Friday, April 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २८ ऑक्टोबर २०२४ - ’गाव करी ते…’

संपादकीय : २८ ऑक्टोबर २०२४ – ’गाव करी ते…’

संकटात नेहमी एक संधी दडलेली असते असा सुविचार शाळेतल्या फलकावर लिहिलेला असतो. ते आव्हान तुम्ही पेलले तर जगावेगळे काम उभे राहू शकते, असा उपदेश अनेक यशस्वी माणसे नेहमी करतात. अशीच संधी बाबुराव केंद्रे यांनी साधली आणि त्यांचे गाव दुष्काळमुक्त होऊ शकले. त्यांच्यापुढे उभे ठाकलेले संकट भावनाप्रधान होते. नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील नागदरवाडी हे त्यांचे गाव!

गावात पाण्याची सोय नसल्याने सुमारे तीन-चार किलोमीटर दुरून पाणी आणावे लागत असे. त्यामुळे त्या गावात सोयरीक करून मुलगी द्यायला कोणीच तयार नसायचे. केंद्रे यांचेही लग्न अनेकदा मोडले. त्यातूनच त्यांना गावातच पाणी उपलब्ध करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी ती गावकर्‍यांत रुजवली. गावात जलसंधारणाचे सामूहिक काम त्यांनी सुरू केले. चराईबंदी, कुर्‍हाडबंदी आणि श्रमदान असे तीन नियम केले. त्यावर गावाला ठाम राहायला शिकवले.

- Advertisement -

गेला काही वर्षांत परिसरातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण झाले. गावात 100 हून जास्त विहिरी, तीनशेहून जादा शेततळी आहेत. पाच लाख झाडे लावली गेली आहेत. छोट्या-छोट्या कामांसाठी सरकारवर अवलंबून राहण्याची सवय समाजात रुजलेली पाहायला मिळते. परिणामी माणसे वर्षानुवर्षे गैरसोय सहन करतात. सरकारच्या दुर्लक्षाविषयी तक्रार करतात. त्यांची तक्रार असत्य नसते, पण लोकसहभागातून कोणत्याही सामाजिक समस्येवर उत्तर शोधले जाऊ शकते, याचे उदाहरण नागदरवाडीने घालून दिले.

पावसाळ्यात धो-धो पाऊस आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासणारी अनेक गावे, पाडे, वाड्या आणि वस्त्या राज्यात आहेत. महिला वर्षानुवर्षे गैरसोय सहन करतात. डोक्यावर हंडे घेऊन दूरवरून पाणी आणणार्‍या महिला हेच अशा ठिकाणचे चित्र बनते. पाणी भरण्यातच महिलांचे बरेच दिवस जातात. ‘देशदूत’चा चमू अनेक गावांना भेटी देऊन तिथल्या समस्यांचे ‘ग्राउंड रिपोर्ट’ करतो. ते प्रसिद्धही होतात. टाकीला तोट्या नसणे, गावात नळ आहेत, पण टाकीसाठी विजेची सोय नसणे, अशा कारणांमुळे गाव टंचाईग्रस्त असते.

या प्रश्नावर लोकसहभागातूनच उत्तर शोधले जाऊ शकते. मात्र त्यासाठी कोणातरी केंद्रेंनी तरी पुढाकार घ्यावा लागतो. अनेक सामाजिक संस्था ही उणीव भरून काढू शकतात. काही संस्था तसे प्रयत्न करतात. प्रयत्न करणार्‍या संस्थांना गावकरी पाठबळ देऊ शकतील. केवळ पाणीटंचाईच नव्हे तर अशा अनेक समस्या गावातील रहिवाशांना भेडसावतात. वर्षानुवर्षे त्रास सहन करण्यापेक्षा सामूहिकरित्या त्यावर मात करण्याचा प्रयत्न माणसे करू शकतील. गाव एकत्र आल्यास ‘गाव करी ते राव काय करी’ असा अनुभव लोकांना येऊ शकतो. त्यादृष्टीने नागदरवाडीचे काम प्रेरणादायी ठरेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...