सोलापूर । Solapur
सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. माळशिरस तालुक्यातील राजनी गावच्या शिवारात भाविकांनी भरलेली पिकअप गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने तब्बल १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजनी गावचे रहिवासी असलेल्या १४ जणांचा एक गट साताऱ्यातील प्रसिद्ध म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होता. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन अत्यंत उत्साहात हा गट पिकअप वॅनने आपल्या गावी परतत होता. मात्र, म्हसवड-तांदुळवाडी रस्त्यावरून जात असताना, राजनी गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही धावती पिकअप वॅन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल विहिरीत कोसळली.
आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी विहिरीकडे धाव घेतली. प्रशासनाला तात्काळ माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. विहिरीत पाणी असल्याने मदतकार्यात काही अडचणी येत होत्या, तरीही क्रेन आणि स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे.
मृत्यू झालेले सर्व १४ जण पंढरपूर तालुक्यातील एकाच गावचे रहिवासी असल्याने रांजनी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या विहिरींना संरक्षक कठडे असणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.




