Thursday, March 13, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २६ डिसेंबर २०२४ - चालणे सदा पुढे

संपादकीय : २६ डिसेंबर २०२४ – चालणे सदा पुढे

सद्यस्थितीत अनेकांना विविध कारणांमुळे नैराश्य गाठते. तसे होऊ नये याचा अत्यंत साधासोपा मार्ग शास्त्रज्ञ सुचवतात. रोज दहा हजार पावले चालणारी व्यक्ती नैराश्य टाळू शकेल, असा निष्कर्ष त्यांनी नोंदवला आहे. यासंदर्भातील त्यांच्या अभ्यासाविषयीचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. विशिष्ट लयीत चालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे तज्ज्ञ सांगतात. अर्थात त्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाच्या निष्कर्षांची गरज निदान भारतवासियांना तरी नसावी. कारण भारतीय जीवनशैलीत दैनंदिन जीवनात व्यायामाला महत्त्वाचे स्थान दिले आहे.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सकस आहार आणि योग्य विहार जितका गरजेचा तितकाच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच व्यायामही गरजेचा मानला जातो. वयाची साठी-सत्तरी ओलांडलेल्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींच्या व्यायामाचे आणि शारीरिक लवचिकतेचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरतात. व्यायाम केला की छान वाटते, असे माणसे म्हणतात. त्यामागे उत्साह वाटतो असेच त्यांना सुचवायचे असते. त्याचे कारण व्यायामानंतर स्त्रवणारी आनंदी संप्रेरके (हॅप्पी हार्मोन्स). ती एकूण चार प्रकारची असतात. विशेष म्हणजे ती संप्रेरके स्रवणे शारीरिक क्रियांशी जोडले आहे.

- Advertisement -

उदाहरणार्थ एन्डोरफिन हे संप्रेरक. चालणे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला की ते स्त्रवते आणि माणसाला उत्साही वाटायला लागते. उत्साही आणि आनंदी माणसाला कधीही निराश वाटणार नाही हे सांगण्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची गरज असू शकेल का? चालण्याचे इतरही असंख्य फायदे सांगितले जातात. ते माणसे जाणून असतात. जसे की, प्रसन्न वाटते, थकवा कमी होतो. रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते. रक्तवाहिन्या कार्यक्षम होतात. हाडे मजबूत होतात. मांसपेशी व स्नायू संधींना बळकटी येते इत्यादी. संशोधकांनीही चालण्याला सहज सोपा उपाय म्हटले असले तरी अनेकांसाठी ते वाटते तितके सोपे नसू शकेल. कारण रोज दहा हजार पावले चालण्यासाठी प्रचंड निर्धार आवश्यक आहे. रोज त्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. अर्थात त्याचे फायदेही तितकेच आहेत. म्हणजे ‘कष्टाविन फळ ना मिळते’ हेच खरे. तात्पर्य, व्यायाम कधीतरी करून चालत नाही.

व्यायाम रोजच करण्याची क्रिया आहे आणि इथेच अनेकांचे घोडे पेंड खाते. बहुसंख्य माणसे निर्धार करण्यात कमी पडतात आणि त्याला वेळ मिळत नाही असे संबोधतात. काही दिवसांत नवीन वर्ष सुरू होईल. माणसे रोज व्यायामाचा संकल्प करतील. पण फारच कमी जणांची संकलपूर्ती होते. कारण निर्धार कमी पडतो. सध्या हिवाळा सुरू आहे. तो आरोग्य कमावण्याचा ऋतू मानला जातो. नैराश्य गाठू नये, सतत उत्साही वाटावे आणि कोणतीही व्याधी जडू नये असेच माणसांना वाटते. इच्छापूर्तीसाठी हिवाळ्या दुसरा उत्तम मुहूर्त नाही. एखादी व्याधी जडली की मग माणसे व्यायामाला लागतात. तथापि व्याधी न होण्यासाठी व्यायाम करण्यातच शहाणपण आहे हेच संशोधकांनादेखील सुचवायचे असावे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...