जवळपास साडेपाच दशकांपूर्वी जेव्हा अपोलो मोहिमेद्वारे मानवाने पहिल्यांदा चंद्राच्या धूळयुक्त पृष्ठभागावर पाऊल ठेवले, तेव्हा ते केवळ एका प्रगत देशाचे तांत्रिक यश नव्हते. ती संपूर्ण मानवजातीने पाहिलेल्या हजारो वर्षांच्या स्वप्नांची एक उत्तुंग झेप होती. आज, ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, मानवाने पुन्हा एकदा त्याच ध्येयाने आणि अधिक प्रगल्भ विज्ञानानिशी चंद्राकडे कूच केले आहे. नासाची ‘आर्टिमिस २’ मोहीम ही केवळ एक अंतराळ मोहीम उरलेली नाही; ती मानवी जिद्द, अफाट तंत्रज्ञान आणि भविष्यातील अंतराळ वसाहतींच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.
१९७२ च्या अपोलो १७ नंतर मानवाचा चंद्राशी असलेला प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. असे वाटले होते की चंद्र आता विस्मृतीत गेला आहे; परंतु त्या मोहिमांनी दिलेला वैज्ञानिक डेटा आजही आपल्या नव्या संशोधनाचा पाया ठरत आहे. ‘अपोलो’ने आपल्याला चंद्राची ओळख करून दिली, तर ‘आर्टिमिस’ आपल्याला तिथे राहायला शिकवणार आहे. मागील मोहिमांतून मिळालेल्या चंद्रावरील मातीचे नमुने, गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभ्यास आणि अंतराळातील वातावरणाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम या माहितीमुळेच आज आपण मंगळ मोहिमेसारखी धाडसी स्वप्ने सत्यात उतरवू पाहत आहोत. ‘आर्टिमिस २’ ही मोहीम खर्या अर्थाने ऐतिहासिक आणि समावेशक आहे.
या मोहिमेत रीड वाइजमन, व्हिटर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच हे तीन अमेरिकन आणि कॅनडाचे जेरेमी हॅन्सन हे चार अंतराळवीर सहभागी झाले आहेत. हे वीर चंद्राच्या कक्षेभोवती प्रदक्षिणा घालून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतणार आहेत. या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे, यात पहिल्यांदाच एका महिला अंतराळवीराचा आणि एका कृष्णवर्णीय अंतराळवीराचा समावेश करण्यात आला आहे. हे पाऊल अंतराळ क्षेत्रातील केवळ तांत्रिक प्रगतीच नाही, तर सामाजिक समानतेचा एक मोठा संदेश जगाला देते. या मोहिमेचा कणा असलेले ‘ओरियन स्पेसक्राफ्ट’ हे आधुनिक काळातील सर्वात शक्तिशाली अंतराळयान आहे. अपोलोच्या तुलनेत आर्टिमिसमधील नेव्हिगेशन, कम्युनिकेशन आणि ‘लाईफ सपोर्ट सिस्टीम’ कित्येक पटीने प्रगत आहेत. चंद्राच्या कक्षेत या यानाचे यशस्वीरित्या दाखल होणे, हे भविष्यातील अनेक अनंत शयतांची दारे उघडणारे ठरेल.
याचे सकारात्मक परिणाम केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित नसून ते सामाजिक आणि आर्थिक स्तरावरही क्रांती घडवतील. आर्टिमिसचा मुख्य उद्देश चंद्रावर केवळ ‘जाऊन येणे’ हा नसून, तिथे दीर्घकाळ वास्तव्यासाठी ‘लुनार गेटवे’ आणि ‘बेस कॅम्प’ उभारणे हा आहे. विज्ञानाच्या दृष्टीने चंद्राचा दक्षिण ध्रुव अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथे बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची दाट शयता आहे. जर हे पाणी पिण्यासाठी आणि त्यातील हायड्रोजन-ऑसिजन इंधनासाठी वापरता आले, तर चंद्र हा मंगळावर जाण्यासाठी एक ‘रिफ्यूएलिंग स्टेशन’ म्हणून काम करेल. म्हणजेच, भविष्यातील महाकाय अंतराळ प्रवासासाठी चंद्र हा आपला पहिला महत्त्वाचा थांबा असेल. विशेष म्हणजे, ‘आर्टिमिस’ ही आता केवळ एका देशाची मक्तेदारी राहिलेली नाही.
यात युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा आणि भारताची ‘इस्रो’ यांसारख्या नामवंत संस्थांचे सहकार्य लाभले आहे. हे जागतिक शांतता आणि मानवी कल्याणासाठी एकत्र येण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. काही टीकाकार असा प्रश्न उपस्थित करतात की, पृथ्वीवर भूक, गरिबी आणि पर्यावरणाच्या इतया समस्या असताना चंद्रावर इतका अफाट खर्च करण्याची गरज काय? याचे उत्तर आर्टिमिस मोहिमेच्या दूरगामी परिणामात दडलेले आहे. मानवाचा मूळ स्वभाव अन्वेषण करण्याचा आहे. नवीन सीमा ओलांडल्याशिवाय प्रगती शय नाही. अंतराळ संशोधनामुळे दरवेळी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होते, ज्याचा प्रत्यक्ष उपयोग पृथ्वीवर होतो. मग ते पाणी शुद्धीकरण यंत्रणा असो, सौरऊर्जेचा वापर असो वा प्रगत वैद्यकीय उपकरणे; या संशोधनाचा फायदा शेवटी सामान्य माणसालाच होतो. ‘आर्टिमिस २’ च्या माध्यमातून आपण आपल्या मर्यादांना आव्हान देत आहोत.
ही मोहीम येणार्या पिढीसाठी, विशेषतः तरुण संशोधकांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. जेव्हा हे चार अंतराळवीर चंद्राच्या कक्षेवरून आपल्या निळ्याभोर पृथ्वीचे दर्शन घेतील, तेव्हा ते जगाला हाच संदेश देतील की, आभाळ ही आता मर्यादा राहिलेली नाही. ही मोहीम म्हणजे विज्ञानाने लावलेली एक ‘विजयी गुढी’आहे. ज्या उत्साहाने आपण ५० वर्षांपूर्वी चंद्रावरचे पहिले पाऊल अनुभवले होते, त्याच अभिमानाने आज आपण या नव्या प्रवासाचे साक्षीदार होत आहोत. चंद्र आता दूर नाही, तो आपल्या पुढच्या मोठ्या प्रवासाची केवळ सुरुवात आहे.




