Monday, September 7, 2026
HomeराजकीयSanjay Raut : राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये पैशांचा खेळ सुरु, राऊतांनी साधला निशाणा

Sanjay Raut : राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये पैशांचा खेळ सुरु, राऊतांनी साधला निशाणा

मुंबई । Mumbai

संपूर्ण देशात पेपरफुटीच्या घटनांनी खळबळ माजवली असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारविरुद्ध आक्रमक पवित्र घेतला आहे. “राज्याच्या शिक्षण खात्यात सध्या केवळ पैशांचाच खेळ सुरू आहे,” असा खळबळजनक आरोप करत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पेपरफुटी, शाळा मंजुरीतील लाचखोरी आणि शिक्षकांवरील अतिरिक्त ताण या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

खासदार राऊत म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर ‘नीट’ (NEET) परीक्षेचा घोळ गाजत असतानाच आता महाराष्ट्रात ‘एमपीएससी’ (MPSC) आणि ‘सीईटी’ (CET) परीक्षांचे पेपर फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. औषध निरीक्षक परीक्षा, टीईटी (TET) घोटाळा, बोगस डिग्री प्रकरणे आणि बनावट गुणपत्रिकांचे रॅकेट यामुळे राज्याची शैक्षणिक पत रसातळाला गेली आहे. नवीन शाळांना मंजुरी देण्यासाठी संस्थाचालकांकडून प्रत्येक टेबलावर पाच ते दहा लाख रुपयांची लाच उकळली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला.

शिक्षण व्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर बोट ठेवताना राऊत यांनी सांगितले की, निधीअभावी महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे शाळा बंद पडत आहेत, तर दुसरीकडे नवीन शाळांच्या परवानग्यांसाठी लाखो रुपयांचा बाजार भरला आहे. त्यातच शिक्षकांना शैक्षणिक कामांव्यतिरिक्त इतर कामांत गुंतवून ठेवले जात असल्याने अनेक शिक्षक मानसिक व शारीरिक तणावाखाली येत आहेत. रिक्त पदांवर नवी भरती करण्याऐवजी सरकार या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

संसदेतील घडामोडींचा संदर्भ देत राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संसदेत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि पेपरफुटीच्या विरोधात आवाज उठवत असताना, सत्ताधारी मात्र मूळ मुद्द्याला बगल देऊन भूतकाळातील नेत्यांवर टीका करण्यात व्यस्त आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनांची दखल घेण्याऐवजी विरोधकांना दोष देणाऱ्या सरकारला “तुम्हाला आरसा दाखवणे हेच आमचे काम आहे,” असा थेट इशारा राऊतांनी दिला. या संपूर्ण भ्रष्टाचाराला आणि विस्कटलेल्या व्यवस्थेला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आता या सनसनाटी आरोपांनंतर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर...

0
पुणे । Pune महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आज पुण्यातील रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड असंतोष उफाळून आला. लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि MPSC...