राज्यात सुमारे सत्तर हजार सरकारी शाळा आहेत. त्यापैकी बहुसंख्य शाळा ग्रामीण भागात आहेत. सरकारी शाळांमधील शिक्षणाचा स्तर, शाळांमधील वातावरण आणि इमारतींची अवस्था हे सदासर्वकाळ चर्चेचे मुद्दे आहेत. राज्यातील मराठी शाळा बंद पडत चालल्याची भीती नेहमीच व्यक्त केली जाते.
ग्रामीण भागातील पालकांचाही इंग्रजी शाळांकडे कल वाढत आहे. पण हे सगळे वास्तव स्वीकारून सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उत्तम व्हावा, सरकारी शाळांना पालकांची पसंती मिळावी, सरकारी शाळा लक्षवेधी ठराव्यात यासाठी पुढाकार घेतला जात आहे. हे प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावर सुरु असले तरी त्यामध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे समाजात सरकारी शाळांची प्रतिष्ठा वाढवणे.
एरवी मराठी शाळा बंद पडतात म्हणून कंठशोष केला जातो. ठराविक दिवशी तर मराठी भाषा, पर्यायाने मराठी शाळांविषयी अनेकांच्या मनात उमाळा दाटून येतो. सार्वत्रिक चिंता व्यक्त होते. तावातावाने मुद्दे मांडले जातात. उपक्रमांचा पूर येतो. पण दरवर्षी दुर्दैवाने ते सगळे अळवावरचे पाणी ठरते. दिवस मावळला की मराठीचा विसर पडतो. पण काही ठिकाणी मात्र ठोस प्रयत्न केले जात आहेत.
नाशिक जिल्ह्यातील शिंदे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणार्या मुलांच्या पालकांना पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य कुटुंबामध्ये आर्थिक घडी बसवण्याची यातायात सुरु असते. हवामान बदलाचा फटकाही त्यांच्या अर्थकारणाची चिंता तीव्र करतो. या पार्श्वभूमीवर उपरोक्त निर्णय पालकांना दिलासा देणारा व कदाचित त्यांचा सरकारी शाळांकडे कल वाढवणारा ठरू शकेल. सरकारही त्यात मागे नाही. सरकार आता सरकारी शाळांमधील मुली आणि महिला शिक्षकांना स्वसंरक्षणाचे धडे मोफत देणार आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी तशी माहिती माध्यमांना दिली.
महिला आणि मुलींच्या दृष्टीने सामाजिक वातावरण असुरक्षित आहे. मुलगी घराबाहेर पडली तर तिच्याबाबतीत काही दुर्घटना घडेल का ही चिंता पालकांना सतावते. विशेषतः ग्रामीण भागात घरापासून शाळेचे अंतर हे देखील मुलींच्या शाळा गळतीचे एक कारण मानले जाते. स्वसंरक्षण हा अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करणारा एक व्यवहार्य मार्ग आहे. उपरोक्त निर्णय अंमलात आणला गेला तर तो महिला शिक्षिका, मुली आणि त्यांच्या पालकांचे मनोधैर्य वाढवू शकेल. सरकारी शाळांमधील सर्जनशील शिक्षकांचा परिचय समाजाला अधूनमधून होतो. शिक्षण अधिकाधिक उपक्रमशील करण्याकडे त्यांचा कल असतो.
निफाड तालुक्यातील डोंगरगाव शाळेतील एक उपक्रम त्याचे चपखल उदाहरण ठरेल. ‘गोष्ट ऐकून गोष्ट लिहिणे’ हा तो उपक्रम. गोष्ट सांगणे आणि ऐकणे याचा विसर बहुसंख्याना पडला असला तरी मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात गोष्टी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे भावविश्व समृद्ध करतात. त्यांच्याही नकळत मूल्ये रुजवतात. भाषाकौशल्य विकसित होण्यात मदत करतात. मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व त्यांना वेगळे सांगायला नको. नवीन शैक्षणिक धोरणात देखील त्यावर भर दिला गेला आहे. तेव्हा, सरकारी शाळांचे भविष्य उज्वल ठरवू शकतील अशा या प्रयत्नांना साथ देणे ही पालकांची देखील जबाबदारी आहे.