Wednesday, January 15, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : ९ जानेवारी २०२५ - ही अगतिकता कशाला?

संपादकीय : ९ जानेवारी २०२५ – ही अगतिकता कशाला?

रुग्णालयातून, रेल्वे फलाटावरून, रस्त्याच्या कडेला आईच्या कुशीत निजलेले बाळ पळवल्याच्या घटना अधूनमधून घडतात. नाशिकमध्ये नुकतीच अशी एक घटना उघडकीस आली. एका उच्चशिक्षित महिलेने जिल्हा रुग्णालयातून नवजात अर्भक चोरले. त्यानंतरच्या घडामोडीत तिला अटक करण्यात आली असून, बाळ त्याच्या खर्‍या आईच्या कुशीत सुखरूप परत देण्यात संबंधित यंत्रणांना यश आले आहे. त्या महिलेचे कृत्य बेकायदा आणि भावनाहीन आहेच.

पोलीस तपासात दोष सिद्ध झाला तर तिला त्याची शिक्षाही कदाचित मिळू शकेल. तथापि या सगळ्या घटनेत फक्त त्या महिलेलाच चूक ठरवले जाऊ शकेल का? बाळ चोरणारी महिला उच्चविद्याविभूषित आहे. तिने नियोजनपूर्वक चोरी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. तिला बाळाची चोरी करावीशी का वाटली असेल? तो गुन्हा ठरू शकेल हे ती नक्की जाणून असावी? तरीही तिने हे धाडस का केले असावे? की मूल होत नसल्याच्या सामाजिक दबावामुळे तिने हे पाऊल उचलले असू शकेल का? कोणत्याही दृष्टिकोनातून त्या महिलेचे समर्थन करण्याचा उद्देश अजिबात नाही.

- Advertisement -

मातृत्व सुखासाठी बाळ चोरल्याची कबुली तिने दिल्याचे सांगितले जाते. विवाहित महिलेचे अस्तित्व मातृत्व सुखाशीच जोडले गेल्याचे आढळते. नव्हे विवाह हा विषय त्याभोवतीच फिरतो. विवाह झाला की थोड्याच दिवसात विवाहितेला ‘गोड बातमी’ च्या चौकशांना सामोरे जावे लागते. तिने तशी कोणतीही बातमी दिली नाही तर सामाजिक दबाव-अवहेलना तिच्या वाट्याला येते हे वास्तव कोणीही नाकारू शकणार नाही. प्रसंगीही त्यासाठी उपचारही तिनेच घ्यावेत अशीच कुटुंबीयांची इच्छा आढळते.

गर्भधारणा न होण्यास जोडप्यात कमतरता असू शकतात असे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात त्यावर उपाय देखील शक्य आहेत. मातृत्वसुख प्रत्येक जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना हवे असते. ते सुख मिळण्यातले समाधानही समजण्यासारखेच आहे. तथापि केवळ ते सुख न देण्याला महिला एकटीच जबाबदार धरली जाते. तो दबावही अशा चोरीच्या मागे असू शकेल का? वास्तविक दत्तक घेण्याकडे कल वाढत आहे. दत्तक घेण्यासाठी देखील प्रतीक्षा यादी असल्याचे वृत्त अधूनमधून प्रसिद्ध होते. तरीही एका सुशिक्षित महिलेला मूल दत्तक घ्यावेसे का वाटले नसावे? रक्ताचे मूल हवे असल्याचा अट्टाहास याच्या मुळाशी असू शकेल का? दत्तक प्रक्रिया संथ असल्याचा आरोप अधूनमधून होताना आढळतो. तेही एक कारण असू शकेल का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या