वयाची किशोरावस्था किंवा कुमारवय खूप संवेदनशील असते. आयुष्यातल हा अतिशय महत्त्वाचा टप्पा अणि वळण असते. त्या वयात संस्कार, पालकांचा सुसंवाद आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते सुजाण नागरिक घडण्याच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल ठरते. अशी मुले उत्तम माणूस म्हणूनही घडतात. अशाच काही रत्नांचा ‘बालवीर’ पुरस्कार देऊन केंद्र सरकारने गौरव केला. त्यातील दोन जणांचा तर तो मरणोत्तर गौरव होता. त्या वीसही जणांचा या पुरस्कारापर्यंतचा प्रवास एखाद्या चित्तरकथेपेक्षा जराही कमी नाही. पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांनाही ती मुले सहज वावरली. त्यांनी जगावेगळे काही केले आहे असे त्यांना अजिबात वाटत नव्हते हेही दखलपात्रच आहे.
कारण एरवी जे वय खेळण्या-बागडण्याचे मानले जाते त्या वयात त्या सर्वांनी विलक्षण समजूतदारपणाचे, धाडसाचे, माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले. तामिळनाडूमधील आठ वर्षाच्या व्योमाने सहा वर्षाच्या मुलाचा जीव वाचवला. बिहारच्या कमलेशने एका मुलाचा पाण्यात बुडत असताना प्राण वाचवले. दुर्दैवाने त्यात त्यांना त्यांचे प्राण मात्र गमवावे लागले. पंजाबच्या दहा वर्षाच्या श्रवणने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लढणार्या सैनिकांना अनेक दिवस दिवसभर चहा, दूध आणि लस्सी पुरवली. छत्रपती संभाजीनगरचा अर्णव महर्षी अर्धांगवायूग्रस्त आहे. त्याच वेदनेतून त्याच्यातील संशोधकाचा जन्म झाला. अशा रुग्णांना मदत करणारे यंत्र त्याने शोधले आहे. त्याची दोन पेटंट त्याच्या नावावर जमा आहेत.
पुरस्कारप्राप्त प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आणणारी आहे. सर्वांनी केलेली ती कृती स्वयंस्फूर्त होती. मदतीला धावून जाण्यासाठी, सहवेदना जाणून घेण्यासाठी किंवा देशासाठी खेळ असे त्यांना कोणीच काही सांगावे लागले नाही. समोरच्या व्यक्तीला मदतीची गरज आहे आणि ती आपण करू शकतो एवढेच कदाचित त्यांना जाणवले असावे. मदतीची भावना इतकी प्रबळ होती की, त्यातील दोघांनी तर त्यांच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. त्यांच्या पालकांचेही समाजाने कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांनी मुलांचे पाय मागे खेचले नाहीत. त्यांना प्रेरणाच दिली. मुलांच्या मनाला जाणीव करून दिल्याशिवाय भीती किंवा स्वार्थ स्पर्श करू शकत नाही हे त्यांनी लक्षात घेतले असावे. श्रवण तर युद्धभूमीत जात होता. त्याचे प्राण संकटात येऊ शकतात अशी भीती त्याच्या पालकांना वाटली नसेल का? तरीही त्यांनी त्याला मदत करण्यापासून थांबवले नाही.
अर्धांगवायूग्रस्त अर्णवचे दुःख त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुरून उरणारे आहे. त्या दुःखात तो गुंग झाला असता आणि मनाने कोलमडून पडला असता तरीही ते समजून घेण्यासारखेच मानले गेले असते. पण तसे घडले नाही. या मुलांच्या मनाला स्वार्थी विचारांचा स्पर्श होऊ नये अशी दक्षता त्यांच्या पालकांनी नक्कीच बाळगली असणार. यापुढेही ती घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या मुलांचा उत्तम माणूस घडण्याचा प्रवास सुरू झाला आहे. तो तसाच पुढे सुरू राहावा अशीच त्यांची इच्छा असणार. मुलांची मने निर्मळ आहेत. त्याच्यावर कोणतीही पुटे चढलेली नाहीत हेही त्यांच्या पराक्रमामागचे एक कारण आहे. अन्यथा, माणसे जसजशी मोठी होत जातात तसतसे माणूसपण मागे सुटत जातांना आढळते. संवेदना बधीर होत जात चाललेल्या आढळतात. वास्तविक मदतीची भावना, प्रामाणिकपणा, सहवेदना, माणुसकी हा माणसाचा सहजभाव. पण त्याचाच अभाव वयाबरोबर वाढत जात असावा.
‘मला काय त्याचे’ अशी भावना माणसे सहज व्यक्त करतात. मदतीचा हात करतात. मदतीची याचना करणे दुसर्याला ओलांडून सहज पुढे निघून जाऊ शकतात. कदाचित त्यामुळेच, रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करावी म्हणून आर्थिक पुरस्कार घोषित करण्याची वेळ सरकारवर आणि प्रामाणिकता दाखवणार्यांचा सत्कार करण्याची वेळ समाजावर आली. पण आजही समाजामध्ये वाटते तितकी परिस्थिती नकारात्मक नाही. मनुष्यत्वाची मूल्ये अजूनही वर्धिष्णू आहेत. माणसे-मुले आणि त्यांचे पालक भावना हरवून बसलेले नाहीत. मुलांवर संस्कार करण्याची तळमळ अनेक पालकांमध्ये आहे. या आशा बालवीर पुरस्कारार्थींनी आणि त्यांच्या पालकांनी पल्लवित केल्या आहेत. अशाच समंजस पिढीच्या बळावर भारताने विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहिले आहे. वय कितीही असले आणि वाढले तरी माणूसपण जपता येते हा विश्वास जागवणार्या सर्वांचे अभिनंदन.





