राजकारणात ‘अशय’ असे काहीच नसते, पण काही घटना अशा असतात ज्या राजकीय नैतिकतेच्या पायालाच हादरा देतात. ‘आम आदमी पार्टी’ या नावातूनच सामान्य माणसाच्या आकांक्षेचे प्रतिबिंब उमटते, असे दावे करणार्या पक्षाला आज आपल्याच अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सात खासदारांनी एका दमात पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे, हा केवळ एका पक्षाचा अंतर्गत प्रश्न उरलेला नाही, तर तो बदलत्या भारतीय राजकारणाचे एक विदारक वास्तव मांडणारा ठरला आहे.पंजाबमध्ये निवडणुकीला अवघे दहा महिने उरलेले असताना झालेली ही बंडाळी मआपफसाठी केवळ धक्का नाही, तर तो आत्मपरीक्षणाचा गंभीर इशारा आहे. राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांसारख्या दिग्गज नेत्यांनी पक्षाचा त्याग करणे हे चकित करणारे आहे.
विशेषतः राघव चड्ढा, ज्यांना अरविंद केजरीवाल यांचे उजवे हात मानले जात होते, त्यांनीच जेव्हा पक्षाने तत्त्वे सोडली आहेत असा आरोप केला, तेव्हा या फुटीचे मूळ केवळ सत्तेच्या अभिलाषेत नसून अंतर्गत विश्वासाच्या तडाख्यात असल्याचे स्पष्ट होते. दोन तृतीयांश खासदारांनी एकत्र गट करून भाजपमध्ये विलीनीकरण केल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याची टांगती तलवार राहणार नाही. परंतु, नैतिकतेच्या गप्पा मारणार्या पक्षातून एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडतात, तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे विधान अत्यंत चपखल वाटते: जर एवढ्या मोठ्या संख्येने लोक पक्ष सोडत असतील, तर दोष पक्षातच असावा.‘आप’च्या नेत्यांनी या घटनेला ‘ऑपरेशन लोटस’ असे नाव दिले असून पंजाब सरकार पाडण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी याला पंजाबच्या जनतेचा विश्वासघात म्हटले आहे. मात्र, केवळ बाह्यशक्तींना दोष देऊन ‘आप’ला आपल्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. अशोक मित्तल यांच्यासारख्या नेत्यावर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांनी भाजपची वाट धरली, हे निव्वळ योगायोग मानणे भाबडेपणाचे ठरेल.
तपास यंत्रणांचा धाक आणि राजकीय सोयीचे राजकारण यांचा मेळ बसवून भाजपने आपली ‘विकसित भारत २०४७’ची रणनीती आखली असल्याचे चित्र समोर येते. या फुटीची बीजे राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले तेव्हाच रोवली गेली होती, असे आता बोलले जात आहे. अशोक मित्तल यांच्यावर विश्वास टाकून त्यांना पद दिले गेले. मात्र, त्यांच्याच मनात काय शिजत होते, याचा सुगावा पक्षनेतृत्वाला लागला नाही, हे ‘आप’च्या गुप्तचर यंत्रणेचे आणि समन्वयाचे मोठे अपयश आहे. जेव्हा पक्षात संवाद संपतो आणि केवळ ‘हायकमांड’चा आदेश चालतो, तेव्हा अशा प्रकारची स्फोटक परिस्थिती निर्माण होते.पंजाबच्या राजकारणात ‘आप’ने प्रस्थापित पक्षांना धूळ चारून सत्ता मिळवली होती. आता त्यांचेच खासदार भाजपच्या तंबूत गेल्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पंजाबमध्ये पाय रोवण्याची आयती संधी मिळाली आहे.
हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी यांसारख्या प्रसिद्ध चेहर्यांनी भाजपची साथ देणे, हे भाजपसाठी केवळ संख्याबळ वाढवणे नसून एक ‘प्रतीकात्मक संदेश’ देणे आहे की, देशाच्या विकासासाठी आता पर्यायी राजकारण करणार्यांनाही भाजपचा मार्ग योग्य वाटू लागला आहे.कोणताही पक्ष हा त्याच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या विश्वासावर टिकून असतो. राघव चड्ढा यांनी लावलेला वैयक्तिक हितासाठी पक्षाचे काम चालले आहे हा आरोप गंभीर आहे. जर ‘आम आदमी पार्टी’ला आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर त्यांना केवळ भाजपवर आरोप करून चालणार नाही, तर आपल्या घराला लागलेली ही गळती रोखण्यासाठी मुळापासून दुरुस्ती करावी लागेल.दुसरीकडे, भाजपसाठी ही खेळी फायदेशीर ठरली असली तरी, ‘पक्षांतर’ आणि ‘फोडाफोडी’च्या या राजकारणामुळे मतदारांच्या मनात लोकशाहीबद्दल जी साशंकता निर्माण होत आहे, ती भविष्यासाठी धोयाची आहे. आजची ही पडझड हे केवळ एका पक्षाची नसून, ती भारतीय राजकारणातील ‘आदर्शवादाच्या’ पराभवाची खूण आहे.





