नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा प्रशासनाने आगामी खरीप हंगामासाठी २ हजार ९२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ४३० कोटींची वाढ करण्यात आली असली, तरी कर्जमाफीच्या घोषणेमुळे प्रत्यक्ष शेतकरी (Farmer) कर्ज घेण्यास पात्र ठरणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील (District) शेतकऱ्यांचा मुख्य आधार असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या तीव्र आर्थिक अडचणीत सापडली आहे. यंदा बँकेची कर्ज वसुली अत्यंत नगण्य झाली आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमुळे जिल्ह्यातील ३ ते ४ लाखांहून अधिक शेतकरी थकबाकीदार झाले असून, त्यांची खाती एनपीएमध्ये गेली आहेत. बँकांच्या नियमांनुसार, जुनी थकबाकी भरल्याशिवाय नवीन कर्ज मिळणे अशक्य असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी खरीप हंगामापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, आता ही कर्जमाफी ३० जूननंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खरिपाची पेरणी जूनच्या सुरुवातीलाच होते, तर कर्जमाफी महिनाभर उशिरा होणार असल्याने शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात पैशांसाठी वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पतपुरवठ्यामध्ये विविध बँकांचा वाटा
राष्ट्रीयकृत बँका : १,८५४ कोटी ७४ लाख रुपये
खाजगी बँका : ५९५ कोटी ८१ लाख रुपये
जिल्हा सहकारी बँक : ४६० कोटी ४७ लाख रुपये
ग्रामीण बँका : १४ कोटी ६९ लाख रुपये





