Thursday, March 13, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : ३१ ऑक्टोबर २०२४ - तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ

संपादकीय : ३१ ऑक्टोबर २०२४ – तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ

आज नरकचतुर्दशी. बहुसंख्यांच्या घरादाराची साफसफाई झालीच असेल. आज अभ्यंगस्नानाच्या निमित्ताने शरीराचीदेखील साफसफाई पार पडेल. त्याअर्थाने दिवाळी हा स्वच्छतेचादेखील सण ठरतो. त्याबरोबरीने मनाची साफसफाई देखील केली जाऊ शकेल का? श्यामच्या आईने श्यामवर याचा संस्कार फार साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत केलेला आढळतो. त्या प्रसंगाचे पुस्तकात रसाळ वर्णन आहे.

पाय खराब होऊ नयेत म्हणून छोटासा श्याम त्याच्या पायांना खूप जपतो. तसेच, मन अस्वच्छ होऊ नये याचीदेखील काळजी घेण्यास आई श्यामला बजावते. माणसांचेही असेच होत असावे का? मनाचा कानाकोपरा तपासला तर कदाचित अशा अनेक गोष्टी सापडू शकतील ज्याचे ओझे माणसे सतत बाळगतात. वर्षानुवर्षे अनेक गोष्टी मनात भरून ठेवतात, असे निरीक्षण मानसतज्ज्ञही नोंदवतात. राग, लोभ, माया, मोह आणि कोणाविषयीचा तरी मत्सर याने माणसाचे मन वर्षानुवर्षे व्यापून असते आणि म्हणूनच ते सवयीचेदेखील होते. त्यात काही गैर वाटेनासे होते. किंबहुना तेच बरोबर आहे असा माणसांचा ग्रह आढळतो.

- Advertisement -

मग जशी क्रिया तशीच प्रतिक्रिया. याच भावना थोड्याफार फरकाने सर्वत्र आढळतात. तसेच अनुभव मग परस्परांना एकमेकांकडून एकमेकांना येतात. ‘आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे’ अशीच ही अवस्था म्हटली जाऊ शकेल. परिणामी माणसाचे मन आजारी पडणे सामान्य बाब बनली आहे. निराशा, नकारात्मक विचार, क्रोध, अस्वस्थता, चंचलता, भावनिक आंदोलने, चिंता, मत्सर, द्वेष असे विविध मानसिक विकार माणसांना गाठतात. मनाला अशांत करणारे असे अनेक अवगुण सोडून देण्याचा संकल्प माणसे या दिवाळीत करू शकतील. कारण ते अवगुण माणसांनीच धरून ठेवले असे मानसतज्ज्ञ सांगतात.

मन मोकळे करणे, स्वतःशी संवाद साधणे, व्यायाम आणि ध्यान, डायरी लिहून व्यक्त होणे, छंद जोपासणे हे त्याचे काही सोपे मार्ग सांगितले जातात. माणसाने ठरवले तर त्याला काहीही अशक्य नाही हे माणसांच्या मनावर ठसवणारे अनेक अभंग संतांनी लिहून ठेवले आहेत. ‘नर करनी करे तो नर का नारायण बन जाये’ असे बजावले आहे. श्यामची आई म्हणते त्याप्रमाणे, साधे, सरळ आणि सहज जीवन जगणे शक्य आहे याचीही असंख्य उदाहरणे अवतीभोवती आढळतात. शांत आणि निवांत मन शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गुरुकिल्लीच असते. संत तुकाराम महाराज ‘तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनि गोपाळ राहे तेथे’ हाच उपदेश करतात. तो आचरणात आणण्याची गरज आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...