमी म्हणता येईल; मात्र एक नेमस्त व सुसंस्कृत, तसेच केवळ कवी मनाचाच नव्हे तर स्वत:च एक संवेदनशील कवी असलेला नेता म्हणून वाजपेयी चिरस्मरणीय ठरले. रथयात्रा काढून भाजपच्या भविष्यातील देदीप्यमान यशाचा पाया रचला तो अडवाणींनी. त्यामुळे मोदी यांना त्यावर कळस चढवण्यासाठी कोट्यवधी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सुसंघटित पक्ष मिळाला. आज या पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर प्रचंड मोठ्या संख्येने सर्वसामान्य लोकदेखील ही कारणमीमांसा मान्य करताना वितंडवाद करतील, एवढा प्रचंड प्रभाव मोदी यांनी तयार करून ठेवला आहे.

मात्र, केवळ धर्माधिष्ठित राजकारणाचा आधार घेऊन मोदींनी लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे, असे म्हणणे त्यांच्यावर काहीसे अन्याय करणारे ठरू शकते. अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड जिद्दी वृत्ती त्यांच्यात आहे. त्यामुळेच अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर, काश्मीरसंदर्भातील ३७० वे कलम रद्द करणे, तिहेरी तलाक पद्धत रद्द करून मुस्लीम धर्मीय महिलांना दिलेले संरक्षण आदी एरवी कठीण असलेले निर्णय त्यांच्या काळात झाले. त्यांच्या राहणीमानावर शेलक्या भाषेत टीका केली जात असली तरी त्रयस्थ दृष्टीने पाहिले असता राजकारणी मंडळींमध्ये अभावानेच असणारा नि:स्वार्थ भाव व साधेपणा मोदींमध्ये दिसतो. त्यांच्याइतकी मेहनत घेण्याची तयारी व तेवढी क्षमता असणाराही अन्य नेता सद्यघडीस देशात नाही.

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत मोदींची जडणघडण झाली, त्या संघाचे जसे पूर्ण वेळ प्रचारक असतात. तसेच, मोदी हेदेखील पूर्ण वेळ देशाचा विचार करणारे नेते आहेत. सांसारिक पाश नसणे आणि व्रतस्थ जीवन जगणे या त्यांच्या गोष्टीही लोकांना त्यांच्या व्यक्तित्वाकडे आकर्षून घेतात. सातत्य हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुणविशेष. दुसरीकडे, लोकसभेसारख्या सर्वोच्च लोकप्रतिनिधीगृहातील विरोधी पक्षनेतेपदी असणार्‍या राहुल गांधींमधील ही उणीव प्रकर्षाने जाणवते. या सार्‍या गोष्टी लक्षात घेता मोदी यांना पर्याय म्हणून कोणीही नेता डोळ्यासमोर उभा राहत नाही. अगदी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातीलच पंतप्रधानपदासाठीच्या संभाव्य-असंभाव्य नेत्यांच्या यादीवर नजर टाकली तरी मोदी यांच्या जवळपासही कोणी पोहचू शकत नाही, हे वास्तव आहे.

भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान आणि दीडशे कोटी लोकांचे वास्तव्य असलेल्या देशाचा प्रमुख कारभारी म्हणून त्यांचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडणे साहजिक असले तरी त्यांचे स्वत:चे वलयांकित व्यक्तित्वही यास कारणीभूत आहे, हे नाकारता येणार नाही. त्याचा प्रत्यय त्यांच्या देशोदेशीच्या भेटींमध्ये येत असतो. विश्वगुरू म्हणून हेटाळणी केली जात असली तरी अनेकप्रसंगी त्यांचे मत जागतिक पातळीवर विचारात घेतले जाते. भविष्यात भारत जगाचा उपदेशक होईल की नाही हे आज सांगता येणार नाही; मात्र जगभरातील विविध विभागांमध्ये सध्या निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला एकसंघपणे बांधून ठेवले आहे, यात शंका नाही.

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मविआ-महायुतीचे उमेदवार जाहीर;...

0
मुबंई |Mumbai विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) दहा जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक (Election) होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (गुरुवार) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची...