रुढार्थाने दिवाळी संपली असली तरी दिवाळी अंक आणि घरोघरचा फराळ यानिमित्ताने तिचे कवित्व अजून काही दिवस सुरूच राहील. एकमेकांकडे दिवाळीच्या फराळाला जाण्याची परंपरा अजूनही अनेकांकडे आवर्जून पाळली जाते. गप्पाष्टके रंगवणारी दिवाळीनंतरची ही दिवाळी अनेकांना आजही भावते. भारतीय सण सार्वजनिकरित्या साजरे करण्याची परंपरा पूर्वसुरींनी घालून त्यामागचा एक उद्देश हाही एक आहे. सध्याचे जीवनमान एकदम धकाधकीचे आणि वेगवान झाले आहे. सकाळी लवकर घराबाहेर पडणे आणि रात्री घरी परतणे हेच बहुसंख्यांचे दैनंदिन वेळापत्रक बनले आहे. त्याबरोबर अनेक गोष्टी मोफत येतात. जसे की, स्पर्धा, ताणतणाव, काहीसे एकटेपण, दुरापास्त होत जाणार्या नातेवाईक आणि मित्रांच्या भेटीगाठी, सामाजिक अस्थिरता हेच बहुसंख्यांच्या सभोवतालचे वातावरण आढळते.
युवांच्या भाषेत ‘केमिकल लोच्या’ असे याचे वर्णन केले जाऊ शकेल. शांतता, निवांतपणा, उसंत आणि स्थिरता दुर्मिळ होत असावी. मानव समाजशील आहे म्हणूनच एकटेपण अजूनही स्वीकारार्ह नाही किंवा सामान्य बाब मानली जात नाही. पूर्वी माणसे सहज एकमेकांच्या घरी जायची. सहजच आलो हेच निमित्त पुरायचे. एका सामाजिक संस्थेने तर ‘सहज आलो’ असा उपक्रम देखील राबवला होता. पण वेळ नाही ही सबब बनली असावी. तथापि, एरवीच्या तुलनेत दिवाळीत मोठी सुट्टी असते. त्यामुळे उपरोक्त उणीव दिवाळीसारखे सण निदान काहीअंशी तरी भरून काढू शकतात. माणसांनी एकत्र येण्याचे, नातेसंबंधांच्या जपणुकीचे, जिव्हाळ्याचे आणि आपुलकीच्या संवर्धनाचे निमित्त दिवाळी मिळवून देते.
दिवाळीच्या सुट्टीत माणसे फिरायला जातात. नातेवाईकांच्या घरी मुलांना आवर्जून घेऊन जाणे दिवाळीत शय होऊ शकेल. पाडवा पहाट, सांज पाडवा, भाऊबीज पहाट, काव्य दिवाळी असे सांस्कृतिक भरणपोषण देखील दिवाळी घडवून आणते. अनेकांना हे कवित्व वाटू शकेल; पण समाजमाध्यमांवर असे कौटुंबिक जिव्हाळ्याचे क्षण भरभरून वाहात आहेत. दिवाळीच्या फराळाला आवर्जून आमंत्रण देतात. त्यानिमित्त रंगणार्या गप्पाष्टकांना वाचनसंस्कृतीची जोड दिली जाऊ शकेल. मोठ्या संख्येने दिवाळी अंक प्रकशित होतात. त्यांची संख्या आणि दर्जा हा चर्चेचा विषय ठरू शकेल हा भाग अलाहिदा. पण दर्जेदार अंक आजही प्रसिद्ध होतात. दिवाळीच्या निमित्ताने भेटी देण्याची नवपरंपरा अलीकडच्या काळात रुजलेली आढळते.
दिवाळीच्या पारंपरिक फराळाबरोबरच पुस्तके आणि दिवाळी अंकांच्या भेटी वाचनसंस्कृतीला पूरक ठरू शकतील का? अन्यथा, वाचनसंस्कृती उणावत चालल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आढळते. मुलांनी वाचन करावे अशी अनेक पालकांची इच्छा असते. पुस्तके सप्रेम भेट दिली जाऊ शकतील. मुलांसाठी दिवाळी अंक प्रकशित होतात. ते छोट्या मुलांपुढे ठेवले जाऊ शकतील. सहवासातून उत्सुकता बळावू शकते. उत्सुकता वाढली तर पुस्तक चाळायची शयताही वाढते. मुलांनी वाचावी अशी पुस्तके वा दिवाळी अंक त्यांच्यापर्यंत पोहोचवणे या काळात घडू शकेल. याला समाजमाध्यमांचीही जोड दिली जाऊ शकेल. हातात पुस्तक घेऊन वाचण्याची मजा औरच असली तरी म्हणजेच वाचन नव्हे. युवा पिढी ऑनलाईन वाचते.
समाजमाध्यमांवर वाचनसंस्कृतीशी संबंधित अनेक समूह चालवले जातात. त्यावर पुस्तकांविषयी चर्चा झडतात. पुस्तक परिचय करून दिले जातात. दर्जेदार लेखन करणार्या साहित्यिकांना आमंत्रित केले जाते. वाचन अॅप निर्माण होत असतात. या प्रवाहाशी मुलांना आवर्जून जोडून दिले जाऊ शकेल. गट तयार झाले तर चर्चा सुरू होतात. दैनंदिन घडामोडींशी मुले अवगत होतात. सजगता वाढते. साधकबाधक चर्चा करायला किंवा मते व्यक्त करायला मुले शिकू शकतात. सजग वाचक जागरूक समाज वाचक बनू शकेल. समस्या जाणवणे पुरेसे ठरू शकेल का? भेटीगाठी दुर्मिळ झाल्या किंवा मुले वाचतच नाहीत असे कोरडे अरण्यरूदन अनेक जण करतांना आढळतात. पण ज्यांना प्रश्न जाणवतात त्यांनी त्यांच्या परीने त्यावर उपाय शोधणे गरजेचे असते. माणसांबरोबरच पुस्तके आणि दिवाळी अंकांचा मेळा जमवण्याची सुरुवात या दिवाळीच्या निमित्ताने करू यात आणि मुलांमधील माणूसपण घडवण्याकडे प्रवास सुरू करूयात.





