Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखविशेष संपादकीय : २२ डिसेंबर २०२४ - आधारवडाची समृद्ध छाया

विशेष संपादकीय : २२ डिसेंबर २०२४ – आधारवडाची समृद्ध छाया

मोठे भाऊ गेले… खरेतर मन हे मानायला तयार नाही. एकाच व्यक्तिमत्त्वाचे अनेक लोभस पैलू कसे असू शकतात, हे खरेतर भाऊंच्या एकंदरीत आयुष्यातून दिसते.अत्यंत वैचारिक, अध्यात्मिक, तार्किक, प्रगतशील, उद्यमशील, सुसंस्कृत विचाराने भरलेले भाऊंचे आयुष्य. ते फक्त वैचारिक पातळीलाच राहिले नाही तर भाऊ यातील प्रत्येक आशय जगले. एवढेच नव्हे तर त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला या विविध आशयांचा स्पर्श झाला.

भाऊंचे आयुष्य बघितले तर माणसाने माणसाशी माणसासम वागणे….. या उक्तीप्रमाणे होते. या ओळी भाऊंनी त्यांच्या जगण्यातून खरोखरीच अधोरेखित केल्या. लहान आणि मोठ्या व्यक्तीला, ती व्यक्ती म्हणून त्यांनी बघितले आणि तसा आदरही दिला. एक व्यक्ती अनेक विषयांमध्ये अतिशय प्रगल्भतेने व संयमतेने कसे विचार मांडू शकतो यावर एखादा माणूस अचंबित होत असे.लहानपणापासूनच त्यांची बैठक ही वारकरी संप्रदायाच्या विचारांनी प्रभावित केली. आजोळकडून आलेला हा वारसा त्यांनी नुसता जपला नाही तर तो समृद्धपणे पुढच्या पिढीलाही दिला.

- Advertisement -

मामासाहेब दांडेकर, देगलूरकर महाराज यांसारख्या महानुभवींच्या सान्निध्यात भाऊ आल्याने त्यांच्याही विचारांमध्ये ती प्रगल्भता, तारतम्य आणि तेवढीच वैचारिक खोली त्यांनी स्वतःहून निर्माण केली. ज्ञानेश्वरीचा त्यांच्यावर प्रभाव होताच. बोलता बोलता भाऊ एखादी ओवी पटकन म्हणून जायचे, त्याचा मतिताथर्र् सांगायचे आणि आपल्या संभाषणात ती ओवी आणि तो अर्थ अतिशय चपखल बसायचा. यांना हे सगळे स्मरणात राहते कसे हा प्रश्न मला नेहमीच पडत असे. अनेक भाषांमधील लिखाण व त्यांचे लेखक, अनेक पुस्तके, भाषण याचे दाखलेसुद्धा भाऊ सहज बोलता बोलता द्यायचे.

भाऊंचा आवडता छंद माणूसपणाचा आणि म्हणूनच या माणसांसाठी भाऊंनी सर्व ते काही केले. वेगवेगळ्या क्षेत्रात मग ते उद्योग, पत्रकारिता व्यवसाय, शिक्षण सांस्कृतिक, अध्यात्म अशा अनेक क्षेत्रांमध्ये भाऊंनी माणसांसाठीच संस्था उभ्या केल्या. सहकाराची चळवळ उभी केली, शेतकर्‍यांना संघटित केले, सामाजिक, राजकीय क्षेत्रांमधील माणसांना घडवले. हे करण्याचे सामर्थ्य आणि धैर्य मोठ्या भाऊंकडे होते.भाऊंची खासियत म्हणजे त्यांना भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तींबरोबर त्यांचे नाते खूप अनोखे असे. माझ्याशी काहीतरी विशेष संबंध जुडला आहे, असे प्रत्येक व्यक्तीला वाटायचे. ते प्रत्येकाला आपलेसे करत.

‘देशदूत’सारखे व्यासपीठ हे पत्रकारितेच्या पुढे जाऊन त्यांनी उभे केले. ‘देशदूत’मधून सामान्य माणसाच्या आवाजाला एक जागा दिली. खर्‍या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब दाखवणारा, या मातीतले दैनिक म्हणून ‘देशदूत’ त्यांनी उभा केला.मराठी भाषेवर भाऊंचे विशेष प्रेम. बोलीभाषा, लेखीभाषा यातील फरक व त्याचे काटेकोर नियम ते पाळत असे. भाऊंचे इंग्रजीवर पण प्रभुत्व होते, मात्र मराठी भाषेत इंग्रजी शब्द येऊ नये याबाबतीत त्यांचा आग्रह असे. भाऊंचे वाचनही दांडगे होते. त्यावर समीक्षकाप्रमाणे भाष्य करण्याची क्षमताही त्यांच्याकडे होती. शिक्षणावर भाऊंचा विश्वास होता आणि म्हणून अनेक शैक्षणिक संस्था उभ्या करण्यातही त्यांनी भरीव योगदान दिले. उद्योगाशी निगडीत असलेल्या अनेक संस्थांवर, अनेक पदांवर भाऊंनी जबाबदारीने काम केले. त्या त्या उद्योग क्षेत्राच्या अडीअडचणी सोडवणे व त्या पुढे नेणे अशा अनेक भूमिका त्यांनी सकारात्मकरीत्या पार पाडल्या.

आयुष्यभरात भाऊंचा परिचय अनेक लोकांशी झाला. मात्र भाऊंकडे एक वेगळीच खुबी होती. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचीच मते त्यांना पटली असे नाही, मात्र व्यक्तीचे मत आणि ती व्यक्ती यातील फरक भाऊ करू शकत होते. त्या व्यक्तीचे ते मत आहे, ते मत म्हणजे ती व्यक्ती नव्हे, असे ते नेहमी म्हणत आणि त्यामुळे विचाराला जरी विरोध असला तरी त्यांनी कधीही व्यक्तीला विरोध केला नाही. यामुळे विरोधकांचेसुद्धा भाऊंशी चांगले जमायचे.सांस्कृतिक क्षेत्रात भाऊंचे योगदान जाणणार्‍या व्यक्तीदेखील होत्या. कुसुमाग्रज हे त्यापैकी एक. दोघांनाही एकमेकांबद्दल विलक्षण आदर आणि प्रेम. त्यामुळे अर्थातच विश्वासदेखील वाढला. कुसुमाग्रजांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी भाऊंनी लिलया पेलली.

भाऊंचे वय वाढले तसे अनेक क्षेत्रातून भाऊ बाहेर पडले. मात्र त्या क्षेत्राचे ज्ञान व तेथील माणसांचा संचय हा त्यांच्यासोबत कायम राहिला. त्यातून अनेकांना खूप शिकायला मिळाले.पत्रकारितेकडे कसे बघावे, भाषेतून त्याचे आयाम कसे मांडावेत, पत्रकारितेची मूल्ये कशी जपावीत हे भाऊंनी ‘देशदूत’मध्ये रुजवले आणि आजही त्याच मार्गावर ‘देशदूत’ चालत आहे.मोठे भाऊ हे ‘देशदूत’साठीच नव्हे तर अनेक क्षेत्रांसाठी आधारवड होते. नाशिकच्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाटा होता. ते उद्योजक होतेच पण ते व्रतस्थ उद्योजक होते. स्वतःच्या नीतिमूल्यांशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही ना ती त्यांनी माणूसपणाशी केली.त्यांच्या सान्निध्यात अनेक माणसे आली, अनेकांकडून ते शिकले आणि अनेकांना त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. भाऊ बोलत राहत असत, अनेक प्रसंगात रमत असत. त्या त्यावेळचे किस्से, त्याच्यातले मर्म असे सांगायचे की एखादा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहत असे. त्यांच्या प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन पदरी पडे.

नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी मैत्री केली होती. माणूस हा बदलत असतो. काही गोष्टी त्याला आयुष्याच्या ओघात बदलाव्या लागतात. या बदलाचा स्वीकार करणारेदेखील भाऊ होते. बदल हा सृष्टीचा नियम असला तरी काही मूळ तत्त्व, विचार, काही वृत्ती या तशाच राहतात. भाऊंचे माणूसपणाला दिले जाणारे स्थान हे आढळ राहिले.

आता या आधारवडाची फक्त छायाच उरली, पण ही छायासुद्धा खूप लोकांना, अनेक पिढ्यांना समृद्ध करत राहील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...