अनेक कुटुंबे आणि व्यक्तिमत्वे सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली मानली जातात. अनेक बाबतीत लोक त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. नोवाक जोकोविच हे असेच एक नाव. जागतिक पातळीवरचा दर्जेदार टेनिसपटू म्हणून जग त्यांना ओळखते. या क्षेत्रातील अनेक विक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत.
लहान मुलांच्या सर्वच पालकांनी त्यांचा एका बाबतीत नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे. जोकोविच यांना दोन मुले आहेत. एक दहा वर्षांचा तर दुसरी सात वर्षांची. त्यांच्या मुलांकडे मोबाईल नाही आणि पालकांचा वापरण्याला त्यांना परवानगी नाही. त्यांचे वडील जगातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू म्हणून ओळखले जातात.
ते मुलांचा कोणताही हट्ट पुरवू शकतात. त्यांना अत्याधुनिक मोबाईल घेऊन देऊ शकतात. पण त्यांनी तसे केलेले नाही. यामागचा त्यांचा विचार त्यांनी माध्यमांकडे मांडला आहे. त्यातील मर्म पालकांनी जाणून घेण्याची गरज आहे. त्या वयात मुलांना मोबाईलची गरज नाही असे स्पष्ट मत मांडून मुलांना मोबाईलच्या व्यसनात कशाला गुंतवायचे असा प्रश्न ते विचारतात. त्या वयाच्या मुलांनी खेळावे, शिकावे आणि मज्जा करावी असे ते म्हणतात.
त्यांच्या मुलांकडूनही त्यांच्या त्याच अपेक्षा आहेत. देशात विशेषतः करोना नंतरच्या काळात मुलांना मोबाईल गरजेचाच झाला आहे असे बहुसंख्य पालकांचे ठाम मत झालेले आढळते. नकळत्या वयातील म्हणजे समज नसलेल्या वयाच्या मुलांनी मोबाईल वापराचे असंख्य तोटे आणि भयकारी दुष्परिणाम समाज सध्या अनुभवतो. मोबाईलचे व्यसन आणि इतर अशाच विविध कारणांसाठी उपचार घेणासाठी मानसतज्ञांकडे गर्दी वाढत आहे. तरीही मोबाईल वापराचा आग्रह अनेक पालक धरतात.
मुलांना त्याची गरज आहे, अशी त्याची भलावण करतात. मोठ्या वयाच्या मुलांची ती गरज असूही शकेल. तथापि लहान मुलांना मोबाइलपेक्षा पालकांच्या सहवासाची जास्त गरज असते. पालकांचा सहवास-जिव्हाळा आणि संवाद यातून मुले कितीतरी गोष्टी आणि मूल्ये आपोआप शिकतात. हे किती पालक लक्षात घेतात? किंबहुना मुलाला व्यस्त करण्यासाठीच त्यांच्या हातात मोबाईल देणारे पालकच मोठ्या संख्येने आढळतात.
मुलेही खुश आणि ते मोबाईलमध्ये गुंतले म्हणून त्यांचे पालकही निवांत असा हा मामला आढळतो. जोकोविच यांचे जगभर दौरे सुरु असतात. पण ते जेव्हा जेव्हा घरी असतात तेव्हा तेव्हा ते मुलांचे डॅडा असतात. त्यांच्या मुलांना दुसर्या कशाचीही आठवण येत नाही इतका वेळ ते मुलांना देतात असे त्यांनी सांगितले. तासंतास मुलाबाळांसहित मोबाईलवर व्यस्त असलेल्या पालकांनी जोकोविच यांच्याकडून बर्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हेच खरे.