Sunday, October 18, 2026
Homeक्राईमAhilyanagar : ‘घातक क्रिम’च्या जाळ्यात 31 संशयित, अटक कधी?

Ahilyanagar : ‘घातक क्रिम’च्या जाळ्यात 31 संशयित, अटक कधी?

भेसळीपलीकडे थेट बनावट दूध || एलसीबीच्या पुढील तपासाकडे लक्ष

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकून बनावट दूध तयार करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. पॅराफिन व केमिकल पुरवठादारांसह, घातक क्रिमचा वापर करून बनावट दूध तयार करणार्‍या एकूण 31 जणांना या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यापैकी एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही. एलसीबीकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना पकडण्याची ताकद असतानाही सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणार्‍या या ‘दुधाच्या धंद्यातील काळी साखळी’ कधी गजाआड होणार, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस संबंधितांपर्यंत पोहोचल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्यांना अटक होणार की तपास थांबणार, असे प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रिम पुरवठा करणारा अटकेतील राहुरीचा समीर कमरूद्दीन शेख व त्याचे सख्खे भाऊ शाकीर व सद्दाम शेख हे तिघे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तिघांपैकी शाकीर हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. त्याच्या प्लॅननुसार पॅराफिन (मिनरल ऑइल), ‘9.5’ नावाचे केमिकल, मिल्क क्रिम आणि पाणी यांचे मशीनव्दारे मिश्रण करून घातक क्रिम तयार केली जात होती. या एका लिटर घातक क्रिमपासून तब्बल 20 लिटर बनावट दूध तयार केले जात होते. पॅराफिन व केमिकल पुरवठादारांसह, घातक क्रिमचा वापर करून बनावट दूध तयार करणार्‍या एकूण 31 जणांना या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले आहे. एलसीबीकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग तपास करीत आहेत. ते पूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दूधात पॅराफिन व ‘व्हे’ पावडरची भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळीही राहुरीचा समीर शेख आरोपी होता. मात्र त्यावेळी बनावट दूध तयार केले जात नव्हते, तर दूध उत्पादक शेतकरी व डेअरी चालकांना भेसळीसाठी पॅराफिन व ‘व्हे’ पावडरचा पुरवठा केला जात होता.

काही दिवसांनी शेख जामिनावर सुटल्यानंतर शेख बंधूंनी बनावट दूध तयार करण्याचा पूर्ण प्लॅन आखला. देवळाली प्रवरा येथे गोडाऊन भाड्याने घेऊन पॅराफिन, ‘9.5’ केमिकल, मिल्क क्रिम व पाणी यांचे मशीनव्दारे मिश्रण करून घातक क्रिम तयार केली जात होती. एका लिटर क्रिमपासून 20 लिटर दूध तयार करण्याचा हा प्लॅन शेतकरी व डेअरी चालकांना देण्यात येत होता. बनावट दूध डेअरीमध्ये गेल्यानंतर त्याची फॅट व डिग्री व्यवस्थित येत असल्याने अनेकांनी शेख बंधूंकडून ही घातक क्रिम घेण्यास सुरूवात केली. हजारो लिटर बनावट दूध तयार करून ते विक्रीसाठी पाठवले जात होते. दरम्यान, उपनिरीक्षक अभंग यांना समीर शेख पुन्हा दूध भेसळीत सक्रिय झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह फक्राबाद येथे छापा टाकला. त्यावेळी संपूर्ण दूधच बनावट तयार केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला.

जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभंग यांनी तांत्रिक विश्लेषण व बँक व्यवहारांच्या आधारे संपूर्ण साखळी उघड केली. शेख बंधूंकडून घातक क्रिम कोणी-कोणी खरेदी केली व त्यापासून बनावट दूध तयार केले याची माहिती समोर आली. पॅराफिन व ‘9.5’ केमिकल कुठून आणले जात होते आणि घातक क्रिम कोणाला पुरवली जात होती, याचा तपास करताना सुमारे 31 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यात शेतकरी तसेच मोठे डेअरी चालक यांचा समावेश आहे. राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तसेच बीड व नाशिक जिल्ह्यातही या घातक क्रिमची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

संशयित निष्पन्न, पण कारवाई कुठे ?
जिल्ह्यातील काही राजकीय पुढार्‍यांशी संबंध असल्याची चर्चा असलेल्या या संशयितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एलसीबीने रॅकेट उघडकीस आणले, संशयित निष्पन्न केले; मात्र अटक न झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आरोपी निष्पन्न करून त्यांना अटकपूर्व जामिनासाठी वेळ दिला जात आहे का? तडजोड झाली आहे का? अशी चर्चा रंगत आहे. दरम्यान, बनावट दूधाचा गंभीर प्रकार लक्षात घेऊन अधीक्षक घार्गे यांनी तपासाची गंभीर दखल घेतली आहे. राजकीय दबाव झुगारून कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मात्र संशयित निष्पन्न झाल्यानंतरही अटक का करण्यात आलेली नाही, हा प्रश्न कायम आहे.

कठोर भूमिकेची अपेक्षा
दूधात भेसळ नव्हे तर दूधच बनावट तयार करून विक्री करण्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. एलसीबीचा पुढील तपास कोणत्या दिशेने होणार, आणखी संशयित निष्पन्न होणार का आणि निष्पन्न झालेल्यांना तात्काळ अटक होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अधीक्षक घार्गे यांनी यामध्ये लक्ष घालून संशयितांना अटक करण्याच्या सूचना देण्याची मागणी होत आहे. पसार झालेल्यांना वेळ मिळाला तर ते अटकपूर्व जामीन घेतील आणि पुन्हा या धंद्यात सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लोंढे टोळीच्या जामिनांची मालिका! ‘बॉस’ची ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूरमधील गोळीबार प्रकरणातून (Satpur Firing Case) चर्चेत आलेल्या लोंढे टोळीच्या (Londhe Gang) न्यायालयीन लढाईला आता वेग आला आहे. टोळीचा म्होरक्या...