सत्ता आणि अहंकार जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा लोकशाहीचा प्रवास हुकूमशाहीकडे व्हायला वेळ लागत नाही. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. दुसर्या महायुद्धाच्या काळात मानवजातीने याचा अतिशय कटू आणि दाहक असा अनुभव घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या याच मार्गावर असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुसर्या महायुद्धानंतरच्या गेल्या साधारण ७५ वर्षांच्या काळात जग एवढे अशांत आणि अस्थिर कधीही झाले नव्हते, जेवढे या महाशयांच्या करामतींनी झाले आहे. एकतर ते अमेरिकेसारख्या जगातील एका प्रभावी राष्ट्राची सूत्रे सांभाळत असल्याने त्यांच्या घायकुतीने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम होऊन अखिल विश्वच जणू वेठीस धरले गेले आहे. त्यांचे विचित्र वागणे हीच आता एक जागतिक समस्या झाली आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यांनी आखाती प्रदेशात आपले वर्चस्व शाबित करण्याच्या खलनायकी हेतूने सध्या जे काही सुरू केले आहे, त्याला युद्ध म्हणण्यापेक्षा एका तथाकथित शक्तिवान राष्ट्राध्यक्षाचा वेडाचार म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
ज्यांचा काही पुरावाच मिळू शकत नाही, अशा इराणच्या अण्वस्त्रांना विरोध करण्याच्या नावाखाली ट्रम्प यांनी इस्रायलला हाताशी धरून जो विनाकारण काही संघर्ष घडवून आणला आहे, त्याने आज केवळ पश्चिम आशियाच नाही, तर अवघे जग होरपळून निघत आहे. एका बेमुर्वतखोर माणसाच्या हट्टापायी आणि त्याच्या लहरी धोरणांमुळे संपूर्ण मानवी संस्कृतीलाच आज अनिश्चिततेच्या कड्यावर आणून उभे केले आहे. गंभीर बाब म्हणजे, याचा अंत केव्हा होणार हे कोणीही आज सांगू शकत नाही. तसेही डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव हा नेहमीच लहरी असा राहिला आहे. आतापर्यंतची त्यांची राजकीय वाटचाल याची साक्षी राहिली आहे. एकतर त्यांच्या वागण्यात सातत्याचा पूर्ण अभाव राहिला आहे. कधी ते स्वतःला जागतिक शांततेचे कैवारी म्हणवून घेतात, तर कधी अण्वस्त्रांच्या बळावर इराणला नेस्तनाबूत करण्याची भाषा करतात. त्यांच्या या दुटप्पीपणामुळे जागतिक राजकारणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धाला महिना उलटून गेला तरी ट्रम्प यांच्या डोक्यातील युद्धाचे भूत उतरायला तयार नाही.
‘आज युद्ध थांबेल’, असे म्हणत असतानाच दुसर्या दिवशी ते नाटोमधून बाहेर पडण्याची धमकी देतात. मात्र, त्यांचे दुर्दैव असे की, युरोपियन देशांनीही त्यांच्या बुद्धीची एकूण झेप ओळखून या गृहस्थाच्या कोणत्याही दबावाला भीक न घालण्याचे ठरवलेले दिसते. ते सारे ट्रम्प यांची साथ सोडताना दिसत आहेत. या देशांनी वेळीच सावध होऊन स्वत:च्या भवितव्याचा विचार करायचे ठरवलेले दिसते. अखिल मानवजातीचे भाग्य असे की, ट्रम्प यांना आता जगाच्या पाठीवर कोठेही फारसे समर्थन उरलेले दिसत नाही. चुकून जरी त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहिले तर एक भस्मासूर तयार होऊन जगाला जाळून टाकू शकतो. आज एक अन् उद्या भलतेच असे या माणसाचे वागणे! याला काय म्हणावे? यात कोणता मुत्सद्दीपणा आहे? हा तर शुद्ध वेडेपणा आहे! त्यांच्या या धरसोड वृत्तीमुळे जागतिक शेअर बाजार रोजच्या रोज एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळत आहे, ज्याचा फटका कोट्यवधी गुंतवणूकदारांना बसत आहे. तसेच ज्या गुंतवणुकीला सुरक्षित गुंतवणूक म्हटले जाते, त्या सोने-चांदीच्या भावांमध्येही प्रचंड अस्थिरता आली आहे.
जागतिक शांततेच्या गप्पा मारणार्या ट्रम्प यांना स्वतःच्या देशातही तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे; मात्र शेपूट वाकडे ते वाकडेच या उक्तीप्रमाणे ते कोणाचेही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांचा खास समर्थक वर्गदेखील त्यांच्यापासून झपाट्याने दूर जाताना दिसत आहे. ट्रम्प यांचा हा उन्माद वेळीच आवरला नाही, तर इतिहास त्यांना शांततादूत म्हणून नाही, तर विनाशदूत म्हणून ओळखेल. इराणने आपल्या अढळ निश्चयाने हे दाखवून दिले आहे की, कोणत्याही दबावाखाली ते झुकणार नाहीत. आता चेंडू अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या कोर्टात आहे. जगाला युद्धाच्या ठिणग्या नकोत, तर विकासाचा प्रकाश हवा आहे. ट्रम्प यांनी आपल्या हट्टापायी जगाला जेरीस आणणे थांबवले नाही, तर हे युद्ध विसाव्या शतकातील सर्वात मोठी मानवी चूक ठरेल. ट्रम्प यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे अमेरिकेचे जागतिक स्तरावरील आहे ते वजनही घटण्याची शक्यता आहे. दशकानुदशके एक प्रभावी शक्ती म्हणून मिरवलेल्या या देशाचे महत्त्व कमी होऊन नवीन जागतिक समीकरणे तयार होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.





