नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज पार पडली. ३ जून ते ५ जून या कालावधीत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. यावेळी रिझर्व्ह बँकेने महागाईदरम्यान सामान्यांना दिलासा देत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेत रेपो दर जैसे ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे रेपो दर ५.२५ टक्क्यांवर ठेवला आहे. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यात युद्धांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता यासंदर्भात भाष्य केले.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यावेळी सांगितले की, सध्या निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीचे सखोल विश्लेषण केल्यानंतर रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवत असल्याचे संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले. आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट कायम ठेवत गृहकर्जदारांना दिलासा दिला आहे. दर तीन महिन्यांनी आरबीआयची यासंदर्भात बैठक घेतली जाते. मागच्या बैठकीप्रमाणे याही बैठकीमध्ये रेपो रेट न वाढवण्यावर आरबीआय ठाम आहे.
आरबीआयने रेपो रेट जैसे थे का ठेवला?
आरबीआयने पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जागतिक पातळीवर भूराजनैतिक संघर्षामुळे निर्माण झालेली अस्थिरता, सप्लाय चेनमध्ये निर्माण झालेले अडथळे आणि दबाव याशिवाय ऊर्जा साधनांचे वाढलेले दर याचा परिणाम विकासाच्या वेगावर झाला असून महागाईच्या अंदाजात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुरवठा तुटवड्याचा परिणाम चौथ्या तिमाहीत आणि त्यानंतर देखील कायम राहील. जागतिक संकटानंतर देखील देशातील रिटेल महागाई दर निश्चित टार्गेटच्या खाली असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
संजय म्हलोत्रा यांनी म्हटलं की आर्थिक अनिश्चिततांच्या काळात आम्ही आव्हानं पार करुन पुढं जाऊ असा विश्वास आहे. पतधोरण विषयक समिती डेटावर लक्ष ठेवेल, आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा म्हणाले की पुरवठ्यावरील दबाव आणि इतर घडामोडींवर आमचं लक्ष असेल.
आरबीआय रेपो रेट का वाढवते किंवा कमी करते?
महागाईचा सामना करण्यासाठी कोणत्याही मध्यवर्ती बँकेकडे ‘पॉलिसी रेट’ हे एक प्रभावी साधन असते. जेव्हा महागाई जास्त असते, तेव्हा मध्यवर्ती बँक पॉलिसी रेट वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशांचा ओघ नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. पॉलिसी रेट वाढल्यामुळे व्यावसायिक बँकांसाठी मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेणे महाग होते. परिणामी, बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्जाचे व्याजदर वाढवतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशांचा ओघ कमी होतो; पैशांचा पुरवठा कमी झाल्याने मागणी घटते आणि पर्यायाने महागाई कमी होते.
रेपो रेट म्हणजे काय आहे?
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले की, एमपीसीने आपले धोरण तटस्थ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने रेपो दर ५.२५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला. एसडीएफ दर ५.०० टक्क्यांवर आणि एमएसएफ दर ५.५० टक्क्यांवर सध्या स्थिर आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




