Wednesday, July 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange : २९ ऑगस्टपासून शेवटचे निर्णायक आंदोलन करणार - मनोज जरांगेंचा...

Manoj Jarange : २९ ऑगस्टपासून शेवटचे निर्णायक आंदोलन करणार – मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला (Maratha Community) वेड्यात काढण्याचे काम सुरू असून, आता आरक्षणासाठी (Reservation) आरपारची लढाई लढली जाईल. येत्या २८ ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठ्यांना प्रमाणपत्रे दिली नाहीत, तर २९ ऑगस्टपासून राज्यात शेवटचे आणि निर्णायक आंदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली. ते आज (बुधवारी) आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

५८ लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे नाहीत

यावेळी ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून समाजाच्या मुलांच्या हक्कासाठी आमचे रक्त जळत आहे. राज्यात मराठा (Maratha) समाजाच्या तब्बल ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. तरीही सरकार प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करत आहे. हैदराबाद गॅझेट लागू केले मग प्रमाणपत्रे देण्यास अडचण काय, असा सवाल करत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी तात्काळ अर्ज दाखल करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले.

जरांगे पाटलांचे सरकारवर थेट ताशेरे

पुढे ते म्हणाले की, सरकारने उपोषणानंतर (Hunger Strike) जीआर काढून ओबीसींच्या सर्व सवलती मराठ्यांना लागू केल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात शाळा-कॉलेजांमध्ये एकाही मुलाला या सवलतींचा लाभ मिळत नाही. सरकार अधिकाऱ्यांना वेड्यात काढतेय की अधिकारी सरकारला, हेच कळेनासे झाले आहे असे म्हणत जरांगे यांनी ओबीसी सवलती केवळ कागदावर असल्याचा आरोप केला.

देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नेहमी मराठ्यांच्या लेकरांवरच अन्याय का करता? अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्याजाचे परतावे थांबल्यामुळे मुलांचे सिबिल (CIBIL) खराब झाले आहे. सारथीच्या योजनाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांसाठी हा अवघ्या १५ मिनिटांचा निर्णय आहे. मात्र, ९ ओबीसी नेत्यांच्या (OBC Leader) दबावामुळे हे मंत्रालय स्थापन केले जात नाही. २९ ऑगस्टला मी त्या ९ लोकांची नावे जाहीर करेन” असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

एकानेही घरी थांबायचे नाही!

गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज एकत्र आला आहे. राजकीय श्रेयवादाच्या लढाईत मराठा तरुणांचा बळी दिला जात आहे. त्यामुळे २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य मराठ्यांच्या मुलांनी पूर्ण ताकदीने सहभागी व्हावे. आरक्षण मिळेपर्यंत आता आंदोलन मागे हटणार नाही,” असा ठाम निर्धारही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

प्रमुख मागण्या आणि अल्टिमेटम

  • २८ ऑगस्टपर्यंत हैदराबाद, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे गॅझेटियरनुसार आरक्षणाची प्रमाणपत्रे द्यावीत.
  • मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस त्वरित मागे घेण्यात याव्यात.
  • स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करून बंद पडलेल्या योजना आणि परतावे तत्काळ सुरू करावेत.

ताज्या बातम्या

Nashik Bribe Crime : १३ लाखांच्या बिलासाठी ४८ हजारांची लाच; ग्रामसेवकासह...

0
नाशिक | Nashik विकासकामांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी ५ टक्के कमिशनच्या स्वरूपात ४८ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Nashik...