भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर गेल्या दशकात ‘विश्वगुरू’ हा शब्द केवळ एक संकल्पना किंवा सांस्कृतिक वारशाचा अभिमान न राहता, तो एक प्रबळ राजकीय ‘हुकमी एक्का’ बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जागतिक पटलावर भारताचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, यात तीळमात्र शंका नाही. मात्र, याच प्रवासात जेव्हा भाजपचेच मार्गदर्शक डॉ. मुरली मनोहर जोशी ‘भारत आता विश्वगुरू नाही,’ असे परखड विधान करतात, तेव्हा त्याकडे केवळ ‘घरचा आहेर’ म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉ. जोशींचे हे उद्गार म्हणजे सत्तेच्या धुंदीत किंवा केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमणार्यांसाठी दिलेला एक गंभीर ‘रिअॅलिटी चेक’ आहे.
डॉ. जोशी यांनी केलेले भाष्य मार्मिक आणि अंतर्मुख करणारे आहे. ते म्हणतात, आपण एकेकाळी विश्वगुरू होतो, मात्र आजचे वास्तव तसे नाही. जागतिक स्तरावर भारताचा दबदबा वाढला आहे, अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे आणि संरक्षण तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात आपण मोठी झेप घेतली आहे; परंतु ‘विश्वगुरू’ होण्यासाठीचे मापदंड केवळ जीडीपीचे आकडे किंवा लष्करी ताकद हे असू शकत नाहीत. ज्या राष्ट्राकडे जागतिक स्तरावर ज्ञान, विज्ञान, नैतिकता आणि मानवी मूल्यांचे नेतृत्व करण्याची बौद्धिक क्षमता असते, त्यालाच खर्या अर्थाने विश्वगुरू संबोधले जाते. जोशी यांच्या मते, आपण ‘विश्वगुरू’ आहोत ही धारणा आजच्या काळात मिरवणे टाळले पाहिजे.
आपण सध्या त्या स्थितीत पोहोचलेलो नाही, पण तिथे पोहोचण्याची प्रबळ आकांक्षा मात्र नक्कीच बाळगली पाहिजे. ही आकांक्षा आणि सद्यस्थितीतील कटू वास्तव यातील अंतर ओळखणे, हेच एका प्रगल्भ आणि प्रगत राष्ट्राचे प्रमुख लक्षण असते. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारताने जी-२० चे यशस्वी अध्यक्षपद भूषवले, योगदिनाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जगाला अचंबित केले. या यशाच्या जोरावर ‘नवा भारत जगाचे नेतृत्व करतोय’, असा अधिकृत प्रचार यंत्रणेमार्फत सातत्याने केला जातो. मात्र, जेव्हा डॉ. जोशींसारखा ध्येयनिष्ठ आणि अभ्यासू नेता या प्रचारातील हवा काढून घेतो, तेव्हा त्यामागील वैचारिक वेदना आणि तळमळ समजून घेणे अधिक गरजेचे ठरते. कुणीही स्वतःला विश्वगुरू म्हणू नये, कारण आज आपण ते स्थान गमावले आहे, हे त्यांचे विधान कोणत्याही राजकीय द्वेषातून नव्हे, तर एका निस्सीम देशप्रेमी आणि संस्कृती रक्षकाच्या भूमिकेतून आले आहे.
आपल्या देशातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था खिळखिळी असेल, आरोग्य सुविधांची वानवा असेल आणि सामाजिक समरसतेऐवजी विषमता वाढत असेल, तर आपण उर्वरित जगाला कोणता मार्ग दाखवणार? हा मूलभूत प्रश्न डॉ. जोशींच्या विधानातून ध्वनित होतो. जोशी यांनी दिलेला हा सल्ला भारतीय राज्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. ‘विश्वगुरू’ हे बिरूद मिरवण्यापेक्षा ते साध्य करण्यासाठी आवश्यक असणार्या ‘पात्रते’वर काम करणे अधिक मोलाचे आहे. आज आपल्याला काही कठीण प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील : जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करण्यात आणि संशोधनामध्ये आपण प्रगत देशांच्या तुलनेत मागे का आहोत? देशांतर्गत सामाजिक विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरण आणि फूट पाडणारे घटक सक्रिय असताना आपण जगाला शांती आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश कोणत्या अधिकाराने देणार? ज्या देशात मूठभर अब्जाधीशांकडे संपत्ती एकवटलेली आहे आणि दुसरीकडे प्रचंड मोठी जनता अजूनही गरिबीच्या रेषेवर संघर्ष करत आहे, त्या देशाला जागतिक मार्गदर्शक मानले जाईल का? या विसंगती दूर केल्याशिवाय विश्वगुरुत्वाचे स्वप्न हे केवळ दिवास्वप्नच ठरेल.
थोडयात सांगायचे तर डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी सत्तेच्या वर्तुळाला आरसा दाखवण्याचे धाडस केले आहे. मोठी स्वप्ने पाहणे हे प्रगतीचे लक्षण असले, तरी स्वप्नांनाच वास्तव मानून बसणे हे आत्मघातकी ठरू शकते. भारताला खरोखरच जागतिक नेतृत्वाच्या स्थानी विराजमान व्हायचे असेल, तर केवळ भव्य सोहळे, परदेश दौरे किंवा सोशल मीडियावरील प्रचाराने ते साध्य होणार नाही. त्यासाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’, ‘मजबूत शिक्षण व्यवस्था’ आणि ‘तळागाळापर्यंत पोहोचणारा सर्वसमावेशक विकास’ या त्रिसूत्रीवर युद्धपातळीवर काम करावे लागेल. डॉ. जोशींचा हा सल्ला भाजपसाठी अंतर्मुख करणारा असला, तरी तो देशहिताच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा आहे. अतिआत्मविश्वासाच्या आहारी न जाता, जमिनीवरील आव्हाने पेलत प्रगतीचा रथ पुढे नेणे, हाच विश्वगुरू होण्याचा खरा आणि शाश्वत मार्ग आहे. ज्या दिवशी जगाला भारताकडून काहीतरी नवनवीन, विधायक आणि शाश्वत जीवनपद्धती शिकायला मिळेल, त्या दिवशी आपल्याला ओरडून सांगण्याची गरज उरणार नाही की आपण विश्वगुरू आहोत; तो मान जग स्वतःहून आपल्याला बहाल करेल.





