Sunday, June 14, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ३० जुलै २०२५ - भारतीय लेकींचा बुद्धिबळात दबदबा

संपादकीय : ३० जुलै २०२५ – भारतीय लेकींचा बुद्धिबळात दबदबा

बुद्धिबळाच्या चौसष्ट घरांच्या जागतिक पटावर भारताच्या एका नव्या ‘राणी’ने राज्य प्रस्थापित केले. विशेष म्हणजे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीवरच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेतही भारताच्या लेकींचाच दबदबा दिसून आला. विश्वचषक विजेती दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी यांच्यात अंतिम लढत झाली. हरिका द्रोणावली आणि आर. वैशाली यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तानिया सचदेवसारख्या अनुभवी खेळाडूबरोबर दिव्या, वैशाली, वंतिका अग्रवाल याही त्यांचा पट गाजवत आहेत. असे विजय खेळाडूंसाठी वैयक्तिक स्तरावर आणि देश म्हणूनही आवश्यक असतात. ते त्या त्या खेळांची चमक वाढवतात. त्याबद्दल उत्सुकता निर्माण करतात.

- Advertisement -

क्रिकेटशिवाय इतर खेळांतही कारकीर्द (करिअर) घडवता येते, असा विश्वास तरुणाईच्या मनात जागवतात. विश्वनाथन आनंद यांच्या विजयाने ते बी पेरले. त्याला आता घवघवीत यशाची फळे येऊ लागली आहेत. दमदार खेळाडूंची फळी या क्षेत्रात घडत आहे. तरीही त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी महिला खेळाडूंचा सहभाग मोठ्या संख्येने वाढायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू भाग्यश्री ठिपसे व्यक्त करतात. कोनेरू हंपी आणि दिव्या यांचा विजय त्याचा मार्गही दाखवतात. कोनेरू हंपी वयाच्या पंधराव्या वर्षीच भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ठरली होती.

जागतिक विजेती दिव्या तर फक्त एकोणीस वर्षांची आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने खेळायला सुरुवात केली. या टप्प्यावर पालकांची भूमिका महत्वाची ठरते. मुलांना स्वप्न दाखवावे लागते. विश्वास पेरावा लागतो. त्यांच्या बरोबर त्या वाटेवर छोटी-छोटी पावले टाकावी लागतात. दिव्याची आई नम्रता यांनीही हा प्रवास अवघड, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे, असे सांगितले. बुद्धिबळ हा विलक्षण एकाग्रतेचा खेळ आहे. त्याची गोडी दिव्याला लावण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे
लागले. प्रोत्साहन द्यावे लागले, असे त्या सांगतात. नेमके इथेच बहुसंख्य मुलांची अडचण होत असावी.

कारण खेळून काय होणार आहे? असा प्रश्न बहुसंख्य पालकांना पडतो. तो मुलांना, विशेषतः मुलींना अनेकदा विचारलाही जातो. तथापी मुले आणि त्यांच्या पालकांनी मिळून एकच स्वप्न पाहिले तर ते वास्तवात उतरू शकते हेच दिव्यासारख्या मुलींच्या विजयातून स्पष्ट होते. अर्थात, खेळ महागडे असतात. जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी आर्थिक बाजू तितकीच महत्वाची असते. त्याला सरकारची साथ अपरिहार्य असते हे खरेच, पण मनात बीजारोपण ही त्याची पहिली पायरी आहे. सगळेच खेळाडू जागतिक दर्जा गाठत नाहीत, पण खेळामुळे होणारे मूल्यसंस्कार आणि विकसित होणारे व्यक्तिमत्व नजरेआड करण्यासारखे नसते. दिव्यासह सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....