Thursday, September 3, 2026
HomeनगरSangamner : संगमनेर तालुक्यात 90 ब्रास अवैध वाळूसाठे जप्त

Sangamner : संगमनेर तालुक्यात 90 ब्रास अवैध वाळूसाठे जप्त

महसूल विभागाची धडक कारवाई || वाळूतस्करांमध्ये खळबळ

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल पथकासह स्वतः कारवाई करत कोल्हेवाडी, जोर्वे आणि खांडगाव शिवारातील एकूण 90 ब्रास वाळूचे तीन अवैध साठे जप्त केले. जप्त केलेल्या वाळूची नियमानुसार रॉयल्टी भरून ती शासकीय कामांसाठी देण्यात आली आहे. दरम्यान, दाढ खुर्द शिवारात वाळूने भरलेला टिप्पर कारवाईदरम्यान चालकाने पळवून नेल्याने टिप्परमालकासह अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेवाडी शिवारात नितीन सखाराम दिघे (वय 32) याने कोणताही परवाना अथवा शासकीय परवानगी न घेता वाळूचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी तेथे 30 ब्रास वाळूचा अवैध साठा आढळून आला. पथकाने तत्काळ हा साठा जप्त करून नितीन दिघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर महसूल पथकाने जोर्वे शिवारात कारवाई करत 20 ब्रास, तर खांडगाव शिवारात 40 ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त केला. कोल्हेवाडीतील 30, जोर्वेतील 20 आणि खांडगावातील 40 ब्रास, अशा एकूण 90 ब्रास वाळूचे तीन अवैध साठे जप्त करण्यात आले.

या वाळूची नियमानुसार रॉयल्टी रक्कम भरून ती शासकीय कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, दाढ खुर्द शिवारातही महसूल पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई केली. सागर गोरख जगताप यांच्या मालकीच्या टिप्परमध्ये अनोळखी चालकाच्या माध्यमातून सुमारे दोन ब्रास वाळू अवैधरित्या वाहून नेली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने टिप्पर थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत विचारणा केली. मात्र, चालकाने टिप्पर न थांबवता भरधाव वेगाने तेथून पळ काढला. या प्रकरणी टिप्परमालक सागर गोरख जगताप आणि अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सलग सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या

Jalna : विखे पाटलांनी शरद पवारांकडे दाखवलं बोट

0
जालना | Jalna अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...