आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर स्थायी मित्र किंवा स्थायी शत्रू नसतात, असतात ते फक्त स्थायी हितसंबंध, हे वचन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा उल्लेख ‘नरक’ असा केल्याने जागतिक राजनैतिक वर्तुळात संतापाची लाट उसळली. ज्या देशाला ‘नमस्ते ट्रम्प’ म्हणत भारताने ऐतिहासिक आदरातिथ्य दिले, त्याच देशाच्या प्रगतीला ‘नरक’ म्हणणार्या ट्रम्प यांच्याच कार्यक्रमात गोळीबार व्हावा, हा नियतीचा क्रूर विरोधाभास आहे.
एका बाजूला भारत अब्जाधीशांच्या संख्येत जगात तिसर्या क्रमांकावर झेप घेत असताना, दुसरीकडे अमेरिकेचे नेतृत्व करणारे ट्रम्प स्वतःच्याच देशात रक्ताच्या थारोळ्यात पडता पडता वाचले आहेत. हॉटेल हिल्टनमधील पार्टीत ट्रम्प उपस्थित असताना झालेला गोळीबार अमेरिकन समाजात धुमसणार्या टोकाच्या ध्रुवीकरणाचा स्फोट आहे. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले टोकाचे निर्णय मग ते इराणवरील हल्ले असोत, व्यापार युद्ध असो वा व्हिसा शुल्कातील भरमसाठ वाढ, यामुळे केवळ जागतिक समुदायच दुखावला गेला नाही, तर खुद्द अमेरिकन नागरिकही आपल्या नेत्याविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. जो नेता जगाला ‘नरक’ दाखवण्याची भाषा करतो, त्याला स्वतःच्याच देशातील लोकशाही मूल्यांचा ‘स्वर्ग’ टिकवता येत नाही, ही मोठी शोकजनक बाब आहे. ट्रम्प यांनी या हल्ल्याला ‘धर्मद्वेष’ म्हटले असले, तरी प्रत्यक्षात हा त्यांच्याच धोरणांमुळे निर्माण झालेला अंतर्गत रोष असल्याचे स्पष्ट दिसते.
एकीकडे ट्रम्प भारताला नरक संबोधत असताना, वास्तवाचे आकडे मात्र काही वेगळेच आणि देदीप्यमान चित्र मांडत आहेत. ‘नाईट फ्रँक’च्या २०२६ च्या ‘द वेल्थ रिपोर्ट’नुसार, भारत आज अब्जाधीशांच्या संख्येत जगात तिसर्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. २०२६ पर्यंत ही संख्या ३१३ वर पोहोचण्याचा अंदाज असून, गेल्या पाच वर्षांत भारतीय श्रीमंतांच्या संख्येत तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे. जेव्हा पाश्चिमात्य जगातील बलाढ्य अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेने आपली लवचिकता आणि समृद्धी सिद्ध केली आहे. मुंबई आज केवळ भारताची आर्थिक राजधानी राहिलेली नाही, तर ती जागतिक स्तरावर ‘अतिश्रीमंतांचे हक्काचे घर’म्हणून उदयास आली आहे. अशा प्रगतशील देशाला ‘नरक’ म्हणणे, हे केवळ अज्ञान नसून राजकीय स्वार्थापोटी केलेला द्वेषपूर्ण अपप्रचार वाटतो. ट्रम्प यांच्या या विखारी विधानांच्या मुळाशी अमेरिकेतील अंतर्गत निवडणूक राजकारण दडलेले आहे. अमेरिकेतील ‘जन्मजात नागरिकत्व’ कायद्यावर टीका करताना त्यांनी स्थलांतरितांना, विशेषतः भारत आणि चीनच्या नागरिकांना लक्ष्य केले आहे.
लोक अमेरिकेत येऊन मुले जन्माला घालतात आणि नागरिकत्व मिळवून संपूर्ण कुटुंब तिथे स्थायिक करतात, हा त्यांचा आरोप म्हणजे ‘व्होट बँक’ जपण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते वॉल स्ट्रीटपर्यंत भारतीयांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जे वर्चस्व निर्माण केले आहे, त्यातून स्थानिक अमेरिकन नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना ट्रम्प आपल्या प्रचारासाठी वापरत आहेत. परंतु, हे करताना त्यांनी वापरलेली भाषा एका जबाबदार जागतिक नेत्याला मुळीच शोभणारी नाही. इराणने या प्रकरणात भारताची बाजू घेत ट्रम्प यांना सुनावले आहे. इराणच्या मते, प्राचीन सभ्यतांना अपमानित करणारा अमेरिकन अहंकार हाच खरा नरकाचा दरवाजा आहे. ट्रम्प यांनी ‘नरक’ संबोधल्यानंतर टीका होताच, ‘भारत हा महान देश असून त्याचे नेतृत्व माझे मित्र करत आहेत,’ अशी सारवासारव केली खरी; पण मूळ विधानामुळे झालेली जखम खोल आहे.
भारत आज केवळ स्थलांतरितांचा पुरवठा करणारा देश राहिलेला नाही, तर तो जगाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनला आहे. अमेरिकेचे तंत्रज्ञान क्षेत्र असो, अंतराळ संशोधन असो वा आरोग्य सेवा, भारतीयांच्या योगदानाशिवाय जगाची प्रगती खुंटेल, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. ट्रम्प यांच्या कार्यक्रमातील गोळीबार त्यांच्या द्वेषपूर्ण आणि वादग्रस्त धोरणांची परिणती असू शकतो. मात्र, भारतासाठी हा काळ आत्मविश्वासाचा आहे. भारताने जागतिक मंचावर आपली प्रतिमा ‘विश्वगुरू’ आणि जबाबदार अण्वस्त्रधारी लोकशाही देश म्हणून निर्माण केली आहे. अशा वेळी कोणा देशाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून अपमान सहन करणे, हे भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेला तडा देणारे आहे. भारत हा ‘नरकाचा दरवाजा’ नसून, तो उद्याच्या जगाच्या ‘प्रगतीचे आणि समृद्धीचे दार’ आहे, हे भारताने कर्तृत्वाने सिद्ध केले आहे आणि ते कुणाच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नाही.





