
भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आजवर अनेक पिढ्या आल्या आणि त्यांनी आपापल्या परीने देशाची दिशा व गती ठरवली. मात्र, आजच्या घडीला देशात एका नव्या, अत्यंत प्रभावी आणि तंत्रज्ञानाने जोडलेल्या पिढीचे आगमन झाले आहे, ती म्हणजे ‘जेन-झी’. आज देशातील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कॉर्पोरेट जगत या पिढीला चुचकारण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अतोनात धडपडत आहेत. कारण ही पिढी केवळ संख्येने मोठी नाही, तर तिची विचारसरणी, मूल्ये आणि जीवनशैलीत एक आमूलाग्र बदल झाला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘एमिटसच्या इंडिया जेन-झी आउटलूक-२०२६’ या अहवालातील निष्कर्ष या बदलत्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारे अत्यंत बोलके आणि दिशादर्शक दस्तऐवज ठरले आहेत.
या अहवालानुसार, देशातील १५ ते २८ वयोगटातील १,०१० युवक-युवतींवर आधारित सर्वेक्षणातून जे सत्य समोर आले आहे, ते जुन्या पारंपरिक संकल्पनांना पूर्णपणे छेद देणारे आहे. एकेकाळी यशाची व्याख्या म्हणजे मोठे पद, कोट्यवधी रुपयांचे पॅकेज, परदेशी शिक्षण आणि अहोरात्र राबणे अशी मानली जात होती. परंतु आजच्या जेन-झी पिढीने यशाची ही जुनी व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. या नव्या पिढीला केवळ मोठे पद किंवा हव्यास नको आहे, तर एक शांत, सुसंस्कृत आणि चांगले आयुष्य हवे आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, तब्बल ७४ टक्के तरुणांनी नोकरी-आयुष्य संतुलन या संकल्पनेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. याचा अर्थ पैसा आणि करिअर महत्त्वाचे असले तरी, मानसिक स्वास्थ्य, कुटुंब व स्वतःसाठी वेळ देणे आणि वैयक्तिक आयुष्य उत्तम राखणे यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यास ही पिढी अजिबात तयार नाही.
तसेच ६५ टक्के तरुणांचे असे स्पष्ट मत आहे की, करिअरमध्ये नेहमीच उच्च ‘नेतृत्वपद’ किंवा बॉस बनणे आवश्यक नाही; तर आपल्या आवडीच्या आणि क्षमतेच्या क्षेत्रात आत्मसंतुष्ट व समाधानकारक काम करणे अधिक महत्त्वाचे आहे. या मानसिक व वैचारिक बदलाचे दूरगामी पडसाद केवळ करिअरवरच नव्हे, तर शिक्षणाच्या निवडीवर आणि देशाच्या सामाजिक रचनेवर स्पष्टपणे उमटत आहेत. एकेकाळी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे आणि तिथेच स्थायिक होणे हे प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याचे सर्वोच्च स्वप्न मानले जायचे. परंतु या अहवालानुसार परदेशी शिक्षणातील रुची आता वेगाने घटल्याचे दिसून येत आहे. तब्बल ४८ टक्के विद्यार्थ्यांनी परदेशातील आकर्षण कमी झाल्याचे मान्य केले आहे. ८७ टक्के विद्यार्थ्यांनी भारतातील आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील विद्यापीठांचे व संस्थांचे अभ्यासक्रम पसंत असल्याचे सांगितले आहे, तर ६९ टक्के विद्यार्थ्यांनी परदेशातील व्हिसा जोखीम टाळण्यासाठी देशांतर्गतच राहणे व शिक्षण घेणे पसंत केले आहे.
एवढेच नव्हे तर, ‘पाथवे मॉडेल’ची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून, ज्यामध्ये शिक्षणाचा काही भाग भारतात पूर्ण करून पुढील भाग परदेशात शिकण्याचा लवचिक मार्ग स्वीकारला जात आहे. जेव्हा देशातील तरुणाईचा हा बदललेला मूड आपण पाहतो, तेव्हा त्याचे अत्यंत मोठे पडसाद भारतीय राजकारणावर पडल्याशिवाय राहत नाहीत. आजवर राजकारणी तरुणांना केवळ निवडणुकांच्या तोंडावर आंदोलने, घोषणाबाजी किंवा प्रचारापुरते साधन मानत असत. पण आजची जेन-झी अत्यंत व्यावहारिक, माहितीसंपन्न, डिजिटल साक्षर आणि स्वतंत्र विचार करणारी आहे. ती भावनांच्या वा पोकळ आश्वासनांच्या आहारी न जाता थेट धोरणात्मक मुद्यांवर विचार करते. नोकरीच्या नव्या संधी, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शिता, शिक्षण क्षेत्रातील लवचिकता, मानसिक आरोग्याचे प्रश्न, पर्यावरण आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांसारखे विषय त्यांच्यासाठी कळीचे आणि अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत. त्यामुळेच आज सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, सर्वच राजकीय पक्षांनी जेन-झीला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियापासून डिजिटल कॅम्पेन्सपर्यंत सर्व काही कामाला लावले आहे.
मात्र, या पिढीला केवळ तात्कालिक घोषणांची नव्हे, तर ठोस कृतीची आणि पारदर्शक व्यवस्थेची खरी गरज आहे. शेवटी जेन-झीचा हा बदललेला यशाचा फॉर्म्युला केवळ तरुणांपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशाच्या भविष्याची दिशा व दशा ठरवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पारंपरिक चौकटींना मोडून काढत लवचिक करिअर, सुरक्षित आणि मानसिकदृष्ट्या संतुलित जीवनशैली निवडणारी ही पिढी भारताच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचत आहे. राजकीय पक्ष असोत वा उद्योग जगत या पिढीच्या उच्च आकांक्षांना व बदलत्या प्रवाहाला समजून घेतल्याशिवाय आता कोणाचेही राजकारण किंवा नियोजन यशस्वी होणार नाही. हा बदल केवळ एका पिढीचा नसून, तो एका नव्या, प्रगल्भ आणि आत्मविश्वासी भारताच्या सुवर्णोदयाचा काळ आहे.




