Monday, September 28, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ३ सप्टेंबर २०२६ - ‘आवाज’ विवेक, संस्कृती, आरोग्याचा!

संपादकीय : ३ सप्टेंबर २०२६ – ‘आवाज’ विवेक, संस्कृती, आरोग्याचा!

संपूर्ण महाराष्ट्राला लाडया बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली होती, तो उद्देश समाजप्रबोधन, राष्ट्रीय जाणिवा जागृत करणे आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचा होता. मात्र, काळाच्या ओघात या पावन उत्सवाचे स्वरूप बदलले आणि त्यात अनिर्बंध, कर्णकर्कश डीजे संस्कृतीने शिरकाव केला. या ध्वनिप्रदूषणाविरुद्ध आता मुंबई आणि पुणेकरांनी एकमुखाने आपला आवाज बुलंद केला आहे, त्याच धर्तीवर नाशिककरांनीही यंदा ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा निग्रह करण्याची वेळ आली आहे. पुण्यामध्ये डीजेच्या या कर्णकर्कश त्रासाविरुद्ध नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारला आहे.

- Advertisement -

नारायण पेठेतील नागरिकांनी महापालिकेच्या बैठकीत घेतलेली आक्रमक भूमिका असो किंवा गुडलक चौकात पुणेकरांनी केलेला एल्गार असो, हा केवळ एका सणाचा किंवा उत्सवाचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचा आणि मूलभूत आरोग्याचा लढा बनला आहे. न्यायालयाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना व डेसिबल मर्यादेचे नियम असतानाही डीजे आणि हाय डेसिबल साऊंड सिस्टिमद्वारे नियमांची पायमल्ली केली जाते. वृद्ध, नवजात बालके, गर्भवती महिला, रुग्ण आणि रात्र-रात्र मेहनत करून अभ्यास करणारे विद्यार्थी यांना या आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक कुटुंबीयांना तर सणाच्या दिवसांत आपले घर सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागतो, यापेक्षा मोठी सामाजिक शोकांतिका ती कोणती? सण साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; परंतु शांततेत आरोग्यसंपन्न जगण्याचा अधिकारही तेवढाच महत्त्वाचा आहे.

दोन्हीमध्ये समतोल साधण्याची आज नितांत गरज आहे. दुसरीकडे, या जनक्षोभाची दखल घेत शासनानेही स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे बनले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौर्‍यात पुणेकरांनी वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असा मोलाचा सल्ला दिला आहे. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह दोनशेहून अधिक गणेश मंडळांनी यंदा पूर्णपणे डीजेमुक्त राहून पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा, लेझीम, वाद्यवृंद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे, जी स्वागतार्ह व अनुकरणीय आहे. हा लढा सण किंवा परंपरेच्या विरोधात नसून, उत्सवाच्या नावाखाली चाललेल्या ध्वनिप्रदूषणरूपी दहशतीविरुद्ध आणि बाजारपेठीय संस्कृतीविरुद्ध आहे.

नाशिकचा विचार केला तर येथेही डीजे संस्कृतीचा व हाय डेसिबल साऊंड सिस्टिमचा वेगाने प्रसार झाला आहे. सीबीएस, गंगापूररोड, रविवार कारंजा यांसारख्या वर्दळीच्या आणि निवासी भागात सण-समारंभांच्या काळात आवाजाची पातळी कायदेशीर मर्यादांच्या कैक पटी ओलांडते. रुग्णालये, शाळा आणि शांतता क्षेत्रांचे नियम पायदळी तुडवले जातात. मिरवणुकीच्या प्रचंड आवाजामुळे घरांच्या खिडयांच्या काचा थरथरणे, भिंती कंप पावणे आणि नागरिकांच्या छातीत धडधड होणे यांसारख्या गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. परंतु या समस्येवर नाशिकमध्ये अजूनही अपेक्षित ती जनजागृती आणि आक्रमकता दिसून आलेली नाही. पुणे-मुंबईच्या सुजाण नागरिकांनी ज्याप्रकारे प्रशासनाला जाब विचारून पुढाकार घेतला आहे, तीच सामाजिक जाणीव आणि दिशा नाशिककरांनाही स्वीकारावी लागेल; जेणेकरून शहराचे आरोग्य आणि शांतता अबाधित राखता येईल.

गणेशोत्सव हा केवळ शक्तिप्रदर्शनाचा किंवा कर्णकर्कश गाण्यांवर अंगाची लाही करून घेण्याचा मंच नव्हे, तर तो भक्ती, सांस्कृतिक समृद्धी आणि सामाजिक समभावाचा त्रिवेणी संगम आहे. डीजे आणि लेझर किरणांच्या अतिरेकामुळे उत्सवाचे पावित्र्य आणि सुरक्षितता धोयात येत आहे. सण साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; परंतु शांततेत आरोग्यसंपन्न जगण्याचा अधिकारही तेवढाच महत्त्वाचा आहे. यात समतोल साधण्याची गरज आहे. नियम कागदावर न राहता त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण करण्याची जबाबदारी सुजाण नागरिकांची आहे आणि प्रशासनानेही निष्काळजीपणा न दाखवता कठोर व कायदेशीर पावले उचलली पाहिजेत.

यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्येक सार्वजनिक मंडळाने आणि गणेशभक्तांनी पुढाकार घेऊन ‘डीजेमुक्त आणि ध्वनिप्रदूषणमुक्त नाशिक’चा निर्धार करणे गरजेचे आहे. पारंपरिक वाद्यांचा मंगल गजर, ढोल-ताशांचा शिस्तबद्ध ठेका आणि स्नेहाचे वातावरण याद्वारेच बाप्पाचे स्वागत करूया. आपल्या शहराची समृद्ध सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि भावी पिढीच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हा आवाज उठवणे हीच बाप्पाची खरी आणि सच्ची भक्ती ठरेल!

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...