Sunday, September 27, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २७ जुलै २०२६ - यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनेने छेडलेल्या आंदोलनासमोर अखेर अहंकारी सत्तेला झुकावे लागले. ‘जेन झी’ने आपल्या प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्या. अल्पावधीत मिळवलेला हा विजय निश्चितच अभूतपूर्व, कौतुकास्पद आणि लोकशाहीतील जनशक्तीचा विजय मानला पाहिजे. सत्ताधार्‍यांच्या वरवंट्यासमोर मान न झुकवता, रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांची सनदशीर मार्गाने पूर्तता करून घेणे हा या नवोदित संघटनेचा मोठा नैतिक विजय आहे.

- Advertisement -

परंतु, विजयाचा गुलाल उधळत असतानाच सीजेपी आणि आंदोलक तरुणांनी या अत्यंत महत्त्वाच्या व नाजूक वळणावर थांबून आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. या आंदोलनाच्या काळात एक चित्र स्पष्टपणे दिसले ते म्हणजे, सत्ताधार्‍यांना घेरणारी राजकीय परिस्थिती पाहताच विरोधकांनी तातडीने या आंदोलनाला दिलेला पूर्ण पाठिंबा. विरोधी पक्षांनी आंदोलनाच्या मंचाचा वापर केला किंवा पाठिंब्याचे पत्र दिले, याचा अर्थ त्यांनी तरुण पिढीच्या विचारांशी पूर्ण बांधिलकी मानली असा होत नाही. सीजेपीच्या नेतृत्वाने हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की, राजकारणात कोणतीही मदत विनामूल्य किंवा बिनशर्त नसते. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने विरोधी पक्षांनी या आंदोलनाच्या आगीवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला.

सरकारला उघडे पाडण्यासाठी एक ढाल म्हणून तरुण पिढीच्या खांद्याचा वापर करणे, हाच त्या राजकीय पक्षांचा मुख्य हेतू होता. या राजकीय खेळीचा वास सीजेपीला आला नाही, तर ते अल्पावधीत मिळालेल्या यशाचे अपत्य ठरेल. सीजेपीची स्थापना ही मुळात तरुणांच्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या आणि भविष्याच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्यासाठी झाली आहे. या संघटनेचा मूळ पाया ‘समाजकारण’ हा आहे, ‘राजकारण’ नव्हे. आजवर अनेक तरुण संघटना सामाजिक क्रांतीचा नारा देत उदयास आल्या; पण कालांतराने राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन स्वतःची मूळ ओळख गमावून बसल्या, हा इतिहास आहे. राजकारणाच्या चिखलात उतरून तात्कालिक राजकीय फायदा मिळवणे सोपे असते; परंतु निष्पक्ष राहून समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करणे अत्यंत कठीण असते.

सीजेपीने आपला मूळ हेतू विसरता कामा नये. राजकीय पक्षांच्या पाठिंब्यामागील अदृश्य हेतू ओळखून, त्यांच्यापासून एक सुरक्षित आणि योग्य अंतर राखणे हीच या संघटनेच्या दीर्घकालीन अस्तित्वाची गुरुकिल्ली ठरेल. आंदोलनात विजय मिळाला म्हणजे प्रवास संपला असे नाही, तर तो खरा आता सुरू झाला आहे. मिळविलेले यश जितके मोठे असते, तितकीच जबाबदारीची जाणीव अधिक असावी लागते. अल्पावधीत मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने हुरळून जाणे, हे कोणत्याही तरुण आणि तडफदार संघटनेसाठी घातक ठरू शकते. यश डोयात गेले की विवेकाचा आवाज क्षीण होतो आणि मूळ ध्येयापासून भरकटायला वेळ लागत नाही. जनमानसात निर्माण झालेला विश्वास टिकवणे ही यापुढील खरी कसोटी असेल.

सरकारला नमवणे हे कौशल्याचे काम होते; पण आता सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेणे, ही खरी समाजकारणाची पायरी आहे. आंदोलनाचा आवेश संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा टप्पा सुरू होतो. सीजेपीने आता केवळ विरोधाचे राजकारण न करता, रचनात्मक आणि सकारात्मक समाजकारणावर भर दिला पाहिजे. तरुणांमधील बेरोजगारी, शैक्षणिक दरी, मानसिक आरोग्य आणि भविष्यातील आव्हाने यावर धोरणात्मक अभ्यास करून शासनाला ठोस पर्याय देणे गरजेचे आहे. थोडयात सांगायचे तर, जंतरमंतरवरील आंदोलन ही केवळ एक सुरुवात होती, अंतिम ध्येय नव्हे. राजकीय पक्षांच्या राजकीय गणितांचे बुद्धिबळ समजून घेत, सीजेपीने स्वतःचा स्वाभिमान आणि स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे.

‘जेन झी’ पिढीकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, हे या आंदोलनाने सिद्ध केले आहे. आता गरज आहे ती या ताकदीला परिपक्वतेची जोड देण्याची. यशाची हवा डोयात न जाऊ देता, समाजकारणाचा मूळ ध्यास उराशी बाळगून जर सीजेपी पुढे गेली, तरच हे आंदोलन केवळ एका विजयापुरते मर्यादित न राहता देशातील तरुणाईच्या नव्या युगाची पहाट ठरेल.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...