अभ्यासक्रमाचे ओझे आणि ताण पेलवत नसल्याची चिट्ठी लिहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही घटना दिल्लीत घडली. ती मुलगी आयआयटी जेईईची तयारी करीत होती. विद्यार्थी आत्महत्येच्या अशा घटना नव्या नाहीत. विविध कारणांमुळे घडणार्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. राजस्थानातील एक शहर याच कारणासाठी बदनाम झाले आहे. अभ्यासाचा, अयशस्वी होण्याचा, भविष्याचा ताण आणि त्यातून येणारे नैराश्य ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागील काही सामान्य कारणे आहेत, असे मानसतज्ञ सांगतात. तथापि ज्यांनी यश मिळवले, अशीही काही मुलांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याच्या घटना अपवादाने घडतात. मुलांचे मानसिक आरोग्य किती अस्थिर आहे हेच यावरून लक्षात यावे.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणीही अचानक उचलत नसते. मनाच्या तळाशी अनेक गोष्टी साचत जातात. त्याचा एक दिवस कडेलोट होत असावा आणि मुले त्यांचे जीवन संपवण्याचा निर्णय घेत असावीत. मूल अस्वस्थ आहे हे कोणाच्याही लक्षात येत नसेल का? शिक्षक, मित्र, आई-वडील किंवा कुटुंबातील जवळचे इतर सदस्य यांनाही ते कळत नाही का? परस्पर संवादाचा किंवा भावना प्रगटीकरणाचा अभाव हे याचे एक मुख्य कारण असू शकेल का? मुलांना बोलते करण्यासाठी पालक पुढाकार घेण्यात असमर्थ ठरत असतील का? त्याचबरोबर मुलेही त्यांच्या पालकांजवळ त्यांचा ताण किंवा समस्या व्यक्त करीत नसतील का? अशा घटना घडल्या की, पालकांना अनेक गोष्टी सुचवल्या जातात. जसे की: मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे वगैरे!
पालकांविषयी मुलांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून पालकांनी पुढाकार घ्यायला हवाच. तज्ज्ञांचे सल्लेही पालकांनी अंमलात आणायला हवेत हेही खरे! तथापि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी मुले जाणत्या वयाची असतात. त्यांच्यासाठी पालक घेत असलेले कष्टही अनेक मुले जाणून असतात. तथापि कोणत्याही प्रकारच्या भावना वा समस्या पालकांकडे व्यक्त कराव्यात, असे या मुलांना का वाटत नसावे? पालक समजून घेतील, असा विश्वास त्यांना वाटत नसेल का? पालक समजावून घेणार नाहीत, पाठबळ देणार नाहीत, असा ग्रह अनेक मुलेच करून घेत असावीत का? अभ्यास झेपत नाही, असे सांगणे म्हणजे स्वप्रतिमेला धक्का बसणे, असे मुलांना वाटत असण्याची शक्यताही असू शकेल. अन्यथा जीव पणाला लावावा, पण मुलांनी उच्चशिक्षणात यशस्वी व्हावेच, असे किती पालकांना वाटत असेल? मुले ही पालकांसाठी जीव की प्राण असतात. तेव्हा, मानसिक ताण-तणावाबद्दल मोकळेपणे बोलणे हा एक व्यवहार्य उपाय मानला जातो.
अलीकडच्या काळात चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला, याची कबुली जाहीरपणे दिलेली ऐकायला, वाचायला मिळते. याशिवाय भविष्य, उच्चशिक्षण यांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक पाहण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. सुदृढ शरीर आणि सुदृढ मन यांचे परस्पर नाते सर्वांनीच, विशेषतः पालकांनी समजावून घेण्याचीही गरज आहे.